स्वस्तिक आणि हिटलरचे ‘हाकेनक्रूज’ यांमधील भेद
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याने नुकत्याच पारित केलेल्या एका कायद्यामुळे स्वस्तिक चिन्हाच्या वापरावर निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. हा स्वागतार्ह निर्णय आहे, तसेच मागील मासात ऑस्ट्रेलियातील साऊथ वेल्स आणि विक्टोरिया या राज्यांमध्ये नाझी चिन्हावर बंदी घालण्यात आली. या दोन्ही राज्यांमध्ये स्वस्तिकचा वापर करण्यास मात्र अनुमती आहे. ‘स्वस्तिक’ हे चिन्ह भारतीय संस्कृतीत मंगलमय आणि पावित्र्याचे प्रतीक मानले जाते. कोणत्याही शुभप्रसंगी घरांच्या प्रवेशद्वारावर बर्याच ठिकाणी स्वस्तिक काढले जाते, त्याची पूजा केली जाते; पण याच स्वस्तिकचे स्वागत करण्यास पाश्चात्त्य राष्ट्रे, विशेषत: अमेरिका आणि युरोप येथील देश अनुत्सुक असतात. काही देशांमध्ये स्वस्तिकला विरोधही केला जातो; कारण जर्मनीचा हुकूमशहा हिटरलच्या नाझीवाद म्हणजेच नाझी ‘हाकेनक्रूज’च्या चिन्हासारखे (हे तिरप्या स्वस्तिक चिन्हासारखे) दिसते. हिटलरने त्याचा नाझीवाद पसरवण्यासाठी निवडलेले स्वस्तिकातील पालट आणि हिंदु, बौद्ध किंवा जैन संस्कृतीत पवित्र मानले जाणारे स्वस्तिक यांमध्ये नेमका भेद काय आहे ? त्यांचा इतिहास काय आहे ? हे पाहूया.
१. प्राचीन स्वस्तिक चिन्हाला ‘शांततेचे प्रतीक’ म्हणून मान्यता देणारे कॅलिफोर्निया पहिले राज्य !
कॅलिफोर्निया राज्याने २३ ऑगस्ट २०२२ या दिवशी एक कायदा संमत करून हिटलरच्या नाझी हाकेनक्रूजच्या चिन्हावर बंदी घालण्यात आली आहे. याखेरीज या कायद्यामध्ये हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, हिंदु, बौद्ध किंवा जैन संस्कृतीमध्ये पवित्र मानण्यात आलेल्या स्वस्तिक चिन्हाच्या वापरावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. प्राचीन स्वस्तिक चिन्हाला ‘शांततेचे प्रतीक’, अशी मान्यता देणारे कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील पहिलेच राज्य ठरले आहे. याच समवेत स्वस्तिक चिन्हाचा वापर लोकांना घाबरवण्यासाठी करणे कायद्याने गुन्हा ठरवण्यात आले आहे.
२. स्वस्तिक आणि हिटलरचे हाकेनक्रूज यांतील भेद
अ. हिंदु, बौद्ध आणि जैन या संस्कृतींमध्ये स्वस्तिकला आनंद आणि पावित्र्याचे स्थान आहे. याउलट हिटलरच्या हाकेनक्रूजची रचना स्वस्तिकप्रमाणेच असली, तरी ते काहीसे उजव्या बाजूला झुकलेले आहे. नवनाझी गटांकडून याचा वापर द्वेष पसरवण्यासाठीही केला जातो.
आ. स्वस्तिक हा शब्द मुळात संस्कृत भाषेतून आला आहे. भारतात अनेक सांस्कृतिक ठिकाणी स्वस्तिक चिन्ह दिसून येते. मंदिर, घर, वाहन, प्रवेशद्वार किंवा दरवाजावरची भिंत अशा अनेक ठिकाणी पावित्र्य आणण्यासाठी वापरले किंवा रेखाटले जाते.
इ. स्वस्तिक हे प्रामुख्याने लाल किंवा पिवळ्या रंगात काढले जाते. ते एकदम सरळ असून कुठल्याही बाजूला झुकलेले नाही.
ई. स्वस्तिकच्या चारही चौकोनांमध्ये ४ बिंदू असतात की, जे ४ वेदांचे प्रतीक आहेत.
उ. आतापर्यंत सर्वांत जुने स्वस्तिक हे आताच्या युक्रेन देशात हस्तिदंतावर कोरलेले सापडले आहे. ते जवळपास ख्रिस्तपूर्व १० सहस्र वर्षे जुने असल्याचे अनुमान आहे. त्याखेरीज मेसोपोटेमिया, अमेरिका, अल्गेरिया आणि अतीपूर्वेकडच्या देशांमध्येही प्राचीन काळातील स्वस्तिकाचे पुरावे सापडले आहेत.
