मुंबई, रायगड आणि रत्नागिरी येथील समुद्रकिनार्यांवर आलेले श्री गणेशमूर्तींचे अवशेष उचलले !
मनसेच्या वतीने ‘आपला समुद्रकिनारा, आपले दायित्व’ मोहीम !
मुंबई, १० सप्टेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी १० सप्टेंबर या दिवशी ‘आपला समुद्रकिनारा, आपले दायित्व’ या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. अनेक पर्यावरणप्रेमींसह अमित ठाकरे यांनी दादर समुद्रकिनार्यावर वाळूत रुतलेले गणेशमूर्तींचे अवशेष, तसेच निर्माल्य उचलून किनारा स्वच्छ केला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत पक्षाचे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस संदीप देशपांडे, मनसे पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे, पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोहिमेत सहभागी झाले होते.
गिरगाव, दादर, माहीम, वांद्रे, जुहू, वर्सोवा आणि अक्सा येथे, रायगड जिल्ह्यातील उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग आणि मुरूड येथे, तर रत्नागिरी जिल्ह्यातील मांडवी येथे सकाळी ८ ते १० या कालावधीत पक्षाच्या वतीने राबवण्यात आलेल्या ‘समुद्रकिनारा स्वच्छता’ मोहिमेत पक्षाचे पदाधिकारी, असंख्य नागरिक, तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्वांनी गणेशमूर्ती विसर्जनानंतर समुद्राची भरती आणि ओहोटी यांमुळे किनार्यावर आलेले गणेशमूर्तींचे अवशेष आणि निर्माल्य गोळा करून ते स्थानिक प्रशासनाकडे सोपवले.