महालय श्राद्ध विशेषांकाचे प्रयोजन !
श्राद्धविधी केल्याने पितर संतुष्ट होऊन त्यांच्यामुळे होणार्या त्रासांचे निवारण होते !
‘श्राद्ध’ म्हटले की, हल्लीच्या विज्ञानयुगातील तरुण पिढीच्या मनात ‘अशास्त्रीय आणि अवास्तव कर्मकांडाचे अवडंबर’, अशी त्याविषयीची चुकीची प्रतिमा उभी रहाते. हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही ४ ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी ‘श्राद्ध’ आवश्यक असते.
श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. श्राद्धामुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते. श्राद्धाचे इतके महत्त्व असतांनाही आज हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव, त्यांचा अध्यात्मावरील अविश्वास, त्यांच्या विचारसरणीवर पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाची चढलेली पुटे आदींमुळे श्राद्धविधी दुर्लक्षिला वा अवास्तव अवाजवी कर्मकांडात गणला जाऊ लागला आहे; म्हणूनच अन्य संस्कारांइतकाच ‘श्राद्ध’ हा संस्कारही अत्यावश्यक कसा आहे ?, हे सांगणे क्रमप्राप्त ठरते.
श्राद्धाविषयी पुढीलसारखी विचारसरणीही समाजात आढळून येते. पूजाअर्चा, श्राद्धपक्ष यांवर विश्वास न ठेवणारे किंवा समाजकार्यच सर्वश्रेष्ठ आहे, असे म्हणणारे, ‘पितरांसाठी श्राद्धविधी न करता त्याऐवजी गरिबांना अन्नदान करू किंवा शाळेला साहाय्य करू’, असे म्हणतात ! त्याप्रमाणे कित्येक जण करतातही ! असे करणे म्हणजे, ‘एखाद्या रोग्यावर शस्त्रक्रिया न करता त्याऐवजी आम्ही गरिबांना अन्नदान करू, शाळेला साहाय्य करू’, असे म्हणण्यासारखे आहे. वरील प्रकारची विचारसरणी असणार्या व्यक्तींच्या डोळ्यांवरील अज्ञान आणि अंधविश्वास यांचे पटल दूर सारून त्यांना ‘श्राद्ध’ या हिंदु धर्मातील पवित्र संस्काराकडे पहाण्याची सकारात्मक अन् अध्यात्मशास्त्रीय दृष्टी लाभावी, या हेतूने या विशेषांकाचे प्रयोजन केले आहे.
श्राद्ध करण्याचा उद्देश
सर्वच जिवांचे लिंगदेह साधना करणारे नसल्याने श्राद्धादी विधी करून त्यांना बाह्य ऊर्जेच्या बळावर पुढे ढकलावे लागते; म्हणून श्राद्ध करणे महत्त्वाचे ठरते. श्राद्ध करून जिवांच्या लिंगदेहांभोवती असलेले वासनात्मक कोषांचे आवरण अल्प करून त्यांना हलकेपणा प्राप्त करून देऊन मंत्रशक्तीच्या ऊर्जेवर त्यांना गती देणे, हा श्राद्ध करण्याचा मुख्य उद्देश आहे.
१. पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकांत जाण्यासाठी गती मिळावी, यासाठी श्राद्धविधींद्वारे त्यांना साहाय्य करणे.
२. आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त वासनांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल, म्हणजेच ते उच्च लोकात न जाता नीच लोकात अडकून पडले असतील, त्यांच्या इच्छा-आकांक्षा श्राद्धविधींद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे.
३. काही पितर त्यांच्या कुकर्मांमुळे पितृलोकात न जाता त्यांना भूतयोनी लाभते. अशा पितरांना श्राद्धाद्वारे त्या योनीतून मुक्त करणे.
