पक्षनिधीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची आयकर चोरी उघड !
मुंबई – आयकर विभागाने शीव आणि बोरिवली झोपडपट्टीतील राजकीय पक्षांच्या कार्यालयावर धाड टाकून कोट्यवधी रुपयांची आयकर चोरी उघडकीस आणली. हे राजकीय पक्ष नोंदणीकृत असले, तरी निवडणूक आयोगाची त्यांना मान्यता नव्हती. पक्षनिधीच्या नावाखाली करचोरीचा प्रकार आयकर विभागाने उघडकीस आणला आहे. देशभरात अशी कारवाई चालू आहे.
देशभरात २०५ ठिकाणी आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. याचा वापर करचोरीसाठी करण्यात येत होता. मुंबई आणि गुजरात येथे काही राजकीय पक्षांना मिळालेला निधी हा २ सहस्र कोटींहून अधिक असू शकतो. कर्णावतीसह गुजरातमध्ये करचोरीसाठी असे अनेक राजकीय पक्ष चालवले जात आहेत. गुजरातमध्ये २१ राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर धाड टाकण्यात आली होती. यासाठी मुंबईहून १२० आयकर अधिकार्यांचे पथक गुजरातमध्ये पाठवण्यात आले होते.
🚨 I-T raids expose crores received by political parties operating from shops, slums pic.twitter.com/MbAS7xHsZD
— MegaNews Updates (@MegaNewsUpdates) September 8, 2022
१. दोन दिवसांपासून देशभरात आयकर विभागाचे धाडसत्र चालू आहे. आयकर विभगाने दिलेल्या माहितीनुसार १०० चौ. फूट असलेल्या झोपडीवर एका पक्षाचे नोंदणीकृत कार्यालय आहे. बँक अहवालानुसार या पक्षाला मागील २ वर्षांत १०० कोटींची देणगी मिळाली होती.
२. आयकर विभागाच्या अधिकार्यांनी या पक्षाच्या अध्यक्षाला या व्यवहाराविषयी विचारणा केली. त्या वेळी त्याने केवळ नावापुरता मी अध्यक्ष ससून पक्ष निधी आणि इतर व्यवहार हे कर्णावती येथील लेखा परीक्षकाकडून (ऑडिटरकडून) केले जात असल्याचे सांगितले.
३. देणगीसाठी प्रमाणपत्रही देण्यात आले. या प्रमाणपत्रांचा वापर आयकर सवलत मिळवण्यासाठी केला जातो. पक्षाला मिळालेल्या निधीतून ०.०१ टक्के रक्कम कापली जात होती. त्यानंतर लेखा परीक्षकाने (ऑडिटर) सिद्ध केलेल्या संस्थांमध्ये हा पैसा दिला जात होता.
४. बोरीवलीमध्येही एका लहान घरातून एका पक्षाचे कार्यालय संचलित केले जात होते. या पक्षाने विविध व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून ५० कोटी रुपयांचा निधी घेतला होता. त्यानंतर या पैशांचे वाटप विविध संस्थांमध्ये करण्यात आले.