अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याकडून विज्ञापनातून महिला मच्छिमारांचा अवमान !
कोळी महिला फसवणूक करत असल्याचा कांगावा
मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी एका ‘ऑनलाईन’ मासे विक्री करणार्या आस्थापनाचे विज्ञापन करतांना कोळी महिला ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा दावा करून त्यांचा अवमान केला आहे. त्यामुळे येथील कोळी महिला मच्छी विक्रेत्या संतप्त झाल्या आहेत. ‘वर्षा उसगावकर यांनी कोळी महिला मच्छी विक्रेत्यांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांनी आमची क्षमा मागावी अन्यथा त्या करत असलेल्या ध्वनीचित्रीकरणाच्या ‘सेट’वर जाऊन त्यांना सडलेले मासे खाऊ घालू’, अशी चेतावणी ‘अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती’च्या महिला अध्यक्षा नयना पाटील यांनी दिली आहे.
नयना पाटील पुढे म्हणाल्या, ‘‘वर्षा उसगावकर यांचे हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे. २ वेळेच्या जेवणासाठी जिवाचे रान करणार्या मासे विक्रेत्या कोळी महिलांचा हा अवमान आहे. एका कष्टकरी महिलेचा अवमान मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज महिला कलाकारांकडून होणे, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि यातून गरिबांच्या प्रति असलेली मानसिकता प्रखरपणे दिसत आहे.’’
‘‘ज्या ‘ऑनलाईन’ आस्थापनाने हे विज्ञापन टाकले आहे, त्यांनी कोळी महिलांची क्षमा मागावी अन्यथा त्यांना कायदेशीर नोटीस बाजवली जाईल, तसेच हे विज्ञापन सर्व स्तरांतून न काढल्यास या आस्थापनाच्या विरोधात न्यायालयात दावा प्रविष्ट करण्यात येईल. मच्छी विक्रेत्या महिलांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही’’, अशी चेतावणी समितीचे उपाध्यक्ष तथा अधिवक्ता कमळाकर कांदेकर यांनी दिली आहे.