वाकड येथील कृत्रिम हौदात विसर्जित २ सहस्रांहून अधिक श्रींच्या मूर्तींचे संकलन
|
वाकड (जिल्हा पुणे) – येथील कस्तुरी चौकातील द्रौपदा लॉन्स येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी निर्माण केलेल्या हौदात नागरिकांनी श्रींचे विसर्जन केल्याने गेल्या ६ दिवसांत येथे २ सहस्रांहून अधिक श्रींच्या मूर्तींचे संकलन झाले आहे. गणेशभक्तांनी नदी नाल्यात, ओढ्यात, विहिरीत मूर्तीविसर्जन करू नये या उद्देशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या पुढाकाराने या हौदाची निर्मिती करण्यात आली आहे. गणेशोत्सव मंडळांसाठी ५ फुटांपर्यंतच्या सर्व प्रकारच्या, तसेच घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन आणि मूर्तीदान करण्यासाठी ‘काउंटर’ची व्यवस्था करण्यात आली आहे. संकलित करण्यात आलेल्या मूर्ती श्री फाऊंडेशनकडे सुपुर्द केल्या जातात. फाऊंडेशन या मूर्तींचे किरकोळ रंगकाम करून पुढच्या वर्षी त्यांची अर्ध्या किमतीत विक्री करते. (प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्ती विसर्जन न करता थेट विक्री करणे, हे धर्मशास्त्राच्या दृष्टीने चुकीचे आहे ! – संपादक)
भावनेच्या भरात आपण सर्वजण पर्यावरणाचा र्हास करतोय हे थांबावे; म्हणून विसर्जन हौदाची निर्मिती करण्यात आली आहे. (जाणूनबुजून प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा र्हास सर्वत्र चालू आहे, त्याविषयी वाकडकर यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक) नागरिकांनी श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी हौदाचा उपयोग करून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन विशाल वाकडकर यांनी केले आहे. (मूर्ती विसर्जनाने कोणतेही प्रदूषण होत नाही, असा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. त्यामुळेच भाविकांनी प्रदूषणाच्या काळजीचा देखावा करणार्यांच्या भूलथापांना बळी पडू नये ! – संपादक)
संपादकीय भूमिकाधर्मद्रोहाची परिसीमा गाठत हौदात विसर्जन केलेल्या मूर्तींची पुनर्विक्री करण्याचा घाट ! केवळ हिंदु धर्माला विरोध आणि गणेशभक्तांचा अपमान म्हणून अशा कृती केल्या जातात, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? हा गणेशभक्तांच्या धार्मिक भावनांशी खेळ, तसेच भाविकांची आणि मूर्तीकारांची ही घोर फसवणूक आहे. किमान आता तरी भाविकांनी कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता मूर्तींचे वहात्या पाण्यातच विधीवत् विसर्जन करावे ! |