प्रसिद्ध बासरीवादक श्री. हिमांशु नंदा यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

‘४ सप्टेंबर २०२२ या दिवशी सुप्रसिद्ध बासरीवादक श्री. हिमांशु नंदा यांचे फोंडा, गोवा येथे शुभागमन झाले. त्यानंतर ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संगीत सेवेच्या अंतर्गत आध्यात्मिक संशोधनाच्या दृष्टीने त्यांच्या बासरीवादनाचे प्रयोग घेण्यात आले. देवाच्या कृपेने प्रसिद्ध बासरीवादक श्री. हिमांशु नंदा यांची मला त्या वेळी जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पंडित हिमांशु नंदा

१. शिष्यभाव

श्री. हिमांशु नंदा हे सतत शिष्यभावात असतात. त्यामुळे ते संगीतशास्त्रातील सूत्रे आणि बासरीवादनातील बारकावे सतत शिकत असतात. तसेच त्यांना अध्यात्माची आवड असल्यामुळे ते साधनेच्या संदर्भातील नवनवीन सूत्रे सतत शिकून कृतीत आणण्यासाठी प्रयत्नरत असतात.

२. संशोधक वृत्ती

श्री. हिमांशु नंदा हे संशोधक वृत्तीचे आहेत. त्यामुळे ते संगीत आणि अध्यात्म यांच्या संदर्भात त्यांना शिकायला मिळालेल्या सूत्रांची सांगड घालून नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांच्या संशोधकवृत्तीमुळे त्यांना संगीत आणि अध्यात्म यांचे विद्यारूपी गूढ ज्ञान प्राप्त होत आहे. कलाकारांमध्ये संशोधकवृत्ती असेल, तरच तो नवनवीन रचना करू शकतो आणि त्या रचना संगीतशास्त्राच्या दृष्टीने अचूक अन् अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने परिणामकारक असतात.

कु. मधुरा भोसले

३. वक्तशीरपणा

श्री. हिमांशु नंदा अत्यंत गुणवान शिष्य आहेत. त्यामुळे ते त्यांच्या संगीताचा सराव, तसेच कार्यक्रमातील सादरीकरण करण्यासाठी वेळेचे तंतोतंत पालन करतात. ते वेळेचे महत्त्व जाणत असल्यामुळे त्यांच्यामध्ये ‘वक्तशीरपणा’ हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे.

४. विनम्रता

श्री. हिमांशु नंदा यांना संगीतशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यांचे ज्ञान असूनही त्यांचा अहं अत्यल्प असल्यामुळे ते पुष्कळ विनम्र आहेत. ‘विद्या विनयेन शोभते ।’ या उक्तीप्रमाणे त्यांच्यातील विनम्रतेमुळे ते श्रेष्ठ कलावंत झाले आहेत. त्यांच्या विनम्र स्वभावामुळे त्यांचे व्यक्तीमत्त्व प्रभावी झाले आहे.

५. निसर्गाची ओढ असणे

श्री. हिमांशु नंदा यांना निसर्गाविषयी विशेष आत्मीयता वाटते. त्यामुळे ते निसर्गाशी तादात्म्य पावून संगीतातील स्वर शोधतात आणि ते अंतःकरणात साठवतात. निसर्गातील चैतन्यामुळे त्यांचे मन अत्यंत निर्मळ झाले आहे. त्यामुळे त्यांच्या निर्मळ अंत:करणातून संगीताचे शुद्ध स्वर बासरीच्या नादातून प्रगटतात आणि श्रोत्यांचे मन मोहून टाकतात. ते निसर्गातील संगीताशी तादात्म्य पावत आहेत आणि त्यामुळे ते टप्प्याटप्प्याने ‘स्वरब्रह्माशी’ एकरूप होत आहेत. यालाच ‘संगीतातील मूलतत्त्वाशी एकरूप होऊन दिव्यत्व अनुभवणे’, असे म्हणतात.

६. सहजता

श्री. हिमांशु नंदा यांचा अहं अत्यल्प असल्यामुळे त्यांचे वागणे कृत्रिम नसून नैसर्गिक आणि पारदर्शक आहे. त्यांचे वागणे आणि बोलणे अत्यंत सहज आहे. त्यांच्याकडून आपल्याला ‘सहजता’ हा गुण शिकायला मिळतो.

७. समर्पणभाव आणि तल्लीनता

श्री. हिमांशु नंदा यांचा संगीताप्रती अत्यंत समर्पणभाव आहे. या समर्पित भावामुळेच ते अत्यंत तल्लीन होऊन बासरीवादन करतात. त्यामुळे बासरीवादनाचा सराव करत असतांना त्यांना स्थळ आणि काळ यांचे भान रहात नाही. दैवी कला ही कलाकाराला जगाचा विसर पाडणारी आणि त्याचे देहभान हरपून टाकणारी असते. श्रीगुरुकृपेने श्री. हिमांशु नंदा यांना अशी दैवी कला प्राप्त झालेली आहे.

