दान केलेल्या घरगुती श्री गणेशमूर्तींची विटंबना करणार्या अधिकार्यांवर कारवाई करा !
भाजपची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर – प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन सामान्य कोल्हापूरकरांनी दान केलेल्या सहस्रो श्री गणेशमूर्तींची विटंबना होईल, अशा प्रकारे केल्या गेलेल्या विसर्जनास उत्तरदायी ठरवून महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी यांचे अन्वेषण करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘ई-मेल’द्वारे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.
१. दान केलेल्या मूर्तींचे प्रशासन ज्याप्रकारे विसर्जन करते, त्यामुळे प्रतिवर्षी या मूर्तींची विटंबना होते आहे. या वर्षी तर या दान केलेल्या मूर्ती काठावरून इराणी खणीत फेकण्यात येत असल्याचा ‘व्हिडिओ’ ६ सप्टेंबर या दिवशी सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. त्यामुळे सामान्य कोल्हापूरकरांच्यात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
२. शहरवासियांच्या भावना अक्षरशः पायदळी तुडवून दान केलेल्या घरगुती श्री गणेशमूर्तींची विटंबना होईल, अशा प्रकारे विसर्जन झाले. याला उत्तरदायी असणार्या महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.