बासरीवादनातून संगीत साधना, क्रियायोगाची ध्यानसाधना आणि चिन्मय मिशनची ज्ञानसाधना करून सतत आनंदाची अनुभूती घेणारे सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हिमांशु नंदा !
६.९.२०२२ या दिवशीच्या लेखात आपण पंडित हिमांशु नंदा यांनी केलेली संगीत आणि आध्यात्मिक साधना अन् त्यांचे त्यांविषयीचे विचार पाहिले. आजच्या लेखात आपण पंडित नंदा यांनी अनुभवलेले श्री गुरूंचे मार्गदर्शन आणि त्यांचा श्री गुरूंविषयी असलेला भाव पहाणार आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/610327.html
६. पंडित हिमांशु नंदा यांनी अनुभवलेले श्री गुरूंचे मार्गदर्शन !
६ अ. धृपद परंपरेतील आठ मात्रेच्या आवर्तनातील जोड मोजायला चुकत असल्याने श्री गुरूंना शरण जाणे आणि त्यांनी केवळ ‘ध्यान कर’ एवढेच म्हणणे : ‘धृपद’ परंपरेत (टीप १) एक जोड (टीप २) असतो. यांत आठ मात्रांचे एक आवर्तन असते. त्यात तबला वाजत नसून हे आठ मात्रांचे चक्र आपल्या मनात मोजायचे असते; परंतु हे मला जमत नव्हते. त्यामुळे मी गुरूंकडे जाऊन त्यांना शरण गेलो. ते मला म्हणाले, ‘‘ध्यान कर.’’
त्याप्रमाणे ध्यान केल्यावर मला ‘संगीतातील ध्यान काय असते ?’, हे कळले. त्या दृष्टीने मी प्रयत्न चालू केले. गुरु माझ्याशी केवळ आध्यात्मिक विषयांवरच बोलायचे. ते नेहमी म्हणायचे, ‘‘संगीत म्हणजे केवळ शिकणे नसून तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे.’’
टीप १ – भारतीय संगीतात ख्याल गायकी प्रचारात येण्यापूर्वी संगीत धृपद-धमार गायकीतच सामावलेले होते. त्या काळातील अत्यंत लोकप्रिय गायनशैली म्हणजे धृपद.
टीप २ – संथ गतीतील आलापी नंतर थोडी लय वाढवून वादन करतात, त्याला ‘जोड’ म्हणतात.
६ आ. श्री गुरूंनी ‘आनंदप्राप्तीसाठी तुला सर्व सोडावे लागेल’, असे सांगितल्यावर क्षणाचाही विचार न करता वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी सगळे सोडून गुरुकुलात जाणे : वर्ष २००५ मध्ये मी श्री गुरूंकडे जाऊन त्यांना म्हणालो, ‘‘मी पैसे मिळवत आहे. मला काम मिळत आहे. माझ्या संगीत क्षेत्रातील जीवनात स्थैर्य आले आहे; पण तरीही मी आनंदी नाही.’’ तेव्हा श्री गुरु म्हणाले, ‘‘मग तुला सर्व सोडावे लागेल.’’ हे ऐकताच क्षणाचाही विलंब न करता मी सर्व सोडायला सिद्ध झालो. मी ‘आय्.आय्.टी.’मधील बासरी शिकवण्याची करत असलेली अर्धवेळ नोकरी सोडली. त्याच समवेत मी ज्यांच्या समवेत काम करत होतो, त्यांनाही सांगितले, ‘‘आता मी काम करणार नाही.’’ त्या वेळी मी केवळ ३० वर्षांचा होतो, तरी मी सर्व सोडून ५ वर्षांसाठी गुरुकुलात रहायला गेलो.
सर्व सोडण्याचा निर्णय सोपा नाही. यासाठी गुरुकृपाच हवी. श्री गुरूंच्या कृपेविना कुणीही इतका महत्त्वाचा निर्णय घेऊ शकत नाही. काही सोडल्याविना नवीन काही मिळत नाही. मी नोकरी सोडली, याचे मला अजूनही दुःख वाटत नाही; कारण या काळात मला श्री गुरूंचा सत्संग मिळाला.