श्राद्ध तिथीनुसार का करावे ?सर्वसाधारणतः अमावास्या, वर्षातल्या बारा संक्रांती, चंद्र-सूर्य ग्रहणे, युगादी आणि मन्वादी तिथी, अर्धोदयादी पर्वे, मृत्यूदिन, श्रोत्रिय ब्राह्मणांचे आगमन इत्यादी तिथी या श्राद्ध करण्यासाठी योग्य आहेत. ‘प्रत्येक गोष्ट ही त्याच्या कार्यकारण-भावासहित जन्माला येते. प्रत्येक गोष्टीची परिणामकारकता ही त्याचा कार्यमान कर्ता, कार्यातील योग्य घटिका आणि कार्यस्थळ यांवर अवलंबून असते. या सर्वांच्या पूरकतेवर कार्याची फलनिष्पत्ती, म्हणजेच परिपूर्णता ठरून कर्त्याला विशिष्ट फलप्राप्ती होते. ही गोष्ट ज्या वेळी ईश्वरी नियोजनाच्या म्हणजेच प्रवृत्ती आणि प्रकृती यांच्या संगमाने घडते, त्या वेळी ती प्रत्यक्ष इच्छा, क्रिया आणि ज्ञान या ३ स्तरांवरील शक्तीच्या साहाय्याने सगुण रूप धारण करून साकार होते. तिथी ही प्रकृतीला आवश्यक, म्हणजेच बळ देणारी म्हणजेच मूळ ऊर्जास्वरूप आहे, तर त्या तिथीला त्या त्या जिवाच्या नावाने घडणारे कर्म हे त्यातून उत्पन्न होणार्या प्रवृत्तीला, म्हणजेच फलनिष्पत्तीस पोषक आहे. प्रत्येक गोष्ट त्या त्या तिथीला आणि त्या त्या मुहूर्ताला करणे महत्त्वाचे आहे; कारण या दिवशी त्या त्या घटनात्मक कर्मांचे कालचक्र आणि त्यांचा प्रत्यक्ष घटनाक्रम, त्यातून उत्पन्न होणारा परिणाम या सर्वांची स्पंदने एकसारखी म्हणजेच एकमेकांना पूरक असतात. ‘तिथी’ ही तो तो घटनाक्रम पूर्णत्वास नेण्यास आवश्यक असणार्या लहरी कार्यरत करणारी असते.’ – एक विद्वान (सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, सायं. ६.०२) |
पितृपक्ष (महालयपक्ष)
भाद्रपदातील कृष्ण पक्षाला ‘पितृपक्ष’ म्हणतात. हा पक्ष पितरांना प्रिय आहे. या पक्षात पितरांचे महालय श्राद्ध केले असता, ते वर्षभर तृप्त रहातात.
सूर्ये कन्यागते श्राद्धं यो न कुर्याद् गृहाश्रमी ।
धनं पुत्राः कुतस्तस्य पितृनिःश्वासपीडया ॥ – गार्ग्य (श्राद्धकल्पलता, पृष्ठ ९७)
अर्थ : जो गृहस्थ सूर्य कन्या राशीत असतांना (पितृपक्षात) श्राद्ध करत नाही त्याला पितरांचे दुःखी निःश्वास पिडतात. अशाला धन आणि पुत्र कसे बरे प्राप्त होतील ?
पितृलोक रिकामा असतो, याचा अर्थ असा की, त्या काळात कुळातील सर्व पितर आशीर्वाद देण्यासाठी आपल्या वंशजांजवळ येतात आणि श्राद्ध न केल्यास आपल्याला शाप देऊन निघून जातात. त्यामुळे या काळात श्राद्ध करणे महत्त्वाचे ठरते.
पौर्णिमा या तिथीला पिता किंवा अन्य नातेवाईक मृत झाले असतील, तर या पक्षातील भरणी नक्षत्र, अष्टमी, द्वादशी किंवा अमावास्या या दिवशी श्राद्ध करावे.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र’)
सर्वपित्री अमावास्येचे महत्त्व !
पितृपक्षातील (भाद्रपद मासातील) अमावास्येला सर्वपित्री अमावास्या म्हणतात. या तिथीला कुळातील सर्व पितरांना उद्देशून श्राद्ध करतात. वर्षभरात नेहमी आणि पितृपक्षातील इतर तिथींना श्राद्ध करणे जमले नाही, तरी या तिथीला सर्वांनी श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण पितृपक्षातील ही शेवटची तिथी आहे. अमावास्या ही श्राद्ध करण्यास जास्त योग्य तिथी आहे, तर पितृपक्षातील अमावास्या ही सर्वाधिक योग्य तिथी आहे, असे शास्त्रात सांगितले आहे.
या दिवशी बहुतेकजण किमान एक तरी ब्राह्मण भोजनासाठी बोलावतात. कोळी, ठाकूर, कातकरी, कुणबी आदी जातींत पितरांच्या उद्देशाने या दिवशी भाताचे अथवा पिठाचे पिंड देतात आणि आपल्याच जातीतील काही लोकांना जेवायला घालतात. यांच्यात या दिवशी ब्राह्मणांना शिधा देण्याचीही रूढी आहे.
