पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी केलेली भावपूर्ण प्रार्थना !
संतांनाही आधार वाटणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
पू. माई (पू. (सौ.) लक्ष्मी नाईक, प.पू. दास महाराज यांच्या पत्नी) परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी दिवसातून ६ वेळा भावपूर्ण प्रार्थना करतात. पू. माईंनी ही प्रार्थना परात्पर गुरु डॉक्टरांना ऐकवली, त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘प्रार्थनेतील शब्द हे नुसते शब्द नसून भाव जागृत करणारे शब्द आहेत.’’ ही प्रार्थना ऐकतांना परात्पर गुरु डॉक्टरांचा भाव जागृत झाला आणि प.पू. दास महाराज यांचाही भाव जागृत होऊन त्यांना भावाश्रू येऊ लागले.
प्रार्थना
‘प्रत्यक्ष विष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या चरणांचे स्मरण करून त्यांच्या चरणी हाताच्या ओंजळीने फूल अर्पण करूया आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करूया.
‘हे भगवंता, तू सर्वज्ञ आणि सर्वशक्तीमान आहेस. तुला आमच्या सर्व अडचणी ठाऊक असून त्या अडचणी सोडवणाराही तूच आहेस. आमचे अज्ञानही तुला ठाऊक आहे. आमचे अज्ञान दूर करणाराही तूच आहेस. आम्ही अनेक जन्मांत केलेली अयोग्य कर्मे तुला ठाऊक असूनही तू आम्हाला तुझ्या चरणांजवळ ठेवले आहेस आणि आमच्यावर कृपेचा वर्षाव करत आहेस.
‘हे भगवंता, आमच्या अंतःकरणात तुझ्या चरणांची, म्हणजेच तुझ्या समष्टी रूपाची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत तळमळीने होण्याची तीव्र इच्छा निर्माण होऊ दे. त्यासाठी तूच आम्हाला शक्ती आणि बळ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
– पू. (सौ.) लक्ष्मी (माई) रघुवीर नाईक, बांदा, पानवळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (१.११.२०२१)