(‘श्री गुरूंवरील निष्ठेमुळेच पंडित हिमांशु एवढा मोठा निर्णय घेऊ शकले. यावरून त्यांच्यातील गुरुनिष्ठा, साधनेची तीव्र तळमळ अन् श्री गुरूंचे आज्ञापालन हे गुण आपल्याला शिकता येतात.’ – संकलक)
७. पंडित हिमांशु नंदा यांचे श्री गुरूंविषयी असलेले विचार !
७ अ. गुरूंनी प्रसंगी शिव्या दिल्यावरही शिष्याला त्याचा राग न येणे; कारण त्याचे श्री गुरूंप्रती समर्पण असणे आणि या समर्पणामुळेच शिष्याला शिकता येणे : भारतातील गुरुपरंपरेनुसार श्री गुरु शिष्याला रागावतात आणि प्रसंगी शिव्याही देतात; परंतु शिष्याला त्याचे वाईट वाटत नाही. अन्य कुणी शिवी दिली, तर राग येईल; मात्र श्री गुरूंनी शिवी दिली, तर तो म्हणतो, ‘श्री गुरूंची कृपा झाली !’ हेच शिष्याचे समर्पण आहे. या समर्पणामुळेच शिष्य शिकतो.
७ आ. किनार्यावर थांबून समुद्राच्या विशालतेची कल्पना येऊ शकत नाही, त्याप्रमाणे श्री गुरूंचे माहात्म्य असीम असते.
८. पंडित हिमांशु नंदा यांचे संगीतविषयक मौलिक विचार !
८ अ. मंत्रजप आणि संगीत यांतील एखादी कृती, उदा. पलटा (टीप ३) किंवा षड्ज लावणे, हे एकसमान असणे; कारण दोन्हीमध्ये मन एकाग्र करावे लागणे : संगीत किंवा एखादा मंत्रजप हे मनाचे प्रशिक्षणच आहे. दोन्ही गोष्टींत मन एकाग्र करावे लागते, उदा. एक घंटा षड्ज (‘सा’ हा स्वर) लावणे किंवा १०८ वेळा मंत्रजप करणे, हे दोन्हीही एकच आहे. एक पलटा एक घंटा एकाच लयीत वाजवणे अन् मंत्रजप करणे, यांत काहीही भेद नाही. यासाठी मनाची एकाग्रता आणि श्री गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक आहे.
टीप ३ – नियमबद्ध आरोह-अवरोह (स्वरांचा चढता आणि उतरता क्रम) असणार्या स्वरसमूहांना ‘पलटा’ म्हणतात.
८ आ. माझे अनुभव शब्दातीत आहेत. मी ते शब्दांत कसे सांगणार ? केवळ आनंदच आहे. ज्याने यातील आनंद अनुभवला आहे, त्यालाच हे कळू शकेल.
८ इ. दृत गतीतही मन शांत ठेवणे, हेच आमच्या श्री गुरूंनी शिकवले आहे.
८ ई. संगीत साधनेमुळे व्यक्तीमत्त्वाचा विकास होणे : एक चांगला गुरुच त्याच्या शिष्याचे व्यक्तीमत्त्व विकसित करू शकतो. संगीत सामान्य साधकाला संगीतकार बनवते. सामान्य साधकाचा संगीतकार बनणे, हा एक विकास आहे. प्राथमिक टप्प्याला मीही ‘सा रे ग म..’ वाजवत होतो. आता पुढे गेल्यावर समजते, ‘हा अथांग सागर आहे !’ मनुष्याचा असा विकास होणे, म्हणजेच व्यक्तीमत्त्व सुधारणे होय !
८ उ. ‘जीवनात कोणीतरी मोठे व्हायचे’, असे ध्येय ठेवणे म्हणजे जीवन वाया घालवणे होय, त्यापेक्षा ‘देव कुठे घेऊन जात आहे ?’, याकडे लक्ष देणे आवश्यक असणे : १० वर्षांपूर्वी तुम्ही मला विचारले असते, ‘‘तुम्ही संगीत क्षेत्रात का आहात ?’’, तर मी म्हणालो असतो, ‘‘मला मोठा कलाकार व्हायचे आहे !’’ आता असे ‘काहीतरी वेगळे’ बनण्याची आवश्यकताच वाटत नाही. बाहेरच्या कलाकारांचे ‘मोठा कलाकार व्हायचे आहे, पैसे मिळवायचे आहेत’, हे ध्येय असते. त्या दृष्टीने ‘मी असे काही ध्येय ठेवले नाही. देव जिथे घेऊन जाईल, तिथे मी जाणार आहे. ‘त्याने माझ्यासाठी ठरवलेला मार्ग सुनिश्चित आहे’, हे लक्षात आले, तर आयुष्य फार सोपे होऊन जाते. ‘काहीतरी’ बनण्याच्या नादामध्ये आपण जीवन जगणेच विसरून जातो. ‘देव कुठे घेऊन जात आहे ?’, याकडे लक्ष द्यायला हवे.’
