ब्रिटनमधील सत्तापालट !
ऋषि सुनक यांनी आत्मपरीक्षण केल्यास हातातून निसटलेला विजय ते येत्या काळातही परत मिळवू शकतात !
एकेकाळी भारतासह अनेक राष्ट्रांना अनेक वर्षे गुलामीत ठेवून जगावर अधिराज्य गाजवणार्या; मात्र सध्या छोट्या आकारात असणार्या ब्रिटनमधील निवडणूक नुकतीच पार पडली. पंतप्रधान म्हणून ४७ वर्षांच्या लिज ट्रस या निवडून आल्या असल्या, तरी भारतीय वंशाचे ऋषी सुनक या त्यांच्या प्रतिस्पर्ध्याशी लढत देऊन त्या निवडून आल्या, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. ज्या भारतावर ब्रिटनने १५० वर्षे अनन्वित अत्याचार केले, त्या भारतीय वंशाचा पंतप्रधान तेथे होण्याची शक्यता बळावली होती आणि म्हणूनच भारतियांसाठी ती कौतुकाची गोष्ट होती. अर्थात् अफ्रिकेत जन्मलेले हिंदु वंशाचे ऋषि सुनक यांना सनातन संस्कृतीविषयी पुष्कळ आत्मीयता नसली, तरी ते अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्यासारखे हिंदुविरोधी किंवा भारतविरोधीही नाहीत, तर ते स्वतःला हिंदु म्हणवून घेतात आणि हिंदु परंपरांचे पालनही करतात. हातात गंडा बांधणारे आणि जन्माष्टमीला प्रार्थना करणारे सुनक यांना लोकांनी पाहिले आहे. असे असूनही एका ख्रिस्ती देशामध्ये १ लाख ४१ सहस्रांपैकी ६० सहस्र मते त्यांना मिळाली, हेही विशेष आहे. ट्रस यांच्या विजयाच्या संदर्भात प्रामुख्याने असे म्हटले जात आहे की, वंशवादाच्या नैसर्गिक ओढीमुळे लोकांनी ट्रस यांना मते दिली, असे नाही, तर ‘ट्रस या अधिक चांगल्या उमदेवार आहेत’, असे तेथील मतदारांना वाटल्याने २१ सहस्रांच्या मताधिक्याने त्या निवडून आल्या.
सुनक यांच्या अपयशाची कारणमीमांसा
केनियामधून स्थलांतरित झालेले सुनक हे श्रीमंत कुटुंबातील आहेत आणि ‘इन्फोसिस’ या जगप्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य अस्थापनाचे मालक नारायण मूर्ती यांचे ते जावई झाले. त्यांची पत्नी अक्षता यांचे ‘इन्फोसिस’ आस्थापनात एक अब्ज डॉलर रकमेचे समभाग आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ब्रिटनचे नागरिकत्व घेतलेले नाही आणि त्यामुळे त्यांना त्याचा पूर्ण कर भरावा लागत नाही. सुनक यांची जीवनशैलीही गर्भश्रीमंत खानदानी व्यक्तीप्रमाणे आहे. अनेक वेळा उंची वस्तू वापरतांनाची त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. विशेष म्हणजे सुनक हे स्वतः अर्थमंत्री होते आणि त्यांची पत्नी अक्षता यांनी मोठ्या प्रमाणात कर बुडवल्याने त्यांना कर भरण्यासाठी विनवण्या कराव्या लागल्या. या सर्व गोष्टी अर्थातच कुठेतरी सुनक यांच्या नैतिकतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणार्या ठरल्या. ब्रिटनच्या राणीपेक्षा श्रीमंत मानली जाणारी आणि कर चुकवण्यास प्राधान्य देणारी सुनक यांची पत्नी एका अर्थाने त्यांच्या अपयशास कारणीभूत ठरली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जगभराचा पैसा वापरण्याची सवय असलेल्या ब्रिटिशांना ब्रिटनमधील पैशाने अन्य कुणी श्रीमंत झालेले अर्थातच फारसे रुचत नाही. त्यामुळे ‘कन्झरवेटिव्ह’ पक्षाचे खासदार आणि नेते यांचा सुनक यांना चांगला पाठिंबा असला, तरी तेथील सामान्य