आजपासून नियमित न्यूनतम ३० मिनिटे व्यायाम करण्याचे ध्येय ठेवा !
लेखांक ५३
‘व्यायाम नियमित केला, तरच त्याचे लाभ दिसून येतात. ‘व्यायाम केला; मात्र त्याचा काही लाभ झाला नाही’, असे होतच नाही. ‘कोणतीही गोष्ट अंगवळणी पडण्यासाठी ती न्यूनतम २१ दिवस प्रतिदिन केली पाहिजे’, असे मानसशास्त्र सांगते. यामुळे आजपासून नियमित व्यायाम करण्याचे ध्येय ठेवा. ‘सकाळी व्यायाम केला नाही, तर दुपारी जेवणार नाही’ किंवा सायंकाळी व्यायाम करत असाल, तर ‘व्यायाम केला नाही, तर रात्रीचे जेवणार नाही’, असा निश्चय करा. तुम्ही कितीही व्यग्र (व्यस्त) असलात, तरी दिवसभरात न्यूनतम ३० मिनिटे व्यायामासाठी राखीव ठेवा. एकाच प्रकारचा व्यायाम न करता स्वतःच्या क्षमतेनुसार चालणे, धावणे, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम असे विविध प्रकार करा. प्रतिदिन टप्प्याटप्प्याने व्यायाम वाढवत न्या. एका मासानंतर तुमच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेमध्ये वाढ झाली आहे अन् तुम्ही निरोगी जीवनाकडे वाटचाल करत आहात, हे तुम्हाला निश्चितच अनुभवता येईल.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.९.२०२२)