नैसर्गिक शेतीविषयीच्या अपप्रचारांचे खंडण
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
अपप्रचार : ‘नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असलेले देशी गायीचे शेण आणि गोमूत्र सर्वत्र उपलब्ध होत नाही. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने लागवड करणे सर्वांना शक्य नाही.
खंडण : अनेक मोठ्या शहरांतही गोशाळा असतात. काही गोशाळांमध्ये जीवामृत, घनजीवामृत, गोमय, गोमूत्र यांची विक्रीसुद्धा केली जाते. देशी गायी पाळणारे अनेक जण इतरांना शेण आणि गोमूत्र विनामूल्यही उपलब्ध करून देतात.
नैसर्गिक शेतीसाठी १५ दिवसांतून एकदा जीवामृत बनवावे लागते. १०० चौरस फूट क्षेत्रासाठी केवळ ५० ग्रॅम शेण आणि ५० मि.ली. गोमूत्र आवश्यक असते. गोमूत्र कितीही जुने असले, तरी चालते. त्यामुळे ते एकदाच अधिक प्रमाणात आणून ठेवता येऊ शकते. शेण ताजे आवश्यक असले, तरी ७ दिवसांपर्यंतचे शेण ताजे समजले जाते. यातील काहीच उपलब्ध झाले नाही, तर जिवामृताच्या ठिकाणी घनजीवामृत वापरता येते. एकदा बनवलेले घनजीवामृत उन्हात वाळवून वर्षभर साठवून ठेवता येते.
आपल्या आजूबाजूच्या परिसरातील छतशेती करणारे किंवा दूध विक्रेते यांच्याकडे चौकशी केल्यास ‘आपल्या परिसरात देशी गायी कुठे आहेत ?’ हे सहज समजू शकते. लागवड करणारे ४ – ५ जण एकत्रितपणे जीवामृत बनवून ते आपसांत वाटून घेऊ शकतात. त्यामुळे ‘देशी गायीचे शेण आणि गोमूत्र उपलब्ध होत नाही’, असा आधीच अपसमज करून न घेता ते उपलब्ध करून घेण्यासाठी कृतीशील होऊया !’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (६.८.२०२२)