शिवाजी विद्यापिठाच्या परीक्षा विभागात झालेल्या गोंधळाप्रकरणी अभाविप आंदोलन करणार !
सांगली, १० सप्टेंबर (वार्ता.) – शिवाजी विद्यापिठाच्या वर्ष २०२२ च्या सत्र परीक्षांचे निकाल टप्प्याटप्प्याने घोषित होत असतांना अनेक विद्यार्थ्यांना या निकालामध्ये समस्या आढळून आल्या आहेत. सहस्रो विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित असतांना ते अनुपस्थित दाखवण्यात आले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहेत, तर काही विद्यार्थ्यांना समान गुण मिळून त्यातील एक विद्यार्थी उत्तीर्ण, तर दुसरा अनुत्तीर्ण असे प्रकार झाले आहेत. या सर्व विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शिवाजी विद्यापिठाच्या कुलगुरूंना निवेदन दिल्यावरही विद्यापिठाने यात विद्यार्थ्यांची चूक आहे, असे सांगून दायित्व झटकले आहे, तरी शिवाजी विद्यापिठाच्या परीक्षा विभागातील सावळा गोंधळ प्रकरणी अभाविप आंदोलन करणार आहे, अशी माहिती सांगली अभाविपचे श्री. दर्शन मुंडदा यांनी दिली आहे.
या संदर्भात अभाविपच्या मागण्या
१. ज्या विद्यार्थ्यांच्या निकलामध्ये त्रुटी आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता विद्यापिठाने ‘ग्रेव्हिअन्स लिंक’ उपलब्ध करून द्यावी; जेणेकरून एकाही विद्यार्थ्याची हानी होणार नाही.
२. विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकन आणि उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी.
३. जे विद्यार्थी उपस्थित असूनही ‘ऑनलाईन’ निकालात अनुपस्थित दाखवण्यात आले आहेत, अशांचे निकाल तात्काळ घोषित करावेत.
संपादकीय भूमिकाशिवाजी विद्यापिठाच्या परीक्षा विभागात झालेला सावळा गोंधळ विद्यापीठ प्रशासन दायित्वाने का सोडवत नाही ? यासाठी आंदोलन का करावे लागते ? प्रत्येक समस्या आंदोलन, बंद अशा कृती केल्यावरच प्रशासन सोडवणार का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? |