अमेरिकेत नोकरीसाठी असतांना झालेल्या प्रसंगांचे चिंतन केल्यावर साधिकेला लक्षात आलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपार कृपा !

सुश्री (कु.) सुप्रिया गजेंद्र टोणपे या नोकरीनिमित्त ७ वर्षे अमेरिकेत वास्तव्याला होत्या. तेथील रज-तम प्रधान वातावरणातही त्यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू ठेवली. केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेमुळेच त्या हे करू शकल्या, असा त्यांचा भाव आहे. आता त्या चांगल्या वेतनाची नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करण्यासाठी भारतात परत आल्या आहेत.

सुश्री (कु.) सुप्रिया टोणपे

१. अमेरिकेत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सतत सत्मध्ये ठेवणे

‘पहिल्यांदा मी अमेरिकेत गेल्यावर दुसर्‍या-तिसर्‍या आठवड्यापासून मला पू. (सौ.) भावना शिंदे यांचा नियमित सत्संग लाभला. सौ. रिशिता गडोया माझा नियमितपणे व्यष्टी साधनेचा आढावा घेत असत. मी प.पू. भक्तराज महाराज यांची भजने, ‘ऑनलाईन’ दैनिक ‘सनातन प्रभात’, तिथल्या साधकांशी संपर्क इत्यादींमुळे सतत सत्मध्ये राहिले. पू. (सौ.) भावना शिंदे आणि सौ. रिशिता या पुष्कळ प्रेमाने माझी विचारपूस करत असल्यामुळे मला साधना करण्यासाठी शक्ती मिळत होती. गुरुदेवांनीच सत्संग, साधक आणि सेवा यांच्या माध्यमातून माझ्या मनात ‘योग्य आणि अयोग्य काय ?’, याची जाणीव सतत जागृत ठेवली.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सुरक्षित वातावरण लाभणे

अमेरिकेतील वातावरणात रज-तम अधिक असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला सुरक्षित वातावरण देऊन माझी काळजी घेतली. तिथे मला चांगल्या मित्र-मैत्रिणी मिळाल्या. त्या मला समजून घेऊन माझी काळजी घेत असत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मी कधी कुठल्याही मोहमायेत अडकले नाही. त्यांनीच मला फुलाप्रमाणे जपले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला केवळ अमेरिकेतच नव्हे, तर लहानपणापासूनच घर, शाळा, महाविद्यालय, समाज, नोकरी अशा सर्वच ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळाले’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे अमेरिकेतील नोकरी सोडतांना इतरांसारखे दुःख न होता साधना करण्यासाठी सहजतेने भारतात परत येता येणे

केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला अमेरिकेतील नोकरी सोडून साधना करण्यासाठी भारतात परत येता आले. तेव्हा इतरांसारखा माझ्या मनाचा संघर्ष झाला नाही किंवा मी दुःखी झाले नाही. केवळ ‘देवाला जे अपेक्षित आहे, तेच मी करत आहे. पुढे कधी ना कधी मी मायदेशी परतणारच होते, ते आता परतत आहे’, हाच विचार मनात होता. देवाने माझ्या मनाची स्थिती चांगली ठेवली.

४. कृतज्ञता

हे सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे नियोजन होते आणि त्यांच्याच कृपेने सर्व झाले. यात माझे श्रेष्ठत्व किंवा कर्तेपणा काहीच नव्हता. सौ. सुप्रिया माथूरताईंनी घेतलेल्या स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया सत्संगामुळे मला याची जाणीव झाली. मी वरील गोष्टींचा कर्तेपणा स्वतःकडे घेतल्यास तो माझे श्री गुरु आणि माझे वडील यांच्याप्रती कृतघ्नपणा ठरेल. ‘देवच माझ्यासाठी सतत सर्वकाही करत असतो; मात्र मी त्याचे सारे श्रेय स्वतःकडे घेऊन त्याचा कर्तेपणा जोपासते’, याची मला जाणीव झाली. परात्पर गुरु डॉ. आठवले, सौ. सुप्रियाताई आणि माझे वडील, या तिघांच्या चरणी मी अंतर्मनापासून कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– आपली चरणसेविका,
सुश्री (कु.) सुप्रिया गजेंद्र टोणपे, ढवळी, फोंडा, गोवा.(१५.१२.२०२१)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने पूर्णवेळ साधना करण्यासाठी टप्याटप्प्याने झालेली मनाची सिद्धता !

१. अमेरिकेत राहूनही मनाला समाधान न मिळणे आणि ‘साधनाच करायची’, असे ध्येय निश्चित होणे

‘मी नोकरीच्या निमित्ताने साधारण ७ वर्षे अमेरिकेत वास्तव्याला होते; पण माझे मन अमेरिकेत रमत नव्हते. ‘मला जीवनात काय हवे आहे ?’, हे मलाच कळत नव्हते. माझ्याकडे जे आहे, त्यात मला समाधान मिळत नव्हते. मी ‘काहीतरी शोधत आहे’, असे मला सतत वाटत असे. ‘मला लग्न करण्यात रस नव्हता आणि ‘मला साधनाच करायची आहे’, अशी माझी ध्येयनिश्चितीही झालेली होती.

