सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हिमांशु नंदा यांनी बासरीवर वाजवलेल्या ‘राग यमनचे’ सूक्ष्म परीक्षण !
‘४ सप्टेंबर २०२२ या दिवशी सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हिमांशु नंदा यांचे सनातनच्या रामनाथी आश्रमात शुभागमन झाले. त्यानंतर ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संगीत विभागाच्या अंतर्गत आध्यात्मिक संशोधनाच्या दृष्टीने त्यांच्या बासरीवादनाचे प्रयोग घेण्यात आले. देवाच्या कृपेने पंडित हिमांशु नंदा यांनी ५.९.२०२२ या दिवशी बासरीवर ‘राग यमन’ वाजवल्यावर मला सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. राग यमन
१ अ. तानपुर्याच्या पार्श्वसंगीतासह बासरीवर राग यमन वाजवल्यावर मला सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे
१. मनाची एकाग्रता वाढली.
२. मनाची बहिर्मुखता उणावून वृत्ती अंतर्मुख झाली.
३. मनाचा मायेकडे असणारा कल उणावून दिव्यत्व अनुभवण्याकडे कल वाढला.
४. मनातील व्याकुळता वाढून ईश्वराप्रतीचा आर्तभाव जागृत झाला आणि मन ईश्वरासाठी कासाविस होऊन त्याचा शोध घेऊ लागले.
५. मनावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होऊन त्याची सात्त्विकता वाढली.
१ आ. तानपुर्याच्या नादाविना बासरीवर राग यमन वाजवल्यावर मला सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे
१. सायंकाळच्या सूर्यास्तानंतरचे निसर्गरम्य दृश्य डोळ्यांपुढे उभे राहिले
२. निसर्गाच्या संधीप्रकाशातून उत्पन्न होणारा वेणूचा आल्हाददायक सूक्ष्म नाद कानी पडला आणि मनामध्ये आनंदाचे कारंजे उसळ्या मारू लागले.
३. मन प्रथम बासरीच्या नादावर एकाग्र झाले. नंतर ते बासरीच्या नादाशी एकरूप झाले आणि त्यानंतर बासरीच्या नादावर आनंदाने डोलू लागले. यालाच ‘मन सात्त्विक नादाशी एकरूप होणे’, असे म्हणतात.
४. बासरीच्या नादातून सगुण-निर्गुण स्तरावरील स्वरांचा लोप होऊन निर्गुण-सगुण स्तरावरील सूक्ष्म नादलहरींचे प्रक्षेपण वाढले. त्यामुळे सगुणदर्शक तेजतत्त्वमय दृश्य लुप्त होऊन माझ्याभोवती निर्वात पोकळी निर्माण होऊन त्यातून वहाणार्या वायूचा सूक्ष्म नाद कानी पडला. त्यानंतर हा नाद माझ्या कानांना ऐकू न येता त्याचे अस्तित्व माझ्या देहाच्या पोकळीत असल्याचे अनुभवण्यास मिळाले.
२. तानपुर्याचे महत्त्व आणि बासरीला तानपुर्याच्या साथीची आवश्यकता न भासण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव
तानपुरा हे तंतुवाद्य आहे. त्याचा नाद अधिक प्रमाणात सूक्ष्म आहे. त्यामुळे त्याच्या नादातून निर्गुण स्तरावरील नादलहरी अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. बासरी हे सुशीर वाद्य (फुंकून वाजवलेले वाद्य) आहे. या वाद्यातून वायुतत्त्वाच्या स्तरावरील निर्गुण-सगुण नादलहरी निर्माण होऊन प्रक्षेपित होतात. त्यामुळे गायन करतांना, तबल्यासारखे चर्मवाद्य आणि अन्य वाद्ये वाजवतांना तानपुर्याचा नाद पार्श्वसंगीत म्हणून वाजवल्यास कार्यक्रमस्थळी अधिक प्रमाणात निर्गुण-सगुण स्तरावरील नादलहरी कार्यरत होतात. ‘बासरी’ च्या नादातून अधिक प्रमाणात निर्गुण-सगुण स्तरावरील नादलहरी निर्माण होत असल्यामुळे बासरीला तानपुर्याच्या नादाची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे श्री. हिमांशु नंदा यांनी तानपुर्यासह बासरीवर वाजवलेल्या राग यमनच्या तुलनेत तानपुर्याविना बासरीवर वाजवलेल्या ‘राग यमन’ अधिक प्रभावी असल्याचे जाणवले. यावरून तानपुर्यासारखे तंतु वाद्य आणि बासरीसारखे सुशीर वाद्य यांचे महत्त्व शिकायला मिळाले.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी,गोवा. (६.९.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |