‘पचन चांगले असणे’, हे केवळ शरिराच्याच नव्हे, तर मनाच्या आरोग्यासाठीही आवश्यक !
‘माझ्या एका वैद्यमित्राने सांगितलेला एक प्रसंग त्याच्याच शब्दांत येथे देत आहे –
‘एकदा मला पुष्कळ निराशा आली होती. नेहमीच्या दगदगीने मी एवढा वैतागलो होतो की, ‘घर सोडून दूर जाऊया’, असे मला वाटू लागले. त्या वेळी मी सहज माझे आयुर्वेदातील गुरु वैद्य अनंत धर्माधिकारी यांना संपर्क करून माझी मनःस्थिती सांगितली. त्यावर ते म्हणाले, ‘‘काही नाही रे ! तुझा अग्नी मंद झाला आहे. एक वेळ लंघन (उपवास) कर.’’ … आणि काय आश्चर्य ! तसे केल्याने माझ्या मनातील ते विचार पूर्णपणे निघून गेले आणि मला उत्साह वाटू लागला.’
यावरून जठराग्नीचे (पचनशक्तीचे) महत्त्व लक्षात येते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.९.२०२२)