२. मित्र-मैत्रिणींनी ‘अमेरिकेतील चांगली नोकरी सोडून भारतात परत येणे, म्हणजे मूर्खपणा आहे’, असे सांगणे; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे पूर्णवेळ साधना करण्याचे ठरवणे

मी भारतात परतण्याचा निर्णय घेतल्यावर माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींनी मला वेड्यात काढले. ‘मी भावनाशील होऊन अयोग्य निर्णय घेत आहे’, असे त्यांना वाटले. त्यांनी मला ‘इतकी चांगली नोकरी सोडून जाणे, म्हणजे मूर्खपणा आहे’, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; पण ‘वयाच्या चाळीशीनंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ साधना करायची’, असे माझे विचार होतेच; मात्र गुरुकृपेने मी त्याच्याही पुष्कळ आधीच नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करू लागले.’

– सुश्री (कु.) सुप्रिया टोणपे, ढवळी, फोंडा, गोवा. (१५.१२.२०२१)


रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहायला आल्यावर स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना सुश्री (कु.) सुप्रिया टोणपे यांना स्वतःमधील जाणवलेले अहंचे पैलू !

‘काही मासांपूर्वी सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) घेत असलेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी घेत असलेल्या प्रक्रिया सत्संगात बसण्याची अन् माझा व्यष्टी साधनेचा आढावा देण्याची मला संधी मिळाली. त्यामुळे मला माझ्या मनाचा आढावा घेऊन ‘माझ्यातील स्वभावदोष आणि अहं कसे शोधायचे ? त्यांच्या मुळाशी जाऊन प्रयत्न कसे करायचे ?’, हे समजले. त्यातून कित्येक वर्षांपासून माझ्या मनात असलेले अहंचे सूक्ष्म विचार मला टिपता आले. तेव्हा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता वाटून माझा शरणागतीचा भाव दाटून आला. त्यासाठी मी हा लेख कृतज्ञतास्वरूप त्यांच्या चरणी अर्पण करीत आहे.

१. ‘स्वतःला श्रेष्ठ समजणे’ आणि ‘कर्तेपणा’ हे सूक्ष्म अहंचे पैलू स्वतःमध्ये आहेत’, असे लक्षात येणे

सौ. सुप्रियाताईंनी आरंभी मला सर्व स्तरांवर माझ्या अहंच्या पैलूंची व्याप्ती काढण्यास सांगितली. तेव्हा मी माझ्या मनाचे खोलवर चिंतन करण्यास आरंभ केला. चिंतन केल्यावर माझ्यामध्ये ‘स्वतःला श्रेष्ठ समजणे’ आणि ‘कर्तेपणा’, हे सूक्ष्म अहंचे पैलू आहेत’, असे माझ्या लक्षात आले.

२. अमेरिकेत वास्तव्याला असतांनाही ‘कुठलेही व्यसन नसणे आणि काटकसरीने रहाणे’, याचा अहं असणे

मी नोकरीनिमित्त सुमारे ७ वर्षे अमेरिकेत वास्तव्याला होते. तेव्हाच्या काही गोष्टींचा माझ्या मनात कुठेतरी सूक्ष्म अहं होता, उदा. मी माझ्या अमेरिकेतील वास्तव्यात कधीही मद्यपान केले नाही, आमच्या आस्थापनात होणार्‍या बैठकांमध्ये कर्मचार्‍यांना दिली जाणारी बिअर मी कधीच घेतली नाही, मी कधीही ‘व्हॉट्स ॲप’ वापरले नाही, मी सामाजिक माध्यमांचा अनावश्यक वापर केला नाही, मी महागडे कपडे आणि फिरणे यांत अनावश्यक पैसे वाया घालवले नाहीत अन् कुटुंबियांनी निर्बंध घातला नसतांना मी काटकसरीने राहिले.

३. ‘लग्न किंवा स्वैराचार करण्याची संधी असतांनाही मी तसे वागले नाही’; म्हणून स्वतःला श्रेष्ठ समजणे

मी अमेरिकेत असतांना मला २ अमेरिकन सहकार्‍यांनी आणि ४ भारतीय सहकारी मित्रांनी लग्नासाठी विचारले होते. तेव्हा मी त्या मोह-मायेत अडकले नाही. तेथे माझ्या कुटुंबातील कुणी मला पहायला नव्हते, तरीही ‘स्वैराचार करावा’, अशी मला इच्छाही झाली नाही. ‘मी दिसायला साधारण असूनही माझ्यातील केवळ चांगल्या गुणांमुळे मी सहकार्‍यांना आवडते’, अशा प्रकारचे ‘स्वतःला श्रेष्ठ समजण्या’चे विचार माझ्या मनात होते. ते मला टिपता आले.’

– सुश्री (कु.) सुप्रिया टोणपे, ढवळी, फोंडा, गोवा. (१५.१२.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.