घरी उपलब्ध असलेल्या बियाण्यापासून भाजीपाला लागवडीला आरंभ करा !
|
२६.८.२०२२ या दिवशीच्या लेखामध्ये आपण घरच्या घरी भाजीपाला लागवड करण्यासाठी लागणार्या साहित्याविषयी जाणून घेतले. या लेखात प्रत्यक्ष लागवड करतांना करण्याच्या कृती समजून घेऊया. घरात उपलब्ध मेथीचे दाणे, धने यांच्यापासून लागवड करता येते. हा लेख वाचून स्वतः अनुभव घेण्यासाठी एखाद्या कुंडीमध्ये प्रत्यक्ष लागवड करून पहा !
१. लागवडीसाठी जागा निश्चित करणे
‘लागवडीसाठी जिथे न्यूनतम ४ – ५ घंटे ऊन येत असेल, अशी जागा निवडावी. ‘उपलब्ध जागेनुसार लागवडीसाठीच्या पिशव्या (ग्रो-बॅग), वाफे (विटांचे कप्पे) किंवा कुंडी यांपैकी कशामध्ये लागवड करणार आहोत’, याची निश्चिती करावी.
२. कुंड्या किंवा वाफे भरणे
याविषयीचा सविस्तर माहितीपट (व्हिडिओ) सनातनच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (याची मार्गिका आणि QR code लेखाच्या शेवटी दिले आहेत.) त्यानुसार वाफे किंवा कुंड्या भरून घ्याव्यात. कुंडी भरतांना तळाला पालापाचोळ्याचा थर अवश्य असावा. घन जीवामृत उपलब्ध असेल, तर तेसुद्धा ‘एका कुंडीला एक मूठ’ या प्रमाणात मातीत मिसळावे. कुंडी अगदी काठापर्यंत न भरता काठापासून साधारण ४ बोटे जागा शिल्लक ठेवून भरावी. कुंडी भरल्यावर जीवामृत शिंपडावे. (जीवामृत हे देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांच्यापासून बनवलेले नैसर्गिक खत आहे. हे १० पट पाण्यात मिसळून वापरायचे असते. ‘घन जीवामृत’ हा जिवामृताचाच एक टिकाऊ प्रकार आहे. – संकलक)
३. भरलेल्या कुंड्या किंवा वाफे झाकून ठेवणे
बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी भरलेल्या कुंड्या किंवा वाफे वरीलप्रमाणे जीवामृत शिंपडून जुन्या सुती साडीने किंवा ओढणीने ४८ घंटे झाकून ठेवावेत. असे केल्याने त्यांमध्ये रोपांच्या वाढीसाठी उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास साहाय्य होते.
४. घरी उपलब्ध असलेल्या बियाण्यापासून लागवड करणे
प्रत्येकाच्याच घरात मेथी, धने, मोहरी, मूग, चवळी, चणे इत्यादी उपलब्ध असतात. हे म्हणजे त्या त्या वनस्पतीचे बी असते. आरंभी अशा बियाण्यापासून लागवड करावी. बियाण्यावरही बिजामृताचा संस्कार अवश्य करावा.
५. पालेभाजीचे बियाणे लावण्याची पद्धत
मेथी, पालक, लाल माठ, धने, मोहरी अशा सर्वच पालेभाज्यांच्या बिया आकाराने लहान असतात. या बिया लावण्यासाठी २ – ३ इंच उंचीच्या पसरट भांड्याचाही (‘ट्रे’चाही) वापर करता येतो. पालेभाजीचे बी बिजामृत लावून सावलीत वाळवावे. त्यानंतर त्यामध्ये बियाण्याच्या दुप्पट प्रमाणात घन जीवामृत किंवा वाळू मिसळावी. असे केल्याने या लहान बिया पेरतांना एकाच ठिकाणी दाटीने न पडता थोड्या थोड्या अंतरावर पडतात आणि पुढे रोपांची वाढ चांगली होते. पालेभाजीच्या बिया लावण्यापूर्वी मातीमध्ये साधारण ६ इंच अंतरावर रेषा आखून घ्याव्यात. वरीलप्रमाणे वाळू मिसळलेल्या बिया चिमटीमध्ये घेऊन रांगोळी काढतो त्याप्रमाणे हळूवार पेराव्यात. नंतर रेषा आखतांना बाजूला झालेल्या मातीने हलक्या हाताने बिया झाकाव्यात. काही दिवसांनी एका रेषेत रोपे उगवतात. (छायाचित्रामध्ये वाफ्यामध्ये उगवलेली मेथी पहा. मेथीच्या रांगांच्या मध्ये काही ठिकाणी मुळ्याचे बी पेरले होते. तिथे मुळ्याची रोपे दिसत आहेत.)
