मविआ सरकार आणि मुंबई महापालिका यांचा ५०० कोटी रुपयांचा ‘महाकाली गुंफा’ घोटाळा ! – किरीट सोमैया, भाजप

शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांचा घोटाळ्यात हात !

मुंबई, ९ सप्टेंबर (वार्ता.) – अंधेरी येथील ‘महाकाली गुंफा’ परिसरातील विकासाच्या कामात शिवसेनेचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर यांनी ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उजवा हात खासदार संजय राऊत कारागृहात आहेत, तर डावा हात असलेले आमदार अनिल परब यांचे ‘रिसॉर्ट’ तुटणार आहे. तिसरा हात असलेले आमदार रवींद्र वायकर यांनी हा मोठा घोटाळा केला आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ८ सप्टेंबर या दिवशी भाजपच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

ते पुढे म्हणाले की, मुंबई महानगरपालिका आणि महाविकास आघाडी सरकारने अनुमाने २००० सहस्र वर्षे जुनी असलेली ‘महाकाली गुंफे’च्या भूमी आणि बांधकाम यांचे हक्क हे वास्तूविशारद अविनाश भोसले, शहीद बालवा आणि विनोद गोयंका यांच्या ‘महाल पिक्चर्स प्रा.लि.’ आस्थापनाला दिले होते. खरे तर या गुंफा १०० वर्षांपूर्वीपासूनच पुरातत्व विभागाच्या कह्यात आहेत. पुरातत्व विभागाचे संरक्षण तत्कालीन सरकारने दिले होते. गुंफा आणि तेथे येण्या-जाण्याचा मार्ग हे सार्वजनिक असल्याचे वर्ष १९०५ ते १९१८ या काळात घोषित केले होते.

वर्ष २०२१ मध्ये ‘महाल पिक्चर्स’ या आस्थापनाने महाकाली गुंफेची मूळ भूमी ज्यांनी विकत घेतली आहे, त्यांच्यासाठी बांधकामाचे हक्क, एफ्.एस्.आय. आणि टी.डी.आर्. मिळाला पाहिजे, शेकडो वर्षे जुना असलेल्या रस्त्यासमोर हस्तांतरण आणि बांधकामाचे हक्क मिळाले पाहिजे, असा अर्ज केला होता. तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि नगरविकास मंत्रालय यांनी या संदर्भात पालट करून १ परिपत्रक काढले होते. ज्याच्या आधारावर मुंबई महापालिकेने महाकाली गुंफा आणि येण्या-जाण्याच्या रस्त्याचे हक्क आणि अधिकार अविनाश भोसले यांच्या आस्थापनाला दिले होते. त्यासाठीचा ७४ कोटी रुपयांचा एफ्.एस्.आय आणि टी.डी.आर्. संमत करण्यात आला होता. मी १ जानेवारी २०२१ मध्ये ‘महाकाली गुंफा’घोटाळ्याचा खुलासा केला होता. या प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकार अन् राज्यपाल यांच्याकडे पाठपुरावा केला, असे किरीट सोमैया यांनी सांगितले.