इंग्लंडच्या गृहसचिव सुएला ब्रेव्हरमन यांच्या कुटुंबियांची भूमी बांधकाम व्यावसायिकाला विकल्याचे उघड
भूमी बळकावल्याचे प्रकरण
पणजी, ११ सप्टेंबर (वार्ता.) – इंग्लंडच्या गृहसचिव सुएला ब्रेव्हरमन यांच्या कुटुंबियांच्या भूमीचा बहुतांश भाग वर्ष २०१९ मध्ये पुणेस्थित बांधकाम व्यावसायिक ‘एव्हियान शिरे डेव्हलपर्स’ यांना विकल्याचे उघड झाले आहे.
इंग्लंडच्या गृह सचिव सुएला ब्रेव्हरमन यांचे वडील ख्रिस्ती सांतानो गॉडफ्रे फर्नांडिस यांना गोव्यातील शासनाकडून भूमीच्या ‘इन्व्हेंटरी प्रोसिडिंग्स’संबंधी सूचना मिळाल्यानंतर त्यांना त्यांची भूमी अज्ञाताने बळकावल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी त्वरित ईमेल करून याविषयीची तक्रार ८ सप्टेंबर २०२२ या दिवशी गोव्याचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि अनिवासी भारतीय आयुक्त यांच्याकडे नोंदवली. भूमी बळकावल्याच्या प्रकरणी स्थापन झालेल्या विशेष अन्वेषण पथकाने या प्रकरणी अन्वेषणाला प्रारंभ केला आहे आणि या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ख्रिस्ती सांतानो गॉडफ्रे फर्नांडिस यांच्या कुटुंबियांची आसगाव येथे सर्व्हे क्रमांक २५३/३ आणि २५२/३ मध्ये भूमी आहे. त्यांची भूमी बनावट ‘पावर ऑफ ॲटर्नी’ (प्रशासकीय कामकाजासाठी मूळ मालकाने दिलेला अधिकार) बनवून भूमी बळकावली आणि ती पुढे एका बांधकाम व्यावसायिकाला विकली, अशी तक्रार करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार त्यांच्या कुटुंबियातीलच एका सदस्याने वर्ष २०१८ मध्ये बनावट ‘पावर ऑफ ॲटर्नी’ द्वारे एका व्यक्तीला ही भूमी विकली. यानंतर संबंधित व्यक्तीने ही भूमी बांधकाम व्यावसायिकाला विकली आहे. बांधकाम व्यासायिक आता त्या ठिकाणी ८ बंगले बांधत आहे. या भूमीला २४ सप्टेंबर २०२० मध्ये ‘कन्हर्जन सनद’ (भूमीच्या रुपांतराची सनद), २१ ऑक्टोबर २०२० या दिवशी शहर आणि नगर नियोजन खात्याच्या म्हापसा विभागाने ‘टेक्निकल क्लिअरन्स’ (तांत्रिक दृष्ट्या अनुमती), २ नोव्हेंबर २०२० या दिवशी शिवोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने ‘सॅनिटेशन’साठी (मलनिस्सारणासाठी) ‘ना हरकत दाखला’, तर २० फेब्रुवारी २०२१ या दिवशी गोव्यातील एका अधिवक्त्याने ‘सर्टिफिकेट ऑफ टायटल’ (शीर्षक प्रमाणपत्र किंवा मालकी हक्काचे प्रमाणपत्र) दिले.