श्री गणेशाच्या जीवनातील प्रसंग आणि लीला यांच्यामागील कार्यकारणभाव !
गणेशोत्सवाच्या निमित्ताने…
७.९.२०२२ या दिवशी आपण श्री गणेशाने शिवाला पार्वतीच्या कक्षात प्रवेश न देणे, शिवाने बालक गणेशाचा शिरच्छेद करणे आदी सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/610645.html
६ अ. शिवाच्या आज्ञेने श्रीविष्णूने उत्तर दिशेला जाऊन तेथे प्रथम दिसलेल्या हत्तीचे शिर त्याच्या सुदर्शनचक्राने कापून ते शिर बालक गणेशाला लावणे : समाजात प्रचलित एका मतानुसार ‘गजासुर’ नावाच्या असुराने बुद्धीमान बनून शिवाच्या जवळ रहाण्याचे वरदान शिवाकडून मिळवले होते. त्यानुसार तो पुढील जन्मी हत्ती होतो आणि श्रीविष्णु या हत्तीचे मस्तक सुदर्शनचक्राने कापून बालक गणेशाच्या धडाला लावतो. अशा प्रकारे गजासुराला दिलेले वरदान त्याच्या पुढील जन्मात पूर्ण होते.
समाजात प्रचलित असणार्या दुसर्याण मतानुसार स्वर्गलोकातील रहिवासी आणि इंद्राचे वाहन ‘ऐरावत’ याला एकदा पुष्कळ अहंकार झाला होता. त्यामुळे त्याला एक ऋषि शाप देतात की, ‘तुझे अध:पतन होऊन तू पृथ्वीवर सामान्य हत्तीच्या रूपाने रहाशील.’ त्यानंतर ऐरावत ऋषींना शरण जातो. तेव्हा ऋषि त्याला उ:शाप देतात की, ‘तुझा उद्धार श्रीविष्णूच्या हातून होईल.’ त्यामुळे शिवाने सांगितल्याप्रमाणे श्रीविष्णु उत्तर दिशेला जातो. तेव्हा त्याला ‘हत्ती’ हा प्राणी प्रथम दिसल्यामुळे त्याने हत्तीचे शिर कापून ते शिर बालक गणेशाच्या धडाला लावले. त्यामुळे शापमुक्त झालेल्या ऐरावताने त्याच्या मूळ दैवी स्वरूपात पृथ्वीकडून स्वर्गलोकाकडे गमन केले.
६ आ. शिकायला मिळालेले सूत्र : शिवाने बालक गणेशाचा शिरच्छेद करण्यामागे जसा उद्देश होता, तसाच उद्देश हत्तीचे शिर कापण्यामागेही होता. या प्रसंगावरून भगवंताच्या प्रत्येक कृतीमागे काही न काही कार्यकारणभाव असतो. तसेच भगवंताच्या मारक कृतींच्या मागेही शापित जिवांचे कल्याणच दडलेले असते.
७ अ. हत्तीचे कापलेले शिर बालक गणेशाला लावल्यावर बालक गणेश पुनर्जीवित होणे आणि सर्व देवतांनी त्याचे गुणगाण करून त्याला ‘गजानन’आणि ‘श्री गणेश’ या नावाने संबोधणे : श्रीविष्णूने आणलेले हत्तीचे शिर बालक श्री गणेशाला लावल्यावर तो शिवाच्या संकल्पाने पुनर्जीवित होतो. त्यानंतर सर्व देवतांनी गणेशाची स्तुती करून त्याची आरती केली आणि त्याला ‘गजानन’ ( म्हणजे गजाचे, अर्थात् हत्तीचे मुख असलेला) असे संबोधले अन् त्याचे ‘श्री गणेश’ असे नामकरण केले .
७ आ. शिकायला मिळालेले सूत्र : जेव्हा श्रीविष्णूने बालक गणेशाला हत्तीचे शिर लावले, तेव्हा शिवाने त्याच्या संकल्पाने बालक गणेशाला पुनर्जीवित केले. त्यामुळे बालक गणेशातील शक्तीवर शिवाचे अधिपत्य स्थापित होते. शक्तीवर शिवाचे नियंत्रण झाल्यावरच शक्तीची विध्वंसक वृत्ती नष्ट होऊन ती शुभ आणि परम कल्याणकारी बनते. बालक गणेशाच्या संदर्भात असेच घडल्यामुळे तो विश्वाच्या कल्याणासाठी शुभ आणि कल्याणकारी झाला. त्यामुळे हत्तीचे मस्तक लावून पुनर्जीवित झालेल्या गणेशाला देवतांनी शुभदर्शक ‘श्री’ हे संबोधन जोडून त्याचे ‘श्री गणेश’ असे नामकरण केले. भगवंताची प्रत्येक कृती ही जिवाच्या किंवा जगाच्या कल्याणासाठी असते.
