सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांनी काढलेल्या चित्रांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांचा आज, ७.९.२०२२ (भाद्रपद शुक्ल द्वादशी) ‘वामन जयंती’ या दिवशी ४ था वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांनी काढलेल्या दोन चित्रांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव, त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती आदी सूत्रे पाहूया.

पू. वामन राजंदेकर

पू. वामन राजंदेकर यांच्या चरणी त्यांच्या ४ थ्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

‘पू. वामन यांचे वय अवघे ४ वर्षे आहे; परंतु ते अत्यंत प्रगल्भ आहेत. ते ३ वर्षे ९ मासांचे असतांना १२ ते १८ जून या कालावधीत गोव्यात झालेल्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या’ कालावधीत पू. वामन यांनी चौकोन आखलेल्या वहीच्या एका पानावर चौकोनांमध्ये १९३ प्रकारच्या विविध आकृत्या काढल्या. त्याचप्रमाणे १४ जून २०२२ या दिवशी सनातनच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पू. वामन यांनी त्यांच्यासाठी एक चित्रमय शुभेच्छापत्र (भेटकार्ड) बनवले. संत कोणतेही कार्य अनावश्यक करत नसतात. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काही आध्यात्मिक कार्यकारणभाव दडलेला असतो. देवतांप्रमाणेच संतही तारक आणि मारक अशा दोन्ही स्वरूपांचे कार्य आवश्यकतेनुसार करत असतात. पू. वामन यांनी काढलेली दोन्ही चित्रे तारक आणि मारक या त्यांच्या दोन्ही रूपांशी संबंधित आहेत. देवाच्या कृपेने पू. वामन यांनी काढलेल्या या दोन्ही प्रकारच्या चित्रांच्या मागील मला उमजलेला आध्यात्मिक कार्यकारणभाव पुढीलप्रमाणे आहे.

पू. वामन यांनी चौकोन आखलेल्या वहीच्या एका पानावर चौकोनांमध्ये १९३ प्रकारच्या विविध आकृत्या काढल्या. त्यांपैकी काही आकृत्या या छायाचित्रात दिल्या आहेत.

१. पू. वामन यांच्याकडून झालेले मारक कार्याचे प्रतीक असणार्‍या चित्रामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

१ अ. पू. वामन राजंदेकर हे जरी स्थुलातून बालक दिसत असले, तरी ते संत असल्यामुळे त्यांना सूक्ष्मातील धर्म-अधर्म लढ्याची पूर्ण कल्पना असणे : ‘१२.६.२०२२ ते १८.६.२०२२ या कालावधीत गोव्यातील रामनाथी येथील श्रीरामनाथ देवस्थानाच्या सभागृहात अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन होते. या कालावधीत हिंदु राष्ट्र अधिवेशनात धर्मशक्तीचा जागर केला गेला. त्यामुळे या कालावधीत धर्म आणि अधर्म या दोन्ही प्रकारच्या शक्तींमध्ये सूक्ष्मातून घनघोर युद्ध झाले. तेव्हा समस्त देवता, ऋषिमुनी आणि संत हे धर्माच्या बाजूने लढत होते. पू. वामन राजंदेकर हे जरी स्थुलातून बालक दिसत असले, तरी ते संत आहेत. त्यामुळे त्यांना सूक्ष्मातून झालेल्या धर्म-अधर्म लढ्याची संपूर्ण माहिती होती.

१ आ. १५.६.२०२२ या दिवशी झालेल्या धर्म-अधर्म यांच्या सूक्ष्मातील लढ्यामध्ये पू. वामनही सूक्ष्मातून सहभागी झालेले असणे : १५.६.२०२२ या दिवशी अधिवेशनाच्या ठिकाणी ६ व्या आणि ७ व्या पाताळांतील वाईट शक्तींनी सूक्ष्मातून मोठे आक्रमण करून अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पृथ्वीवरील संत या वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढत होते. या सूक्ष्म लढ्यात पू. वामनही सूक्ष्मातून सहभागी झाले होते. या लढ्यात धर्माच्या बाजूने लढणार्‍या देव सेनेला साहाय्य करण्यासाठी पू. वामन कार्यरत झाले.