३. हाकेनक्रूजशी स्वस्तिकचे साम्य असल्याने पाश्चात्त्य देशांना स्वस्तिकविषयी द्वेष असणे
अमेरिका आणि अन्य काही देशांमध्ये अजूनही स्वस्तिक चिन्ह हिटलरच्या कार्यकाळाशीच जोडले जाते. दुसर्या महायुद्धामध्ये जर्मनीचा आणि पर्यायाने हिटलरच्या नाझीवादाचा पराभव झाल्यानंतर जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया अन् लिथुआनिया या युरोपियन देशांमध्ये स्वस्तिकवर बंदी घालण्यात आली होती; मात्र अजूनही जगभरात छोट्या-छोट्या गटात असणारे नवनाझीवादी समूह हाकेनक्रूज चिन्हाचा वापर स्वत:ला नाझीवादाचे समर्थक म्हणून दर्शवण्यासाठी करतांना दिसतात.
४. हिटलरने हाकेनक्रूज चिन्ह कसे निवडले ?
स्वत: हिटलरने स्वस्तिक चिन्ह निवडण्याच्या संदर्भात त्याच्या आत्मचरित्रात ‘माईन काम्फ’ (माझा लढा) या पुस्तकात लिहून ठेवले आहे. जर्मनीमध्ये स्वतःचा जम बसवत असतांना नाझी पक्षाला एका अशा झेंड्याची आवश्यकता होती की, जो फक्त त्यांच्या चळवळीचे प्रतिनिधित्व करणार नाही, तर लोकांच्या मनात लगेच घर करील आणि चळवळीकडे लोकांना आकर्षित करू शकेल. त्यासाठी ४५ अंशात उजवीकडे झुकवलेले स्वस्तिक चिन्ह अर्थात् हाकेनक्रूज हा योग्य पर्याय ठरला. वर्ष १९२० मध्ये हिटलरने हाकेनक्रूजला ‘नॅशनल सोशालिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी’चे (नाझी पार्टी) चिन्ह म्हणून मान्यता दिली. लाल रंगाच्या चौकोनी कापडावर पांढर्या वर्तुळात रेखाटलेले काळ्या रंगाचे उजवीकडे झुकलेले स्वस्तिक हा त्याने स्वतःच्या पक्षाचा झेंडा ठरवला. लाल, काळा आणि पांढरा हे रंग त्याने थेट जर्मन साम्राज्याच्या झेंड्यावरून घेतले होते. हिटलरसाठी हे चिन्ह म्हणजे राष्ट्रीय समाजवाद आणि उज्ज्वल भवितव्याची आशा होते.
हिटलरने आत्मचरित्रात पुढे लिहिले आहे की, या ध्वजातील लाल रंग हा चळवळीमध्ये असणारा सामाजिक विचार, पांढरा रंग राष्ट्रीयत्वाची भावना दर्शवतो, तर स्वस्तिक आर्यन वंशाच्या अंतिम विजयाची आम्हाला सोपवण्यात आलेली मोहीम अधोरेखित करते.
५. हिटलरचा नाझीवाद काय आहे ?
‘जर्मन लोक हे मूळच्या आर्यांचे वंशज अर्थात् पृथ्वीतलावरील सर्वोच्च वंश आहे’, अशी हिटलरची धारणा होती. त्यामुळे मूळचे जर्मन लोक हे इतर सर्व वंशांपेक्षा श्रेष्ठ असल्याच्या भयंकर धारणेचा नाझीवाद पुरस्कार करत होता. त्यामुळे नाझीवाद मानणार्या लोकांसाठी या कथित वांशिक श्रेष्ठत्वाचे जतन आणि संवर्धन करणे याला सर्वोच्च प्राधान्य होते. त्यामुळेच इतर सर्व वंशाचे लोक त्यांच्यासाठी कनिष्ठ किंवा दुय्यम दर्जाचे होते. ‘ज्यू लोक हे नाझी लोकांना सर्वांत मोठे शत्रू वाटत होते. त्यांचा पृथ्वीतलावरून नि:पात करणे’, हे हिटलर आणि त्याच्या अनुयायांना त्याचे सर्वोच्च कर्तव्य वाटत होते. याच विचारसरणीचे प्रतीक म्हणून हिटलरने स्वस्तिक चिन्हात पालट करून त्याचा वापर केला. त्यामुळे पाश्चात्त्य देशांमध्ये या चिन्हाला आतापर्यंत आडकाठी किंवा प्रसंगी विरोध केला जात होता.
(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’)