८ अ. पृथ्वीला तीन वेळा प्रदक्षिणा घालण्याची स्पर्धा देवता, कार्तिकेय आणि श्री गणेश यांच्यात लागणे अन् श्री गणेशाने शिव-पार्वती यांना प्रदक्षिणा घालून स्पर्धा जिंकणे : एकदा देवतांमध्ये अशी स्पर्धा लागते की, ‘जो कोण आधी पृथ्वीला तीन वेळा प्रदक्षिणा घालेल, तो विजेता होईल.’ त्याप्रमाणे सर्व देव आणि कार्तिकेय आपापल्या वाहनांवर स्वार होऊन स्पर्धेत सहभागी होतात. प्रत्येक जण स्वत:च्या वाहनाची गती वाढवून पृथ्वीची ३ वेळा प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न करतात. इकडे श्री गणेश स्वत:च्या उंदरावर स्वार होऊन कैलासावर येतो आणि तेथे बसलेले त्याचे आई-वडील, म्हणजे शिव आणि पार्वती यांना नमन करून त्यांच्याभोवती ३ प्रदक्षिणा घालतो. आईवडिलांना प्रदक्षिणा घातल्यामुळे पृथ्वी प्रदक्षिणेचे फळ मिळते. या न्यायानुसार शिव श्री गणेशाला विजेता घोषित करतो.
८ आ. शिकायला मिळालेले सूत्र : ‘पृथ्वी’ हे मनुष्याचे विश्व आहे. श्री गणेशाचे संपूर्ण विश्व त्याचे माता आणि पिता असल्यामुळे त्याने त्याचे विश्व असलेले शिव आणि पार्वती यांच्याभोवती ३ वेळा प्रदक्षिणा घातल्या. यावरून हे सूत्र लक्षात येते की, सर्व देवता स्पर्धेचा केवळ अर्थ समजून त्यात सहभागी झाले; परंतु श्री गणेश स्पर्धेचा भावार्थ समजून त्यात सहभागी झाला. यावरून सर्व देवतांमध्ये श्री गणेश सर्वांत बुद्धीमान असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. त्यामुळे शिवाने श्री गणेशाला विजेता घोषित केले.
९ अ. शिवाने कामदेवाला भस्म केल्यावर श्री गणेशाने या भस्मापासून भंडासुराची निर्मिती करणे, भंडासुराने शिवाकडून वरदान मिळवून सर्वांना त्रास देणे आणि श्री ललिता त्रिपुरसुंदरीदेवीने भंडासुराशी घनघोर युद्ध करून त्याचा नाश करणे : शिवाची तपस्या भंग करण्यासाठी आलेल्या कामदेवाला शिवाने त्याचे तिसरे नेत्र उघडून भस्म केले होते. हे भस्म असेच अनेक वर्षे कैलासावर होते. एकदा श्री गणेशाने कैलासावरील कामदेवाला भस्म केलेल्या भस्मातून एक आकृती निर्माण करून तिला जिवंत करून त्याला ‘भंड’ असे नाव दिले. कालांतराने या भंडाचे रूपांतर भंडासुरात झाले. भंडासुराने शिवाची घोर तपस्या करून त्याला प्रसन्न केले आणि त्याच्याकडून महाशक्तीशाली होण्याचे वरदान प्राप्त केले. त्यानंतर तो सर्व लोकांवर विजय प्राप्त करून सर्वांना पुष्कळ त्रास देऊ लागला. या त्रासातून मुक्त होण्यासाठी सर्व ऋषि आणि देवता ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांना शरण आले. त्यानंतर सर्व देवतांची दैवी शक्ती एकवटून एक परम शक्तीशाली दिव्य शक्ती निर्माण झाली. या शक्तीचे नाव ‘श्री ललिता त्रिपुरसुंदरी’ होते. ती परमशक्तीशाली असल्यामुळे जेव्हा तिचे भंडासुराशी घनघोर युद्ध झाले, तेव्हा तिने भंडासुराचा नाश करून त्याच्या जाचातून सर्वांना मुक्त केले.
९ आ. शिकायला मिळालेले सूत्र : कामदेवाला भस्म केलेल्या भस्मामध्ये शिवाची तमोगुणी विनाशकारी शक्ती कार्यरत होती. श्री गणेशामध्ये पृथ्वीतत्त्व अधिक प्रमाणात असल्यामुळे त्याने भस्मातून बनवलेल्या आकृतीतील शिवाच्या तमोगुणी विनाशकारी शक्तीने महाभयंकर असुराचे रूप आणि आकार धारण केला. त्यामुळे शिवाच्या तमोगुणी विनाशकारी शक्तीपासून बनलेल्या भंडासुराने संपूर्ण ब्रह्मांडाला त्रस्त केले. सर्व देवतांची संघटित शक्ती ही भंडासुराच्या शक्तीपेक्षा अधिक शक्तीशाली असल्यामुळे तिने भंडासुराचा पराभव करून त्याचा नाश केला. यावरून आपल्या लक्षात येते की, देवाकडून जरी वरदान प्राप्त झाले, तरी त्याचा सदुपयोग करण्याची बुद्धी नसेल, तर ते वरदान केवळ एखाद्या व्यक्तीलाच नव्हे, तर संपूर्ण विश्वासाठी शापाप्रमाणे विनाशकारी ठरू शकते. ’
कृतज्ञता : हे श्री गणेशा तुझ्या कृपेमुळे तुझ्या जीवनातील विविध प्रसंगांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव मला उमजला अन् तुझ्या कृपेनेच तो लेखबद्ध करता आला’, यासाठी तुझ्या श्रीचरणी कोटीश: कृतज्ञ आहे.
(समाप्त)
(वाचकांना सूचना : ‘या लेखातील काही प्रसंगांशी संबंधित नावे आणि घटना संकेतस्थळावरून अन् ‘गणेशपुराण’ आणि अन्य काही ग्रंथातून घेतलेल्या आहेत.- कु. मधुरा)
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०२१)