अमेरिकेतील भारतीय वंशाच्या खासदार प्रमिला जयपाल यांना धमकी

अमेरिकेत भारतियांविषयीच्या द्वेषात वाढ !

अमेरिकेतील भारतीय वंशाच्या खासदार प्रमिला जयपाल

वॉशिंग्टन – अमेरिकेत भारतियांविषयी द्वेष वाढत आहे. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या सर्वसामान्य नागरिकांना धमक्या मिळत असतांना आता भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल (वय ५५ वर्षे) यांना दूरध्वनीवरून धमकी देण्यात आली आहे. एका व्यक्तीने त्यांना दूरध्वनीवरून अपशब्द बोलून भारतात परतण्याची चेतावणी दिली.

१. चेन्नईत जन्मलेल्या खासदार जयपाल यांनी नुकताच त्यांना पाठवलेल्या धमकीचा ऑडिओ संदेश सामाजिक माध्यमावर प्रसारित केला. या धमकीच्या संदेशात एक व्यक्ती त्यांना गंभीर परिणाम भोगण्याची आणि भारतात परत जाण्याची धमकी देतांना ऐकू येत आहे.

२. ‘हिंसाचार ही सर्वसामान्य गोष्ट’, हे आम्ही स्वीकारू शकत नाही. या हिंसेच्या मुळाशी असलेला वर्णद्वेष आणि लिंगभेद यांना आम्ही स्वीकारू शकत नाही’, असे प्रमिला जयपाल यांनी ट्विट करत म्हटले आहे.

३. प्रमिला जयपाल या अमेरिकेच्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’मध्ये सिएटलचे प्रतिनिधित्व करणार्‍या पहिल्या भारतीय अमेरिकन खासदार आहेत.

अमेरिकेतील भारतीय ठरत आहेत वर्णद्वेषाचे शिकार

१.  १ सप्टेंबर २०२२ या दिवशी कॅलिफोर्नियामध्ये एका भारतीय वंशाच्या व्यक्तीवर वर्णद्वेषी टिप्पणी करून तिला अपशब्द वापरण्यात आले.

२. यापूर्वी २६ ऑगस्ट २०२२ या दिवशी टेक्सासमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन महिलेवर अमेरिकी महिलेने आक्रमण करून अपशब्द वापरले होते.

संपादकीय भूमिका

‘भारतात मानवाधिकार पायदळी तुडवले जातात’, असे सांगणार्‍या अमेरिकेला याविषयी काय म्हणायचे आहे ? स्वतःच्या देशातील वर्णद्वेषी आक्रमणे रोखण्यासाठी काहीही न करणार्‍या अमेरिकेला भारतातील मानवाधिकारांविषयी बोलण्याचा काय अधिकार ?