प्रभादेवी (मुंबई) येथे बेस्टच्या वीज सबस्टेशन केबिनला भीषण आग !
दोन मोठे ट्रान्सफॉर्मर आणि तीन मोठे स्विच जळून खाक
मुंबई – प्रभादेवी येथील दैनिक ‘सामना’च्या कार्यालयाजवळ असणार्या बेस्टच्या वीज सबस्टेशन केबिनला १० सप्टेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. या घटनेमुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. या आगीत दोन मोठे ट्रान्सफॉर्मर आणि तीन मोठे स्विच जळून खाक झाले आहेत, तर केबिनजवळील ५ दुचाकींना आगीची झळ बसल्याने हानी झाली आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. परिसरातील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करणे हे मोठे आव्हान आहे.