श्राद्धाची आवश्यकता
श्राद्ध विधी केल्याने पितर संतुष्ट होऊन त्यांना पुढील गती मिळणे !
हल्लीच्या काळात पूर्वीप्रमाणे कुणी श्राद्धादी विधी, तसेच साधनाही करीत नसल्याने बहुतेक सर्वांनाच अतृप्त पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो. आपल्याला पूर्वज त्रास देत आहेत किंवा पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे, याविषयी उन्नतच (संतच) सांगू शकतात. तसे सांगणारे उन्नत न भेटल्यास पुढे दिल्याप्रमाणे काही प्रकारचे त्रास पूर्वजांमुळे होतात, असे समजावे – घरात सातत्याने भांडणे होणे, एकमेकांशी न पटणे, नोकरी न मिळणे, घरात पैसा फार काळ न टिकणे, एखाद्याला गंभीर विकार होणे, सर्व परिस्थिती अनुकूल असूनही लग्न न होणे, पती-पत्नीचे न पटणे, गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, अपत्य जन्माला आल्यास मतीमंद किंवा विकलांग जन्माला येणे अन् कुटुंबातील एखाद्याला व्यसन लागणे.
श्राद्धविधी केल्याने पितर संतुष्ट होतात. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद लाभतात, तसेच मर्त्यलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळाल्याने त्यांच्यामुळे होणार्या त्रासांचे निवारण होते.
श्राद्ध केल्यानंतर क्रियात्मक यमलहरींमुळे लिंगदेहाला सद्गती मिळणे !
‘श्राद्ध करणे म्हणजे, पितरांच्या लिंगदेहाला गती देण्यासाठी ब्रह्मांडातील ऊर्जात्मक यमलहरींना आवाहन करणे होय. या प्रार्थनारूपी आवाहनामुळे ब्रह्मांडातील दत्ततत्त्वाशी संबंधित इच्छालहरी कार्यरत होऊन पितरांच्या लिंगदेहाशी संबंधित यमलहरींना आपल्या आकर्षणशक्तीच्या बळावर खेचून पृथ्वीच्या कक्षेत आणतात. बरेच लिंगदेह हे मर्त्यलोकामध्ये अडकलेले असतात. या लिंगदेहांना गती मिळण्यासाठी क्रियात्मक यमलहरींची आवश्यकता असते. या क्रियात्मक यमलहरींना श्राद्धकर्मामध्ये आवाहन केले असता, पितरांच्या लिंगदेहाभोवती असलेले वायूमंडल कार्यरत होऊन, या लहरींच्या बळावर लिंगदेह पुढच्या टप्प्यात ढकलला जातो, म्हणजेच लिंगदेहाला सद्गती मिळते.’ – एक विद्वान (सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून, १.३.२००५)
श्राद्धविधी मनापासून का करावा ?
श्राद्धविधींच्या वेळी मनोव्यापार चालू असल्यास श्राद्धकर्त्याचा वासनादेह अन् मनोदेह यांतून बाहेर पडणारी आंदोलने आणि विचारचित्रे यांचा मृत माणसाच्या मनावर पुष्कळ परिणाम होत असतो; म्हणून श्राद्ध मनापासून, एकाग्र चित्ताने अन् नीटनेटके करावे.
कोणतीही धार्मिक कृती भावासह केल्यास त्या कृतीचे फळ अधिक मिळते. या नियमानुसार श्राद्धकर्म केवळ यंत्रवत् करण्यापेक्षा ‘पूर्वज तृप्त होऊन त्यांना लवकर गती मिळावी’, अशी तीव्र इच्छा ठेवून केल्यास त्याचे फळ अधिक मिळते. आपल्या सदिच्छा आणि आपण देऊ केलेले अन्न पूर्वजांच्या लिंगदेहांना सूक्ष्मातून मिळते, हे काल्पनिक नसून प्रत्यक्षात घडते.
संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र’
(सौजन्य : सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संकेत स्थळ sanatan.org)
Sanatan Sanstha presents Shraddha Rituals App !
App is available in – Marathi, Hindi, Kannada, Gujarati, Telugu, Malayalam & English