पिंपरी-चिंचवड महापालिकेची पर्यावरणाच्या विषयीची सहानुभूती केवळ गणेशोत्सवापुरतीच ! – दिगंबर काशिद, पर्यावरणासाठी काम करणारे कार्यकर्ते
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पर्यावरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. महानगरपालिका पर्यावरणाविषयी असलेली सहानुभूती ही केवळ गणेशोत्सवामध्येच व्यक्त करते; पण वस्तूस्थिती अशी आहे की, चिखली, कुदळवाडी या परिसरामध्ये लाखो टन प्लास्टिक, फायबर, अविघटनशील घातक पदार्थ जाळले जातात, इंद्रायणी नदीचे प्रदूषण केले जाते. याकडे पिंपरी महापालिका दुर्लक्ष करत आहे आणि विनाकारण गणेशोत्सवाच्या वेळेस पर्यावरणाविषयी सहानुभूती व्यक्त करत आहे, असा आरोप करत महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जाहीर विरोध पर्यावरणासाठी काम करणारे दिगंबर काशिद यांनी केला आहे. ‘महापालिकेचा पर्यावरण विभाग हा केवळ हप्ते वसूल करण्यासाठीच आहे’, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.
दिगंबर काशिद पुढे म्हणाले की, अविघटनशील घातक पदार्थ जाळणार्यांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र पर्यावरण मंत्रालय या सर्वांना निवेदन दिले आहे. तरीही त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. केवळ गणेशोत्सवाच्या वेळेसच पर्यावरणाविषयी कळवळा व्यक्त केला जातो. हे सर्व हत्ती सोडून शेपूट धरण्याचे काम आहे. तसेच महानगरपालिका ही पर्यावरणाविषयी अतिशय संवेदनशील आहे, हे दाखवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे असे काही नसून त्यांना पर्यावरणाची कोणतीही काळजी नाही.
संपादकीय भूमिकापुणे महापालिकेच्या ढोंगी पर्यावरणवादाची ‘पोलखोल’ करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनो संघटित व्हा ! |