श्राद्धातील कृतींविषयी धर्मशास्त्र काय सांगते ?
श्राद्धामध्ये ‘ॐ’चा उच्चार का करू नये ?
‘ॐ’चा उच्चार हा ब्रह्मांडव्यापक आणि निर्गुणाशी संबंधित नादरूपी तेजाचे उत्सर्जन करणारा असल्याने तो दीर्घकाळ वायूमंडलात भ्रमण करत रहातो. या तेजोत्सर्गक नादामुळे श्राद्धस्थळी येणार्या रज-तमात्मक लहरींसह कनिष्ठ पितरलहरी, तसेच यमलहरी यांचे वायूमंडलातच विघटन झाल्याने श्राद्धविधीचा परिणाम शून्य टक्क्यावर येण्याची शक्यता असते; म्हणून श्राद्धविधीत ‘ॐ’चा उच्चार वर्ज्य सांगितला आहे.’ – एक विद्वान (सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.८.२००६, दुपारी ४.३०)
संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र’
पिंडदान करण्याचे कर्म नदीकाठी किंवा घाटावर का केले जाते ?
मृत्यूनंतर स्थूलदेह त्यागला गेल्यामुळे लिंगदेहाभोवती असलेल्या कोषातील पृथ्वीतत्त्वाचे, म्हणजेच जडत्वाचे प्रमाण अल्प होते आणि आपतत्त्वाचे प्रमाण वाढते. लिंगदेहाभोवती असलेल्या कोषामध्ये सूक्ष्म आर्द्रतेचे प्रमाण सर्वांत अधिक असते. पिंडदान कर्म हे लिंगदेहाशी संबंधित असल्याने लिंगदेहाला पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येतांना सोपे जावे, यासाठी बहुतांशी असे विधी नदीकाठी किंवा घाटावर केले जातात. नदीच्या काठावरच्या किंवा घाटावरच्या वातावरणात आपतत्त्वाच्या कणांचे प्राबल्य असल्याने, तेथील वातावरण आर्द्रतादर्शक असते. असे वातावरण इतर जडत्वदर्शक वातावरणापेक्षा लिंगदेहांना जवळचे आणि परिचयाचे वाटते. अशा आर्द्रतादर्शक वातावरणाकडे लिंगदेह लगेच आकर्षिले जातात; म्हणून पिंडदानासारखे विधी प्रामुख्याने नदीकाठी किंवा घाटावर केले जातात.
कावळा पिंडाला शिवणे महत्त्वाचे का समजले जाते ?
‘काकगती’ ही पिंडदानात केलेल्या आवाहनानुसार पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणार्या लिंगदेहाच्या गतीशी साधर्म्य दर्शवते, तसेच कावळ्याचा काळा रंग हा रज-तमदर्शक असल्याने, तो ‘पिंडदान’ या रज-तमात्मक कार्याशी संबंधित विधीशी साधर्म्य दर्शवतो. कावळ्याभोवती असलेल्या सूक्ष्म कोषातही लिंगदेहाभोवती असलेल्या कोषासारखेच आपकणांचे प्राबल्य अधिक असल्याने लिंगदेहाला कावळ्याच्या देहात प्रवेश करणे सोपे जाते. वासनांत अडकलेले लिंगदेह हे भूलोक, मर्त्यलोक, भुवलोक आणि स्वर्गलोक यांमध्ये अडकलेले असतात. असे लिंगदेह पृथ्वीच्या वातावरणकक्षेत प्रवेश केल्यानंतर कावळ्याच्या देहात प्रवेश करून पिंडातील अन्न भक्षण करतात. मधला पिंड हा मुख्य लिंगदेहाशी संबंधित असल्याने या पिंडाला कावळा शिवणे महत्त्वाचे समजले जाते. प्रत्यक्ष पिंडातील अन्न कावळ्याच्या माध्यमातून भक्षण करून स्थूल स्तरावर, तसेच अन्नातून प्रक्षेपित होणारे सूक्ष्म-वायू ग्रहण करून सूक्ष्म स्तरावर, अशा दोन्ही माध्यमातून लिंगदेहाची तृप्ती होते आणि पृथ्वीची कक्षा भेदून पुढे जाण्यासाठी त्याला या अन्नातून स्थूल अन् सूक्ष्म या दोन्ही स्तरांवर ऊर्जा मिळते. स्थूल ऊर्जा ही लिंगदेहाच्या बाहेरील वासनात्मक कोषाचे पोषण करते, तर सूक्ष्म-वायूरूपी ऊर्जा ही लिंगदेहाला पुढे जाण्यासाठी आंतरिक बळ प्राप्त करून देते.’ (सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.३.२००५, दुपारी १२.१० अन् १२.२१)
पिंडाला कावळा न शिवल्यास काय करावे ?
