सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करणारे पोलिसांच्या कह्यात
हॉटेल व्यावसायिक राकेश म्हाडदळकर यांच्या सतर्कतेमुळे यश
कुडाळ – हॉटेल व्यावसायिक राकेश म्हाडदळकर यांच्या सतर्कतेमुळे बनावट आस्थापनांच्या नावे, तसेच विविध आमिषे दाखवून जिल्ह्यातील अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करणार्या दोघांना पकडून पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे. या वेळी दोघा संशयितांसह असणारे अन्य कर्मचारी मात्र पसार झाले. या सर्व प्रकाराची खातरजमा करण्याचे काम पोलीस करत आहेत.
नवीन गाड्या खरेदी केलेल्यांना ‘तुम्ही खरेदी केलेल्या गाडीवर बक्षीस लागले आहे. तुम्ही हॉटेलमध्ये येऊन तुमचे बक्षीस घेऊन जा’, असे सांगून तसेच अतिशय अल्प खर्चात काही मास परदेशगमन करण्याचे आमिष उच्चवर्गीय लोकांना दाखवून त्यांना संपर्कासाठी कुडाळ येथील ‘हॉटेल स्पाईस कोकण’मध्ये बोलावण्याचा प्रकार गेले ३ दिवस चालू होता. हा प्रकार हॉटेल मालक राकेश म्हाडदळकर यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी कुडाळ शहरातील उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, रोटरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अधिवक्ता राजीव बिले, युवा सेनेचे संदीप म्हाडेश्वर आदींना माहिती दिली. त्यानंतर दुपारी शहरातील काही लोकप्रतिनिधी आणि काही संघटना यांच्या प्रतिनिधींनी या हॉटेलमध्ये जाऊन या प्रकाराची माहिती घेतली. त्या वेळी लोकांची फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले. विविध आमिषे दाखवून ११ सप्टेंबर या एका दिवशी या व्यक्तीने १ लाख ३५ सहस्र रुपये जमवले. स्वत:चे बिंग फुटल्याचे लक्षात येताच या टोळीतील काही मुली आणि अन्य कर्मचारी पसार झाले; मात्र ज्या २ व्यक्ती सापडल्या त्यांना पोलिसांच्या कह्यात देण्यात आले. ‘लक्झरीज क्लब प्रा.लि.’च्या नावाखाली हा प्रकार चालू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.