कर्मचार्यांचा मात्र तेवढा मनापासून पाठिंबा त्यांना मिळाला नाही. त्यामुळे वंशवाद नसला, तरी गरीब-श्रीमंतीच्या दरीचे एक कारण सुनक यांच्या अपयशाच्या पाठीमागे असल्याची चर्चा आहे. अर्थमंत्री असलेले सुनक यांनी अधिकाधिक कर भरण्याच्या दृष्टीने धोरण आखले होते आणि महागाई ओसरल्यावर कर न्यून करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, तर ट्रस यांनी करकपातीच्या धोरणांना प्राधान्य दिले आणि त्याला तेथील अर्थतज्ञांनी पाठिंबा दिला. या जोडीलाच सुनक आणि माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यात एक प्रकारची सुप्त स्पर्धा होती, अशीही चर्चा आहे. अनेकदा सुनक यांचे भ्रमणभाषही जॉन्सन उचलत नसत. या पार्श्वभूमीवर सुनक यांना ही लढत एकट्याच्या बळावर द्यायची होती, तर याउलट ट्रस या प्रथमपासूनच जॉन्सन यांच्यासमवेत असणार्या होत्या. मतदारांनी ही बाजूही लक्षात ठेवली आणि त्याचा ट्रस यांना जिंकण्यासाठी नैसर्गिकरित्या लाभ झाला. निवडणुकीत ५ फेर्यांपर्र्यंत म्हणजे आरंभीच्या काळात सुनक आघाडीवर होते; मात्र नंतर त्यांचे प्रचारतंत्र असे काहीतरी चुकले की, नंतरच्या फेर्यांमध्ये ते अपेक्षित मते मिळवू शकले नाहीत. ‘त्यांचा गृहपाठ अल्प पडला’, असे तेथील तज्ञ सांगत आहेत. या जोडीलाच जॉन्सन यांनी त्यागपत्र देण्याच्या कितीतरी दिवस आधीपासून सुनक निवडणुकीसाठी अप्रत्यक्षरित्या सिद्धता करत होते, जणूकाही जॉन्सन त्यागपत्र देतील, हे सुनक यांना ठाऊक होते. जॉन्सन यांच्या पायउतार होण्यामागे सुनक यांचा हात असल्याचा आरोपही झाल्याने मतदारांना ते खटकले होते. निवडणुकीच्या वेळी सुनक यांनी सर्व खासदारांना विश्वासात घेण्याची आवश्यकता होती. त्यांच्याकडे प्रसारासाठी आदर्श व्यवस्थाही काम करत होती. याउलट ट्रस यांच्याकडे विशेष असे सांगण्यासारखे काही नव्हते. केवळ जॉन्सन यांच्याशी एकनिष्ठा ही त्यांच्या जमेची बाजू होती आणि त्या बळावर मतदारांनी त्यांना प्राधान्य दिले.
ट्रस आव्हान पेलतील का ?
नुकताच उष्णतेच्या प्रचंड लाटेने ब्रिटनही होरपळून निघाला आहे आणि सध्या ऊर्जेवरील खर्चाचा मोठा सामना ब्रिटन करत आहे. एकूणच ब्रिटनची अर्थव्यवस्थाही वेगाने घसरत आहे. या पार्श्वभूमीवर ‘सुनक हे ब्रिटनसाठी अधिक योग्य नेतृत्व ठरले असते’, असे काही अभ्यासकांना वाटते. अंततः जय-पराजय हा नियतीचा खेळ आहे. काळाच्या धर्मशास्त्रीय सिद्धांतानुसार ब्रिटनने अनेक वर्षे जगातील अनेक राष्ट्रांवर अन्याय करून त्यांना लुबाडले आणि आता त्याच्या अधःपतनाला काहीसा आरंभ झाला आहे, असे म्हणावे लागेल. एकेकाळी सूर्य न मावळणारा म्हणजे एवढ्या राष्ट्रांवर एकाच वेळी राज्य करणारा ब्रिटन आज अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. ट्रस महागाईसह ही सर्व आव्हाने पेलण्यास कितपत सक्षम आहेत ?
हा एक प्रश्न आहेच. जरी त्या तडफदार बोलणार्या असल्या आणि ब्रिटनच्या पूर्वीच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर त्यांच्या आदर्श असल्या, तरी थॅचरबाईंएवढा सक्षम कणखरपणा त्यांच्याकडे नाही. त्यामुळे येत्या काळातील आव्हाने त्या कशा पेलतात ? हा पहाण्याचा विषय ठरेल !