‘इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तिसवाडी (गोवा)’ शाखेच्या वैद्यकीय शैक्षणिक कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘मनोविकार आणि अध्यात्मशास्त्र’ या विषयावर प्रबोधन !
महर्षि अधात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन विभागाच्या समन्वयक सेविका आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांच्याकडून विषय सादर !
फोंडा, १० सप्टेंबर (वार्ता.) – ९ सप्टेंबर या दिवशी ‘इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आय.एम्.आय.च्या) तिसवाडी (गोवा)’ शाखेच्या ‘सी.एम्.ई.’ (CME) मध्ये ‘अध्यात्मशास्त्राचे मनोविकारांमागील कारणे, उपचार आणि प्रतिबंध यांतील स्थान’ या विषयावर पावरपॉईंटच्या माध्यमातून ऑनलाईन सादरीकरण करण्यात आले. महर्षि अधात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन विभागाच्या समन्वयक सेविका आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत (मानसोपचारतज्ञ) यांनी हे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे आयोजन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तिसवाडी (गोवा) शाखेच्या कार्यकारी समितीने केले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन शाखेच्या अधिकृत सी.एम्.ई. (CME) कार्यक्रमात करण्यात आले होते.
या सादरीकरणात आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी पुढील सूत्रे मांडली.
१. जगभरातील वैद्यकीय क्षेत्रात अध्यात्मशास्त्राबद्दल वाढत असलेली जिज्ञासा
२. या विषयात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेल्या संशोधनात्मक कार्याची थोडक्यात तोंडओळख
३. जीवनातील ८० टक्के समस्यांवर पूर्ण आणि कायमस्वरूपी मात करण्यासाठी आध्यात्मिक उपायांची आवश्यकता असणे
४. आध्यात्मिक कारणे सूक्ष्म असूनही रुग्णाच्या आजारामागील मूलभूत कारण आध्यात्मिक असल्याचे बुद्धीने कसे ओळखायचे ?
५. मानसिक, तसेच अन्य समस्यांवर यशस्वी मात करण्यासाठी करावयाचे सामायिक चार-सूत्री प्रयत्न
अ. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया
आ. सात्त्विक जीवनशैली अंगिकारणे
इ. आध्यात्मिक उपाय
ई. साधना
वरील चारही सूत्रांच्या संदर्भात महर्षि अधात्म विश्वविद्यालयाच्या वतीने विविध उपकरणे, तसेच सूक्ष्मातून करण्यात आलेले संशोधनही यथोचित मांडण्यात आले.
क्षणचित्र
कार्यक्रमाचा समारोप करतांना शाखेचे अध्यक्ष, आधुनिक वैद्य महेंद्र कुडचडकर म्हणाले की, शाखेच्या अन्य शैक्षणिक कार्यक्रमांच्या तुलनेत या कार्यक्रमाला आधुनिक वैद्यांची पुष्कळ अधिक उपस्थिती लाभली.
‘सी.एम्.ई.’ (Continued Medical Education) म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणारा आधुनिक वैद्यांचा अधिकृत शैक्षणिक कार्यक्रम. या कार्यक्रमात आधुनिक वैद्यांचे वैद्यकीय विषयांवर शैक्षणिक प्रबोधन (Updation) करण्यासाठीचेच कार्यक्रम आयोजित केले जातात. |