१ इ. पू. वामन यांनी विविध देवतांचे तत्त्व प्रक्षेपित करणार्‍या एकूण १९३ बीजमंत्रांचे चित्ररूप कागदावर काढणे आणि त्यातून प्रक्षेपित झालेल्या दैवी अस्त्रांनी वाईट शक्तींचा विनाश करणे : पू. वामन यांनी विविध देवतांचे तत्त्व प्रक्षेपित करणार्‍या एकूण १९३ बीजमंत्रांचे चित्ररूप कागदावर काढले. या बीजमंत्ररूपी चित्रांमध्ये विविध देवतांची मारक शक्ती कार्यरत होऊन ती दैवी अस्त्रांच्या रूपाने प्रगटली. त्या वेळी पू. वामन यांनी या दैवी शक्तीला अत्यंत भावपूर्ण वंदन करून त्यांना वाईट शक्तींचा संहार करण्याची प्रार्थना केली. त्यानंतर या बीजमंत्ररूपी आकारांतून उत्पन्न झालेली दैवी अस्त्रे मोठ्या वाईट शक्तींच्या दिशेने पाताळात गेली आणि त्यांचा मोठ्या वाईट शक्तींवर पाऊस पडून त्यांचा विध्वंस झाला. अशा प्रकारे पू. वामन यांनी अस्त्रयुद्ध करून धर्म आणि अधर्म यांच्या लढ्यात मोठ्या वाईट शक्तींचा पराभव केला. यावरून संतांचे सामर्थ आणि त्यांचे युद्धकौशल्य आपल्या लक्षात येते. अशी असामान्य प्रतिभा आणि अलौकिक सामर्थ्य असणारे संतच येणार्‍या काही वर्षांमध्ये पृथ्वीवरील हिंदु राष्ट्र सांभाळणार आहेत.

२. पू. वामन यांच्याकडून झालेले तारक कार्याचे प्रतीक असणार्‍या चित्रामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

१४ जून २०२२ या दिवशी सनातनच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पू. वामन यांनी त्यांच्यासाठी एक चित्रमय भेटकार्ड बनवले. संत कोणतेही कार्य अनावश्यक करत नसतात. संत हे ईश्वराचे सगुण आणि साकार रूप असतात. पू. वामन यांच्या मनामध्ये अन्य संतांप्रती पुष्कळ प्रमाणात आदरभाव आहे. त्यांच्या हृदयात पू. (सौ.) संगीता जाधवकाकूंच्या प्रती असणारा असीम आदरभाव त्यांनी बनवलेल्या शुभेच्छापत्राच्या (भेटकार्डच्या) चित्रातून जाणवतो. पू. वामन यांना पू. संगीताकाकू या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच प्रतीक असल्याचे जाणवते. त्यामुळे त्यांनी शुभेच्छापत्रावर वरच्या बाजूला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चित्र चिकटवले आणि खाली ‘पू. संगीताकाकूंना नमस्कार’ असे लिहिले. परात्पर गुरुदेवांच्या चित्राच्या दोन्ही बाजूला बनवलेल्या फुलांच्या आकृती पुष्कळ सजीव वाटतात. फुलांच्या चित्रातून पू. वामन यांचा निरागसभाव आणि बालकभाव प्रगट होतो.

३. संतांमध्ये समष्टीसाठी आवश्यक असणार्‍या तारक आणि मारक कार्याला अनुरूप असणारे भाव पू. वामन यांनी काढलेल्या दोन्ही प्रकारच्या चित्रांच्या माध्यमातून अनुभवण्यास मिळणे 

वरील दोन्ही चित्रांच्या उदाहरणातून असे लक्षात येते की, जेव्हा समष्टीच्या कल्याणासाठी देवतांच्या मारक शक्तीची आवश्यकता असते, तेव्हा संतांमध्ये क्षात्रतेज प्रगट होऊन त्यांचा क्षात्रभाव जागृत होतो आणि तो भाव त्यांचे वागणे, बोलणे अन् कृती यांतून समष्टीकडे प्रक्षेपित होऊन वाईट शक्तींशी घनघोर युद्ध होते. त्याचप्रमाणे जेव्हा समष्टीसाठी देवतांच्या तारक शक्तीची आवश्यकता असते, तेव्हा संतांमध्ये ब्राह्मतेज कार्यरत होऊन त्यांच्यामध्ये तारकशक्तीला अनुसरून असणारे निरागसभाव, बालकभाव, अनन्यभाव इत्यादी प्रकारचे भाव जागृत होतात. हे भाव संतांमध्ये काळानुसार दैवी कार्यासाठी प्रगट झालेले विविध प्रकारचे भाव त्यांच्या आचरणातून आपल्याला अनुभवण्यास मिळतात. ‘श्रीगुरुकृपेने पू. वामन यांच्यामध्ये प्रगट झालेल्या तारक आणि मारक अशा दोन्ही कार्यांच्या पूर्ततेसाठी अनुसरून असणारे भाव त्यांच्या चित्रांच्या माध्यमातून आम्हाला अनुभवण्यास मिळाले’, यासाठी मी पू. वामन यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.

कृतज्ञता

अवघ्या ३ वर्षांच्या बालसंतांनी धर्म-अधर्माच्या सूक्ष्मातील युद्धात धर्माच्या बाजूने लढून वाईट शक्तींचा नाश करणे, ही दैवी घटना सनातनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांत कोरली गेली. ‘श्रीगुरुकृपेमुळे भविष्यकाळात पृथ्वीवरील हिंदु राष्ट्राची धुरा सांभाळून अनेक जिवांचा उद्धार करणारे असे बालसंत आम्हाला लाभले’, यासाठी मी श्री गुरूंच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.६.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.