श्राद्धविधीची तोंडओळख आणि त्याचा इतिहास
#Datta Datta #दत्त दत्त #श्रीदत्त श्रीदत्त #ShriDatta ShriDatta #mahalaya mahalaya #महालय महालय #pitrupaksha pitrupaksha #पितृपक्ष पितृपक्ष #shraddha shraddha #श्राद्ध श्राद्ध #ShraddhaRituals Shraddha rituals #श्राद्धविधी श्राद्धविधी #Shraddhavidhi Shraddha vidhi
भारतीय संस्कृती असे सांगते की, ज्याप्रमाणे माता-पिता, तसेच निकटवर्तीय हयात असतांना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो, त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते. त्या कर्तव्यपूर्तीची आणि त्याद्वारे पितृऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते. लहानपणी तळहातावरील फोडाप्रमाणे आपल्याला जपणार्या आपल्या माता-पित्यांचा मृत्यूत्तर प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे वासनायुक्त पितर वाईट शक्तींच्या कह्यात जाऊन त्यांचे गुलाम झाल्याने अनिष्ट शक्तींनी पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता अधिक असते. श्राद्धविधीमुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते. विशिष्ट वार, तिथी आणि नक्षत्र यांना श्राद्ध केल्याने पितृकर्म होण्यासमवेतच विशिष्ट फलप्राप्तीही होते. अशा विभिन्न पैलूंद्वारे श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ सध्या चालू असलेल्या पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून जाणून घेऊया.
१. श्राद्धविधीची तोंडओळख
१ अ. ‘श्राद्ध’ या शब्दाच्या संदर्भातील माहिती
१ अ १. व्युत्पत्ती आणि अर्थ : ‘श्रद्धा’ या शब्दापासून ‘श्राद्ध’ हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले, त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते, ते ‘श्राद्ध’ होय.
१ अ २. व्याख्या : ब्रह्मपुराणाच्या ‘श्राद्ध’ या प्रकरणात श्राद्धाची पुढील व्याख्या दिली आहे –
देशे काले च पात्रे च श्रद्धया विधिना च यत् ।
पितॄनुद्दिश्य विप्रेभ्यो दत्तं श्राद्धमुदाहृतम् ॥ – ब्रह्मपुराण
अर्थ : देश, काल आणि पात्र (योग्य स्थळ) यांना अनुलक्षून श्रद्धा अन् विधी यांनी युक्त असे पितरांना उद्देशून ब्राह्मणांना जे (अन्नादी) दिले जाते, त्याला श्राद्ध म्हणावे.
१ अ ३. ‘श्राद्ध’ म्हणजे ‘पितरांचे कृतज्ञतेने स्मरण करणे’, एवढेच नाही, तर तो एक विधी आहे.’
१ अ ४. समानार्थी शब्द : श्राद्धात्व पिंड, पितृपूजा आणि पितृयज्ञ.
१ आ. श्राद्धविधीचा इतिहास
१. ‘श्राद्धविधीची मूळ कल्पना ब्रह्मदेवाचा पुत्र अत्रिऋषी यांची. अत्रिऋषींनी त्यांच्या वंशातील निमीला ब्रह्मदेवाने घालून दिलेला श्राद्धविधी सांगितला. तो रुढ आचार आजही चालू आहे.
२. मनूने प्रथम श्राद्धक्रिया केली; म्हणून मनूला श्राद्धदेव म्हणतात.’
३. लक्ष्मण आणि जानकी यांसह राम वनवासासाठी गेल्यानंतर भरत त्यांची वनवासात भेट घेतो अन् त्यांना पित्याच्या निधनाची वार्ता सांगतो. त्यानंतर राम यथाकाली वडिलांचे श्राद्ध करतो, असा उल्लेख रामायणात आहे.
१ इ. इतिहासक्रमाने रूढ झालेल्या श्राद्धाच्या तीन अवस्था आणि सांप्रत काळातील अवस्था
१ इ १. अग्नौकरण : ऋग्वेदकाली समिधा आणि पिंड यांची अग्नीत आहुती देऊन पितृपूजा केली जात असे.
१ इ २. पिंडदान (पिंडपूजा) : यजुर्वेद, ब्राह्मणे आणि श्रौत अन् गृह्य सूत्रे यांत पिंडदानाचे विधान आहे. गृह्यसूत्रांच्या काळात पिंडदान प्रचारात आले. ‘पिंडपूजा कधी चालू झाली, याविषयीची पुढील माहिती महाभारतात (पर्व १२, अध्याय ३, श्लोक ३४५) दिली आहे – श्रीविष्णूचा अवतार वराहदेव याने श्राद्धाची संपूर्ण कल्पना विश्वाला दिली. त्याने आपल्या दाढेतून तीन पिंड काढून ते दक्षिण दिशेला दर्भावर ठेवले. ‘त्या तीन पिंडांना वडील, आजोबा आणि पणजोबा यांचे स्वरूप समजले जावे’, असे सांगून त्या पिंडांची तिळांनी शास्त्रोक्त पूजा करून वराहदेव अंतर्धान पावला. अशा प्रकारे वराहदेवाच्या सांगण्याप्रमाणे पितरांच्या पिंडपूजेला आरंभ झाला.’
१ इ ३. ब्राह्मणभोजन : गृह्यसूत्रे, श्रृति-स्मृति यांच्या पुढील काळात श्राद्धात ब्राह्मणभोजन आवश्यक मानले गेले आणि तो श्राद्धविधीतला एक प्रमुख भाग ठरला.
१ इ ४. वरील तीनही अवस्था एकत्रित : सांप्रत काळातील ‘पार्वण’ श्राद्धात वरील तीनही अवस्था एकत्रित झाल्या आहेत. धर्मशास्त्रात हे श्राद्ध गृहस्थाश्रमींना कर्तव्य म्हणून सांगितले आहे.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’)
पितरांना गती का मिळत नाही ?१. कलियुगात विषय-वासना तीव्र असल्यामुळे लिंगदेह जड होऊन मृत्यूनंतर गती मिळणे कठीण होणे : ‘कलियुगात पूर्वीप्रमाणे साधनेला प्राधान्य दिले जात नाही. त्यामुळे आपल्यावरील विषय आणि वासना यांचे संस्कार फार तीव्र होतात. मृत्यूनंतरही ते संस्कार आपल्या लिंगदेहात तसेच रहातात. असा लिंगदेह जड असल्यामुळे मृत्यूनंतर त्याला गती मिळणे कठीण होते आणि ते अडकून बसतात. यालाच ‘पितरांना गती मिळाली नाही’, असे म्हणतात. (साभार : मासिक, ‘वैदिक उपासना’ वर्ष २/अंक ६ वा, ऑगस्ट-सप्टेंबर २०१८) |
Sanatan Sanstha presents Shraddha Rituals App !
App is available in – Marathi, Hindi, Kannada, Gujarati, Telugu, Malayalam & English