सोलापूर शहरात १२ ठिकाणी कृत्रिम कुंडांत श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे महापालिकेचे अशास्त्रीय आवाहन !
सोलापूर, ७ सप्टेंबर (वार्ता.) – येथील श्री सिद्धेश्वर तलावाजवळील गणपति घाट, विष्णु घाट, तसेच संभाजी महाराज तलावासह १२ ठिकाणी श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम कुंड सिद्ध करण्यात येणार आहेत. शहरात घरगुतीसह मंडळाच्या श्री गणेशमूर्ती गोळा करण्यासाठी ८४ ठिकाणी संकलन केंद्र करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ‘शहरातील १२ ठिकाणी उभारण्यात आलेल्या विसर्जन कुंडांमध्ये ३ फूटांहून मोठी मूर्ती विसर्जन करता येणार नाही. मोठ्या मूर्ती हिप्परगा येथील दगड खाणीमध्ये विसर्जन कराव्यात’, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
तलावात शाडू मातीसह कोणत्याही प्रकारच्या श्री गणेशमूर्ती विसर्जन करता येणार नाहीत ! – पी. शिवशंकर, आयुक्त, महापालिका
या वेळी पालिका आयुक्त यांना ‘श्री गणेशमूर्ती विसर्जन शास्त्रशुद्ध होण्यासाठी यापुढे शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींचा आग्रह करणार का ?’, असे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने विचारले असता शाडू मातीसह अन्य कोणतीही मूर्ती तलावात विसर्जन करण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच मूर्ती विसर्जन करावे, असे सांगितले. या वेळी कृत्रिम तलावातील मूर्ती काढून त्या खाणीमध्ये विसर्जन करतांना मूर्तींची विटंबना होणार नाही का ? असा प्रश्न विचारला असता ‘मूर्तींची विटंबना होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ’, असे आयुक्तांनी सांगितले.
श्री गणेशमूर्ती विसर्जन हिप्परगा तलावात न करता बाजूच्या खाणीमध्ये करावे ! – मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर
हिप्परगा तलाव १०४ टक्के भरला असल्याने गणेशभक्तांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून श्री गणेशमूर्ती विसर्जन शांततेत खाणीमध्ये करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात गणेशभक्त, हिप्परगा ग्रामस्थ, अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की, सोलापूर शहर आणि ग्रामीण भागांतील गणेशभक्त हिप्परगा तलाव येथे श्री गणेशमूर्ती आणि निर्माल्य विसर्जनासाठी येतात. तलाव १०४ टक्के भरला असून सांडव्यातून पाणी जात आहे. तलावातील पाण्याचा वापर शहर आणि आजूबाजूचे लोक पिण्यासाठी, शेतीसाठी, तसेच जनावरांसाठी करतात. श्री गणेशमूर्ती आणि निर्माल्य यांचे विसर्जन केल्यास तलावातील पाणी प्रदूषित होईल. त्यामुळे विसर्जनाची सोय तलावाच्या बाजूला असलेल्या खाणीमध्ये करण्यात आली आहे. प्रशासनाकडून श्री गणेशमूर्ती विसर्जन खाणीमध्ये करतांना पावित्र्य राखले जाणार आहे.
मागील वर्षी संभाजी तलावामध्ये बांधलेल्या हौदांची विदारक स्थिती !
सोलापूर महापालिकेने मागील वर्षी छत्रपती संभाजी तलावामध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी हौद बांधले होते. सध्या त्याची अवस्था मोडकळीस आली असून तेथे अस्वच्छताही पुष्कळ आहे. यंदाच्या वर्षी महापालिकेने तथाकथित प्रदूषणाच्या नावाखाली तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी घालून कृत्रिम कुंड ठेवले आहेत. (तथाकथित प्रदूषणाच्या नावाखाली तलावामध्ये मूर्ती विसर्जनास बंदी घालणार्या महापालिका प्रशासनाला तलावातील ही विदारक स्थिती दिसत नाही का ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|