पोलिसांनी हिंदु तरुणीला त्वरित शोधून आणावे !
|
अमरावती, ७ सप्टेंबर (वार्ता.) – शहरात आणखी एका ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक झाल्या आहेत. एका हिंदु मुलीला पळवून निकाह केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर खासदार सौ. नवनीत राणा हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी हिंदु मुलीला लगेच शोधून आणण्याची मागणी केली. हिंदु मुलीसमवेत निकाह झाल्यानंतर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी कांदे-बटाटे विक्री करणार्या एका युवकाला पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
याविषयी मुलीचे पालक सौ. नवनीत राणा यांच्याकडे ७ सप्टेंबर या दिवशी सकाळी साहाय्य मागण्यासाठी आले होते; या संदर्भात सौ. राणा यांनी पोलिसांना केलेला दूरभाष पोलिसांनी ध्वनीमुद्रित केला. त्यामुळे सौ. राणा पोलीस ठाण्यात आल्यावर संतप्त झाल्या. ‘तुम्हाला लोकप्रतिनिधींचा दूरभाष ध्वनीमुद्रित करण्याचा अधिकार कुणी दिला ?’, असा जाब त्यांनी पोलीस अधिकार्यांना विचारला. या वेळी पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकारी मनीष ठाकरे आणि सौ. राणा यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि मोठ्या संख्येने गर्दी झाली.
अमरावती शहरातील हमालपुरा भागात रहाणारी एक १९ वर्षीय हिंदु तरुणी ६ सप्टेंबरपासून बेपत्ता झाली आहे. मुलीच्या पालकांनी सांगितले की, मुलगी १२.३० वाजता बँकेत गेली; मात्र तिचा भ्रमणभाष नंतर बंद झाला. त्या तरुणीच्या मैत्रिणीकडून एका मुसलमान मुलाचे नाव समोर आले आहे; पण त्या हिंदु तरुणीचा शोध लागलेला नाही.
पत्रकारांशी बोलतांना सौ. नवनीत राणा म्हणाल्या, ‘‘लव्ह जिहाद’ प्रकरणातून अशा तरुणींचे अपहरण करून नंतर त्यांचे धर्मांतर केले जाते. मुलाची रात्रीपासून चौकशी करत आहेत; मात्र काही समोर येत नाही. मुलगी कुठे आहे ? याची उत्तरे दिली जात नाहीत. त्या मुलाच्या परिवाराला येथे पकडून आणा. २ घंट्यांत मुलीचा शोध घ्या, अशी समयमर्यादा पोलिसांना दिली आहे. या मुलांचा एक समूह आहे. भारतात ‘लव्ह जिहाद’ची अशी प्रकरणे वाढत असून अमरावती येथे अशा घटना वारंवार घडत आहेत.’’
पोलीस पालकांच्या तक्रारी घेत नाहीत ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार, भाजप खासदार
याविषयी भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले, ‘‘धारणी आणि अमरावती येथील २ अशी प्रकरणे आहेत. धारणी येथील मुलीला भाग्यनगर (हैद्राबाद) येथे नेण्यात आले आहे. त्या मुलीने भ्रमणभाष करून ‘मला अमरावती येथे यायचे आहे’, असे सांगितले आहे. धारणी आणि अमरावती येथील पोलिसांना मी विनंती केली होती की, त्या मुलींना शोधून सोडवून आणा. पोलिसांनी या प्रकरणांमध्ये जेवढे गांभीर्य दाखवायला हवे होते, तेवढे गांभीर्य दाखवले नाही. धारणी येथे २० प्रकरणे अशाच प्रकारची झाली आहेत, तर अमरावती येथे ४ प्रकरणे झाली आहेत. या मुलींचे पालक तक्रारी घेऊन गेले, तर त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत, असे मुलींच्या नातेवाइकांनी सांगितले.
कोणत्या मुलीला किंवा पालकांना त्रास दिला जात असेल, तर माझ्याशी संपर्क साधा ! – बोंडे यांचे आवाहनबोंडे म्हणाले, ‘‘हिंदु तरुणींना फसवण्याचे अनेक प्रकारच्या पद्धती आहेत. मुलींचे लैंगिक शोषण करणे, त्यांना ‘ब्लॅकमेल’ करणे, त्यांना नशेची औषधे देणे, एवढेच नाही, तर त्या मुलींच्या घरच्यांना धमकी देणे, ‘तू जर ऐकले नाहीस, तर तुझ्या घरच्यांना जिवे मारू’, अशा धमक्या मुलीला दिल्या जातात. या मुलांना ‘फंडिंग’ (पैसे पुरवणे) केले जाते. त्यांना पैसे आणि दुचाकी वाहने घेऊन दिले जातात. माझे आवाहन आहे की, कोणत्याही मुलीला किंवा त्यांच्या आईवडिलांना असा त्रास दिला जात असेल, तर माझ्याशी किंवा भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांशी कधीही संपर्क साधावा.’’ |
संपादकीय भूमिकाहिंदु तरुणींच्या पालकांची तक्रार न घेणाऱ्या पोलीस अधिकार्यांना तात्काळ बडतर्फ केले पाहिजे ! |