श्रीरामपूर येथे अपहरण, धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांच्या विरोधात भाजपचा जनआक्रोश मोर्चा !
राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणला पाहिजे ! – नितेश राणे, आमदार, भाजप
श्रीरामपूर (जिल्हा नगर) – नगर जिल्ह्यातील गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता असलेला हिंदु तरुण दीपक बर्डे याचा शोध लावावा, ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांचे सखोल अन्वेषण करावे, या मागण्यांसाठी आणि हिंदु मुलींचे अपहरण, धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात १० सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता भाजपचे आमदार नितेश राणे आणि माजी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. ‘राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणला पाहिजे’, अशी मागणी करून सर्व हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केले. या मोर्च्यात हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि आदिवासी संघटना यांचे कार्यकर्ते सहस्रोंच्या संख्येने उपस्थित होते. ३१ ऑगस्ट या दिवशी हिंदु तरुण दीपक बर्डे याने मुसलमान मुलीशी विवाह केल्यानंतर त्याचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
१. मोर्च्याच्या वेळी झालेल्या भाषणात नितेश राणे म्हणाले, ‘‘हिंदु तरुणींचे मोठ्या प्रमाणात अपहरण होत असतांनाही पोलीस अधिकारी माहिती द्यायला सिद्ध नाहीत. या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक राहिलेले नाहीत, तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आता हसन मुश्रीफ नाहीत, याचा विसर पोलिसांना पडलेला दिसतो. राज्यात हिंदुत्वनिष्ठ सरकार आल्यानेच या प्रकरणात कारवाई आणि चौकशी चालू झाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदूंना दाबण्यात आले. पीडित मुलींनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संपर्क केला पाहिजे.
२. ते म्हणाले, ‘‘राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करणार आहे. हा विषय गंभीरपणे घ्यायला हवा. धर्मांतराच्या घटना आज महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत. मी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. हिंदु मुला-मुलींचे भविष्य खराब होत आहे. त्या विरोधात आम्ही युद्ध पुकारले आहे.”
जनआक्रोश मोर्च्यातील मागण्या !
‘दीपक बर्डे याचा तात्काळ शोध घ्यावा, दीपक याच्या कुटुंबाला शासकीय साहाय्य त्वरित मिळावे, या प्रकरणी कट रचणार्यांना आरोपी करा, या गुन्ह्याचे अन्वेषण राज्य गुन्हे अन्वेषण (‘सीआयडी’कडे) वर्ग करण्यात यावे’, अशा मागण्यांचे फलक आंदोलनकर्त्यांनी हाती धरले होते.
क्षणचित्रे
१. मोर्च्यात ‘महिला, मुली यांना धर्म सांगा’, ‘लव्ह जिहाद’चे जाळे सांगा’, ‘एक आवाज हिंदु आवाज’, ‘नवी पिढी नवी दिशा आता धर्माची होऊ देणार नाही दुर्दशा’, ‘आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे’, ‘जिथे धर्मांतर तिथे राष्ट्रांतर’, असे फलक आंदोलकांनी हाती धरले होते.
२. ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या हिंदु तरुणींचे कुटुंबीय आणि बेपत्ता तरुण दीपक बर्डे याचे कुटुंबीय या मोर्च्यात सहभागी झाले होते. मोेर्च्याच्या वेळी पीडित तरुण आणि तरुणी यांच्या कुटुंबातील आई-वडिलांना अश्रू अनावर झाले.
३. मोर्च्याच्या वेळी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्च्यात महिलांची संख्या लक्षणीय होती.