८. प्रेमळ स्वभावामुळे इतरांना आनंद देणे

श्री. हिमांशु नंदा यांच्यामध्ये ईश्वराप्रती भावासह सहकलाकार, कुटुंबीय आणि अन्य व्यक्ती यांच्या प्रती पुष्कळ प्रेम आहे. ते प्रेमाने इतरांची काळजी घेतात आणि त्यांना आनंद देतात. त्यांच्या विनम्र आणि प्रेमळ स्वभावामुळे त्यांच्या संपर्कात येणारे कलाकार, श्रोते आणि अन्य व्यक्ती यांना नेहमीच आनंद जाणवतो.

९. साधे रहाणीमान

श्री. हिमांशु नंदा यांचा अहं अत्यल्प असल्यामुळे त्यांचे रहाणीमान अत्यंत साधे आहे. त्यांचा साधेपणा हेच त्यांचे भूषण आहे. यावरूनच त्यांचा अध्यात्मातील अधिकार लक्षात येतो.

१०. बासरीवादनाच्या माध्यमातून ईश्वराच्या अनुसंधानात असणे

श्री. हिमांशु नंदा हे बासरीवादनाच्या माध्यमातून ईश्वराशी अनुसंधान साधतात. त्यामुळे त्यांच्या अंतर्मनात सतत बासरीचे सूर वाजत असून त्यांचे मन सतत आनंदाची अनुभूती घेत असते. हाच आनंद त्यांच्या मुखावर झळकत असल्यामुळे त्यांच्या मुखावर आनंदभाव जाणवतो आणि तो त्यांना पहाणार्याच व्यक्तींनाही जाणवतो.

११. कर्मयोग, ध्यानयोग आणि ज्ञानयोग या तिन्ही योगमार्गांनुसार साधना झालेली असणे

श्री. हिमांशु नंदा यांना बासरीवादनातून कर्मयोग, क्रियायोगातून ध्यानयोग आणि चिन्मय मिशन या संप्रदायानुसार साधना करून ज्ञानयोग या तिन्ही योगांची प्राप्ती झालेली आहे. अशा प्रकारे संगीतकलेच्या माध्यमातून साधना होऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती होत आहे.

११ अ. विविध योगमार्गांनुसार झालेल्या साधनेचे प्रमाण आणि स्वरूप

१२. बासरीवादन दैवी असल्यामुळे श्रोत्यांना विविध प्रकारच्या दैवी अनुभूती येऊन त्यांच्यावर आध्यात्मिक उपाय होणे

श्री. हिमांशु नंदा यांच्या संगीतकलेला अध्यात्माची जोड असल्यामुळे त्यांचे बासरीवादन ऐकत असतांना त्यामध्ये विविध देवतांच्या नादमय तत्त्वलहरी कार्यरत होतात. त्यामुळे त्यांचे बासरीवादन ऐकत असतांना श्रोत्यांना तारक शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या घटकांची अनुभूती येते. त्यांचे बासरीवादन सामान्य नसून दिव्य आहे. त्यामुळे त्यांच्या बासरीवादनामुळे श्रोत्यांवर आध्यात्मिक उपाय होऊन त्यांना होणारा वाईट शक्तींचा त्रास न्यून होतो.

१२ अ. बासरीवादनातून प्रक्षेपित होणार्याब विविध दैवी घटकांचे प्रमाण आणि त्यामुळे येणारी अनुभूती

१३. श्री. हिमांशु नंदा यांनी गेल्या जन्मी श्रीकृष्णाची उपासना केली असून श्रीकृष्णाने त्यांना ‘तू पुढील जन्मी बासरीवादक होऊन संतपद प्राप्त करशील’, असा कृपाशीर्वाद देणे

श्री. हिमांशु नंदा यांनी गेल्या जन्मी श्रीकृष्णाची उपासना केली होती. त्यांच्या भक्तीने श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि त्यांनी श्री. हिमांशु यांना पुढील जन्मात ‘बासरी’ या वाद्यात प्राविण्य मिळवून आध्यात्मिक उन्नती करून संतपद प्राप्त होईल’, असा कृपाशीर्वाद दिला होता. त्याप्रमाणे श्री. हिमांशु नंदा या जन्मी प्रविण बासरीवादक झाले आहेत आणि श्री गुरूंच्या कृपेने त्यांची वाटचाल संतपदाकडे चालू आहे.

श्री. हिमांशु नंदा यांची संगीतकलेच्या माध्यमातून आंतरिक साधना चांगली चालू असल्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती होऊन ते लवकरच संतपद प्राप्त करतील’, असे जाणवते.

कृतज्ञता

श्री गुरूंच्या कृपेमुळेच श्री. हिमांशु नंदा यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये लक्षात आली’, यासाठी मी श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.९.२०२२)