मालवण येथील ‘समुद्रकिनारा स्वच्छता यंत्रा’च्या चौकशीची मागणी करणार ! – विजय केनवडेकर, भाजप
मालवण – येथील समुद्रकिनारी शुभारंभ करण्यात आलेले ‘समुद्रकिनारा स्वच्छता यंत्र’ (बीच क्लिनिंग मशिन) ठेकेदारासाठी लाभदायक ठरत असून हे यंत्र म्हणजे जनतेच्या डोळ्यांत धूळफेक आहे. त्यामुळे ‘या यंत्राविषयी चौकशी करावी’, अशी मागणी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे करण्यात येईल, अशी माहिती भाजपचे प्रभारी मालवण तालुकाप्रमुख विजय केनवडेकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पर्यटन मंत्रालयाने हे एकमेव यंत्र दिले आहे. किनार्यावरील वाळूतील कचरा गोळा करून, त्याचे वर्गीकरण करून तो बाहेर काढण्याची व्यवस्था असणारे यंत्र आवश्यक आहे. सध्या उपलब्ध झालेल्या यंत्राने ओल्या वाळूसह कचरा गोळा होतो; मात्र त्याचे वर्गीकरण करणे कठीण होत आहे. हे यंत्र आणि ते वापरण्याचा १ वर्षाचा ठेका देण्यात आला असून त्यासाठी दीड लाख रुपये ठेकेदाराला देण्यात येणार आहेत. या यंत्राचा १ वर्षाचा ठेका असला, तरी पावसाळ्याचे ४ मास सोडून केवळ ८ मासच हे यंत्र वापरता येणार आहे. एक वर्षाने हे यंत्र जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरित करायचे आहे. १ वर्षानंतर हे यंत्र कोण हाताळणार ? हे जिल्हा प्रशासनालाच ठाऊक नाही. त्यामुळे या यंत्राविषयी चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे, असे केनेवडेकर यांनी याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.