सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात ७ सप्टेंबरला सायंकाळी वादळीवार्यासह मुसळधार पाऊस पडला. यामुळे व्यापार्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली, तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले.
गेले २ दिवस दुपारपासून सायंकाळपर्यंत विजांच्या कडकडाटास पाऊस पडत आहे. विशेषत: सह्याद्रीच्या पट्ट्यात पाऊस पडत असल्याने नदी, नाले आदी जलस्रोतांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. आता भातशेतीही तयार होण्याच्या टप्प्यात असल्याने पाऊस सतत पडल्यास तयार झालेले भात भूमीवर पडून वाया जाण्याची शक्यता आहे.
कणकवली, सावंतवाडी शहरासह अन्यत्र सायंकाळी मुसळधार पाऊस पडला.
मासेमारांना चेतावणी
११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या कालावधीत सिंधुदुर्ग मत्स्यविभाग कार्यालयाकडून मासेमारांना मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच मासेमारी नौका, मासे पकडण्याची जाळी आणि अन्य साहित्य सुरक्षित ठेवावे, असेही आवाहन केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात ७ ते ११ सप्टेंबर या कालावधीत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची आणि सोसाट्याचा वारा वहाण्याची शक्यता आहे. या कालावधीत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी केले आहे.
अतीवृष्टीमुळे घरांतून पाणी गेल्याने संतप्त नांदगाववासियांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखली
कणकवली – तालुक्यात सायंकाळपासून अतीवृष्टी चालू आहे. याचा फटका मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव परिसराला बसला असून महामार्गाजवळ गटारांची व्यवस्था न केल्याने पावसाचे पाणी येथील घरांमध्ये घुसले आहे. महामार्गाच्या अनुषंगाने येथे असलेल्या विविध समस्यांविषयी सातत्याने आवाज उठवूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी ७ सप्टेंबरला मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखून धरली.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम करतांना ठेकेदाराने अनेक ठिकाणी चुकीची कामे केली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. परिणामी गेले २ ते ३ वर्षे अतीवृष्टी झाली की, येथील साचलेले पाणी परिसरातील घरात घुसून ग्रामस्थांची हानी होत आहे. याच्या विरोधात सातत्याने आंदोलने केली गेली, तसेच येथील सामाजिक कार्यकेर्ते नागेश मोरये यांनी १५ ऑगस्ट या दिवशी या समस्या सुटाव्यात, यासाठी आंदोलन केले होते. या वेळी प्रशासनाकडून पाण्याची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले गेल्यामुळे मोरये यांनी आंदोलन मागे घेतले; मात्र पाण्याची समस्या सोडवली गेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अतीवृष्टीमुळे पाण्याची समस्या निर्माण होताच महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. (वेळ मारून नेण्यासाठीच प्रशासनाकडून अशी खोटी आश्वासने दिली जातात, हे लक्षात घ्या आणि भूलथापांना बळी पडू नका ! – संपादक)