बराच वेळ वाट पाहून पिंडाला कावळा शिवला नाही आणि त्या मृत व्यक्तीची कोणती इच्छा अपूर्ण आहे, हे समजू शकले नाही, तर इच्छापूर्तीचे आश्वासन अर्थातच देता येणार नाही. कधी कधी चोवीस तास झाले, तरी पिंडाला कावळा शिवत नाही. अशा वेळी दर्भाचा कावळा करून पिंडाला लावतात.
संदर्भ – सनातनचा ग्रंथ – ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’
श्राद्धामध्ये तांदळाचीच खीर का करतात ?
‘श्राद्धामध्ये पितरांना नैवेद्य दाखवून त्यांना संतुष्ट करण्यासाठी गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर बनवतात. यात वापरलेल्या घटकांमध्ये साखर हा मधुर रसाचे दर्शक, दूध हे चैतन्याचा स्रोत अन् तांदूळ हे सर्वसमावेशक म्हणून वापरले जातात. हे सर्व घटक आपतत्त्वात्मक आहेत. खिरीमध्ये लवंगांचा वापर केल्याने तिच्यातून प्रकट होणार्या तमोदर्शक लहरी या खिरीतील इतर घटकांतून प्रक्षेपित होणार्या आपतत्त्वात्मक लहरींशी संयोग पावतात. या संयोगातून उत्पन्न होणार्या आपतत्त्वात्मक सूक्ष्म-वायूकडे रज-तमात्मक लिंगदेह अल्प कालावधीत आकर्षित होतात. लवंगांतून प्रक्षेपित होणारा सूक्ष्म-वायू हा नैवेद्याभोवती उष्ण गतीमान लहरींचे सूक्ष्म-कवच निर्माण करतो. यामुळे नैवेद्याभोवती संरक्षक-कवच निर्माण होण्यास साहाय्य होते.’ – एक विद्वान (सौ.अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून, २६.६.२००५, दुपारी २.५०)
श्राद्धाच्या जेवणामध्ये उडदाचे वडे का करावेत ?
‘सालविरहित उडदाच्या डाळीतून प्रक्षेपित होणारा सूक्ष्म-उग्र गंध हा पितरांना प्रिय असतो; कारण वासनायुक्त लिंगदेहांच्या कोषांतून प्रक्षेपित होणार्या रजोगुणी लहरींच्या गंधाशी या उग्र गंधाचे साधर्म्य असते. या साधर्म्ययुक्त वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे त्या त्या कक्षेत पितर लवकर आकृष्ट होऊन अन्नातील सूक्ष्म-वायू ग्रहण करू शकतात, तसेच त्यांना चमचमीत अन्न आवडते; म्हणून श्राद्धाच्या जेवणात उडदाचे वडे करतात.’
– एक विद्वान (सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून, १३.८.२००६, सायं. ६.२१)
‘उडीद हा मांसाचा प्रतिनिधी म्हणून श्राद्धाच्या स्वयंपाकात वापरतात. ‘उडदामध्ये भूतबाधा दूर करण्याचे सामर्थ्य आहे’, असेही समजतात. शांतीकर्मांतील बलीदानात भातावर उडीद टाकतात.’
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |