‘निवळ वाचनाला नव्हे, तर कृतीला महत्त्व आहे’, हे जाणून आयुर्वेद आचरणात आणा !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ५०
‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये नियमितपणे प्रसिद्ध होणार्या आयुर्वेदासंबंधीच्या चौकटींना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. १०.७.२०२२ या दिवशी आरंभ झालेल्या या नियमित स्तंभातील चौकटींचे अर्धशतक आज पूर्ण होत आहे. अनेकांनी आपण या चौकटी आवर्जून वाचत असल्याचे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात कळवले. यासाठी मी वाचकांचे मनापासून आभार मानतो. ही सर्व माहिती सनातनच्या आयुर्वेदाविषयीच्या आगामी ग्रंथांमध्ये त्या त्या विषयांनुसार प्रसिद्ध होईल.
अध्यात्माप्रमाणे आयुर्वेद हेही कृतीचे शास्त्र आहे. ‘चौकटींमध्ये दिल्याप्रमाणे वाचकांनी कृती केली, तरच या चौकटी प्रसिद्ध करण्याचे सार्थक झाले’, असे मानता येईल. त्यामुळे या चौकटी वाचून केवळ ‘चांगल्या आहेत’, असे म्हणून सोडून देऊ नका, तर आपल्या दैनंदिन जीवनात ‘वेळेत झोपणे, नियमित व्यायाम करणे, २ ते ३ वेळाच आहार घेणे, बाजारातील पाकीटबंद खाऊ टाळणे, चहाचे प्रमाण न्यून करणे, रुग्णाईत असल्यास आयुर्वेदातील प्राथमिक उपचार करून पहाणे, मनमोकळेपणाने बोलणे’ यांसारख्या लहान लहान कृती करून निरोगी जीवनाकडे वाटचाल आरंभ करा !’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.९.२०२२)