धने पेरायचे असल्यास ते पेरण्यापूर्वी ताटलीमध्ये वाटीच्या साहाय्याने हळूवार रगडून दोन भागांत विभागून घ्यावेत. (जोराने दाब पडून बी चिरडणार नाही, याची काळजी घ्यावी.) असे केल्याने अंकुरण लवकर होते. अन्य पालेभाज्या ३ ते ४ दिवसांत रुजून येतात. धने रुजून येण्यासाठी १० ते १२ दिवसांचा कालावधी लागू शकतो.
पालेभाजीचे बी पेरून पाणी घालून झाले की, पाणी दिल्यावर वाफा किंवा कुंडी जुन्या सुती कपड्याने झाकून ठेवावी, म्हणजे अंकुरण लवकर होते आणि बियांचे पक्ष्यांपासून संरक्षण होते. प्रतिदिन कापड बाजूला काढून मातीत ओलावा असल्याची निश्चिती करावी. ओलावा राहील एवढेच पाणी द्यावे. अधिक पाणी दिल्यास बी कुजते; म्हणून तसे करू नये. ३ – ४ दिवसांनी अंकुरण चालू झाले की, कापड काढावे. असे न केल्यास सूर्यप्रकाश न मिळाल्याने अंकुर पिवळे पडतात.
बियाण्याचे मुंग्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी एका ताटलीत पाणी घेऊन त्यामध्ये कुंडी ठेवावी किंवा कुंडीच्या भोवती मुंग्या प्रतिबंधक खडू ओढावा, तसेच कुंडीचे वेळोवेळी निरीक्षण करावे.
पालेभाज्यांचे अंकुर नाजूक असतात. त्यामुळे झारीने किंवा ‘स्प्रे’च्या बाटलीने काळजीपूर्वक पाणी घालावे. छायाचित्र ‘१’ च्या उदाहरणात मेथीच्या बाजूच्या रिकाम्या जागेत किंवा मुळ्यांच्या रोपांवर हळूवार पाणी घालावे. १० पट पाणी मिसळलेले जीवामृत घालायचे झाल्यास तेही याच ठिकाणी घालावे. असे केल्याने मेथीच्या नाजूक मुळांना धक्का लागत नाही. सर्वच पालेभाज्या बियाणे रुजत घातल्यापासून एक ते सव्वा मासाच्या कालावधीत काढणीला येतात. (छायाचित्रामध्ये इतर भाज्यांसमवेत सव्वा मासानंतर काढलेली मेथी आणि मुळ्याची भाजी दिसत आहे.)
६. हा लेख केवळ वाचून सोडून देऊ नका ! याप्रमाणे कृती करा !
घरात उपलब्ध बियाण्यापासून लागवड करणे पुष्कळ सोपे आहे. यासाठी वेळही अधिक द्यावा लागत नाही. चला तरमग ! आज न्यूनतम एका कुंडीत मेथीचे बियाणे पेरून पहा. सव्वा मासानंतर तुम्हाला स्वतः पेरलेल्या मेथीची भाजी खाता येईल. या मेथीची चव बाजारातील मेथीच्या भाजीपेक्षा निश्चितच वेगळी असेल; कारण त्यात तुमच्या कष्टाची गोडी असेल. हा आनंद अनुभवण्यासाठी कृतीला आरंभ करा. विषमुक्त अन्नासाठी सनातनच्या घरोघरी लागवड मोहिमेत सहभागी व्हा !’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, फोंडा, गोवा.
(सविस्तर माहितीसाठी ‘सनातन संस्थे’च्या संकेतस्थळाची मार्गिका : https://www.sanatan.org/mr/a/82985.html)