शिक्षकांचे कर्तव्य !
शाळा हे विद्येचे मंदिर आहे. तेथे ज्ञानार्जन केले जाते. शाळेतूनच मनुष्य खर्या अर्थाने घडतो. मानवाच्या उज्ज्वल भविष्यात शाळेचा महत्त्वाचा वाटा आहे. शाळेचे महत्त्व सर्वांनाच ठाऊक आहे; पण आज हाताच्या बोटांवर मोजता येतील, इतक्या शाळा सोडल्या, तर अन्य सर्वच शाळा स्वतःचे कर्तव्य पार पाडतात का ? हा मोठा प्रश्नच आहे. एका शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले, ‘‘तुम्ही शाळेतील अभ्यासावर अवलंबून राहू नका. तुम्ही शिकवणीवर्गालाही जा.’’ जर असे असेल, तर शाळेतील शिक्षकांचे दायित्व काय ? खरेतर शिक्षकांनी इतके उत्तम आणि दर्जेदार शिकवायला हवे की, विद्यार्थ्यांना शिकवणीवर्गाला जाण्याची आवश्यकताच भासणार नाही. विद्यार्थी शिकवणीवर्गाला जातात, हे ऐकल्यानंतर ज्या शिक्षकाला ‘मी विद्यार्थ्यांना घडवण्यात अल्प पडलो’, असे वाटेल, तेच खरे शिक्षक म्हणावे लागतील; परंतु दुर्दैवाने या उदाहरणातून शिक्षकांची तशी स्थिती नाही, असेच म्हणावे लागेल.
पूर्वीच्या काळी कुठे होते शिकवणीवर्ग ? शाळेतच विद्यार्थ्यांचा परिपूर्ण अभ्यास करून घेतला जात असे. त्यातूनच त्यांचा सर्वांगीण विकास व्हायचा; मात्र सध्याचे विद्यार्थी शिकवणीवर्गाला जात असल्याने शाळेमध्ये शिक्षक शिकवतांनाही त्याकडे ते तितकेसे लक्षच देत नाहीत. त्यामुळे एकप्रकारे विद्यार्थ्यांचा शाळेतील वेळ वाया जातो कि काय ? असाच विचार कुणाच्याही मनात येईल, तसेच शाळेतील शिक्षणाचा त्यांना विशेष लाभ होत नाही, असे म्हणायचे का ? एकूणच विद्यार्थ्यांची ‘शिकवणीवर्गात जाऊनच अभ्यास करूया’, अशी अयोग्य मानसिकता झाली आहे. याचाच अपलाभ शिकवणीवर्ग चालक घेतात. ते मनमानीपणे वागून पालकांची आर्थिक फसवणूक करतात. मोठमोठी विज्ञापने करून विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात ओढू पहातात आणि स्वार्थ साधतात. यासमवेतच विद्यार्थी शिकवणीवर्गाला जातात, या नावाखाली शिक्षकांनी स्वतः शिकवण्याचा दर्जा न्यून करणे हेही अयोग्यच आहे. स्वत:च्या कर्तव्यापासून शिक्षकांनी दूर जाता कामा नये.
‘भावी पिढी घडवण्याचे दायित्व आपल्यावर आहे’, याचा विसर शिक्षकांनी एक क्षणही पडू देऊ नये. आदर्श शिक्षक म्हणजे, ‘विद्यार्थी माझ्याकडूनच घडला पाहिजे. त्यासाठी मी विद्यार्थ्यांसाठी हवे ते कष्ट घेईन.’ शिक्षक विद्यार्थ्यांसाठी नेहमीच आदर्श असतात. त्यामुळे शिक्षकांनी ज्ञान प्रदान करण्याचे कर्तव्य उत्तमरित्या पार पाडावे.
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.