(‘यांतून ‘पंडित हिमांशु स्वेच्छेतून ईश्वरेच्छेकडे गेले आहेत’, हे लक्षात येते.’ – संकलक)
८ ऊ. पूर्वाभ्यास शिकतांना विद्यार्थ्यांकडून केवळ वादन करवून न घेता त्यांना सात्त्विक जीवनशैली शिकवून त्यांच्याकडून ध्यान करवून घेणे : अनेक विद्यार्थी माझ्याकडे शिकण्यासाठी येतात. तेव्हा आम्ही त्यांच्याकडून केवळ बासरीवादन करवून घेत नाही, त्या समवेत आम्ही त्यांच्याकडून ध्यान करवून घेणे, त्यांना सात्त्विक जीवनशैली शिकवणे इत्यादी अनेक सात्त्विक कृती करवून घेतो. त्यामुळे ‘समाजातील सात्त्विक मुलेच या ठिकाणी आकर्षित होतात’, असे माझ्या लक्षात आले आहे.
९. इतर वाद्यांच्या तुलनेत बासरीची वेगळी वैशिष्ट्ये !
९ अ. मानवी शरिराप्रमाणे बासरीतही नऊ छिद्रे असणे : बासरीत ७ छिद्रे आणि वरची अन् खालची पोकळी मिळून एकूण ९ छिद्रे आहेत. मानवी शरिरातही ९ द्वारे आहेत. त्यामुळे मानवी शरीर आणि बासरी यांत साम्य आहे.
९ आ. बासरीत फुंकर मारली जाते, तर योग करतांना शरिरात श्वासोच्छ्वास घेतला आणि सोडला जातो. याचा अर्थ ‘बासरी वाजवणे’ हाही एक प्रकारचा योग आहे.
९ इ. बासरीवादन एक साधना ! : आध्यात्मिक साधनेचे उच्चतम ध्येय काय आहे ? स्वतःला पूर्णपणे रिकामे, म्हणजे अहंकाररहित करणे ! बासरी मुळातच रिकामी आहे. बासरीवादन केवळ वादन नसून तिच्याकडे साधना म्हणून बघू शकतो.
भगवान श्रीकृष्णाने बासरीचे वादन केले; कारण बासरी ही अन्य वाद्यांपेक्षा अगदी साधी आहे. देवाला यातून साधेपणा शिकवायचा आहे.
१०. शेवटी नादालाही सोडल्यावरच शांतीचा अनाहत नाद प्राप्त होत असणे
‘प्रारंभी विद्यार्थ्याला आलंबन म्हणजे एकाग्रता किंवा अनुसंधान करायला शिकवावे लागते. त्यानंतर त्याला सर्व सोडावेच लागते. अगदी वादनालाही सोडावे लागते, नादही सोडावा लागतो; कारण यातील उच्च स्थिती म्हणजे शांती आहे. तेथे कोणताही नाद अस्तित्वात नसतो. ही शांती आपल्यात स्वयंभू आहे. वाद्यांचा नाद हा आहत नाद आहे, तर शांती म्हणजे ‘अनाहत नाद’ आहे. त्यामुळे या शांतीच्या अनाहत नादाला प्राप्त करायचे असेल, तर हा वाद्यांचा नाद सोडावा लागतो. मनुष्य आतून स्थिर झाल्यावरच त्याला आतला शांतीचा नाद, म्हणजे ‘अनाहत नाद’ ऐकू येतो. साधक जेव्हा त्या नादाशी एकरूप होतो, तेव्हा अन्य सर्व बाहेरील नाद गोंधळ (Noise) वाटू लागतात.’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, संगीत विशारद) संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.