पुणे येथे ३ लाखांहून अधिक गणेशमूर्तींचे धर्मशास्त्रविसंगत विसर्जन !
पुणे – अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे ९ सप्टेंबर या दिवशी ३ लाख १० सहस्र १५८ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये ६८ सहस्र ५४७ मूर्तींचे बांधलेल्या हौदात, १ लाख ३२ सहस्र ९९९ मूर्तींचे लोखंडी टाक्यांमध्ये, ४० सहस्र ५२२ मूर्तींचे फिरत्या हौदात विसर्जन करण्यात आले. ६८ सहस्र ९० मूर्तींचे संकलन करण्यात आले. तसेच ४ लाख ४ सहस्र ३४७ किलो निर्माल्य संकलित करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली. कोंढवा-येवलेवाडी, वानवडी-रामटेकडी आणि कसबा-विश्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत या दिवशी एकाही मूर्तीचे संकलन झाले नाही.
हिंदु धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती आणि निर्माल्य यांचे वहात्या पाण्यात विसर्जन करणेच उचित आहे, असे सांगितले आहे. त्यातून मूर्तीतील पवित्रके दूरवर पसरली जाऊन सर्वांनाच त्याचा लाभ होतो. कृत्रिम हौद, टाक्या यांच्यात विसर्जन केलेल्या मूर्तींतून हा लाभ कसा साध्य होणार ? वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जन करणे हा समस्त गणेशभक्तांचा धार्मिक अधिकार आहे.