पुणे येथे ‘श्री गणेशाची उपासना कशी करावी ?’ आणि क्रांती गाथा प्रदर्शनाचे आयोजन !
हिंदु जनजागृती समितीची आदर्श गणेशोत्सव चळवळ
पुणे, ७ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु धर्माची होणारी हानी रोखून धर्मप्रेम वाढवण्यासाठी हिंदु जनजागृती समिती विनामूल्य धर्मशिक्षणवर्ग आयोजित करते. विविध सणांच्या काळात सण-उत्सव आदर्शरित्या कसे साजरे करावेत ? त्यामध्ये होणारे अपप्रकार रोखून संबंधित देवतेची कृपा कशी संपादन करावी ? याविषयी समितीच्या वतीने प्रवचनाचे आयोजन करण्यात येते. या अंतर्गत नवीन मराठी शाळा, शनिवार पेठ, पुणे येथे गणेशोत्सवानिमित्त ३१ ऑगस्ट या दिवशी क्रांती गाथा प्रदर्शन आणि २ सप्टेंबर या दिवशी ‘श्री गणेश उपासना’ या विषयी प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
श्री गणपतीची मूर्ती कशी असावी, श्री गणेशाला लाल फुले आणि दुर्वा का अन् कशा वहाव्यात ? श्री गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यात अन् नैसर्गिक जलस्रोतांमध्ये का करावे ? या शास्त्रासमवेत श्री गणेशमूर्तींचे होणारे विडंबन आणि धर्महानी यांविषयीची माहिती सौ. वैशाली गुजर, सौ. अनुराधा पाटील आणि श्री. आदेश मुटेकर यांनी सांगितली. श्री गणेश उपासना या प्रवचना लाभ इयत्ता पहिली ते चौथीच्या १ सहस्र ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांनी अतिशय शांतपणे आणि उत्सुकतेने श्री गणेशाचे शास्त्र समजून घेतले, तसेच क्रांती गाथा प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी आणि पालक यांनी घेतला. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. शाळेतील शिक्षकांच्या सहकार्याने उपक्रम यशस्वी झाले.
तसेच भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान घेण्यात आले. श्री. शशांक मुळ्ये आणि श्री. प्रथमेश अहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
श्री गणेशाचा सामूहिक नामजप, श्री गणेश प्रवचन, हिंदु राष्ट्र व्याख्यान, स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके, फ्लेक्स प्रदर्शन अशा स्वरूपाचे उपक्रम पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सोसायटी, गणेशोत्सव मंडळे तसेच मंदिरे यांमध्येही राबवण्यात येत आहेत, तसेच फलक प्रसिद्धीच्या माध्यमातूनही श्री गणेशाचे विडंबन रोखण्याविषयी जागृती करण्यात आली. १५ पेक्षा अधिक ठिकाणी घेण्यात आलेल्या या उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.