जगभरात सर्वाधिक लोकप्रिय असलेली देवता श्री गणेश !

वर्ष २०१९ मध्ये ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीने आफ्रिकेतील देश घाना येथील हिंदू गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करतात, याविषयी माहिती देणारा व्हिडिओ प्रसारित केला होता. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानेही तो व्हिडिओ पुन्हा एकदा सर्वत्र प्रसारित होत आहे (‘व्हायरल’ होत आहे). त्यामध्ये १९४० च्या दशकात घाना येथे गेलेल्या हिंदु कामगारांमुळे हिंदु धर्माचा तिथे प्रसार झाला आणि तेथील स्थानिक लोकही हिंदु धर्माच्या शिकवणीने प्रभावित होऊन त्यांनी हिंदु धर्म स्वीकारला असल्याचे सांगण्यात आले आहे. आज तेथील अनेक लोक श्री गणेशचतुर्थीचे व्रत पाळतात. यातून हिंदूंचे आराध्य श्री गणेश यांच्या उपासनेच्या विस्तारत्वाची कल्पना येऊ शकेल. प्रस्तुत लेखातून नेमक्या याच विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे. दैनिक ‘नवशक्ति’मध्ये प्रकाशित झालेला हा लेख सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमच्या वाचकांसाठी साभार प्रकाशित करत आहोत.

(उत्तरार्ध)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/610371.html

विभिन्नरूपी श्री गणेश

‘शैव संप्रदायात तो शिवपुत्र आणि शिवाचा मुख्य गण असा, तर वैष्णव संप्रदायात तो अनिरुद्ध गणपति, वासुदेव आदी रूपात आढळतो. गाणपत्य संप्रदाय हा प्रामुख्याने गणेशपूजनाचा संप्रदाय पंथ असल्याने गणेश हाच पूर्ण परब्रह्म आणि सच्चिदानंद स्वरूप मानतात. शाक्त संप्रदाय हा देवी पूजनाचा प्रमुख पंथ आहे आणि श्रीदेवीस परब्रह्म स्वरूपिणी अन् जगन्माता मानतात.

शाक्त संप्रदायात दक्षिणमार्गी आणि वाममार्गी असे दोन भेद आहेत. दोन्ही पंथात गणेशपूजन प्रामुख्याने होते. गणेशास ‘वल्लभा’, ‘गणेश’, ‘शक्ती गणपति’, ‘लक्ष्मी गणपति’, अशा वैवाहिक स्वरूपात दर्शवला जातो.

– सतीश नायक (साभार : दैनिक ‘गोमंतक’, २० ऑगस्ट २००१)

श्री गणेश ही जगातील सर्वांत लोकप्रिय देवता आहे. या लेखाच्या पूर्वार्धात काल आपण जगभरात गेलेल्या हिंदूंसमवेत गणपतीची भक्ती आणि त्याचे स्वरूपही पोचणे, जगातील ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, नेपाळ, चीन, श्रीलंका आणि ब्रह्मदेश या देशांमध्ये करण्यात येत असलेली श्री गणेशाची भक्ती अन् त्याची मंदिरे इत्यादींविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती पाहिली. आज या लेखाचा उत्तरार्ध पाहूया.

३. जगातील विविध देशांमध्ये करण्यात येत असलेली श्री गणेशाची भक्ती आणि त्याची मंदिरे !

३ ऊ. जपानमध्ये काही पुस्तकांवर श्री गणेशमूर्ती विराजमान असणे : जपानमध्ये ‘क्युआनशि-तिएन’ हा श्री गणेश संप्रदाय म्हणून ओळखला जातो. जपानमध्ये योकोहामा भागात गणपतीच्या मूर्ती कोरण्यात आल्याचे संशोधकांना आढळून आले. जपानमध्ये आजही २२ इंचापेक्षा मोठी मूर्ती आढळत नाही. (छायाचित्र १ पहा.) तेथील काळ्या पाषाणावरील सोनेरी रंगातील गणपतीची कलाकृती टाकोआ मंडळातील ‘डिनगो-जी टोकासन’ येथे आहे. ‘काबो-डाई’ हा गणपति चतुर्भूज आहे. इतर न आढळणारी आयुधे त्याच्या हातात आहेत. उजव्या बाजूच्या हातात कुर्‍हाड, दुसर्‍या हातात कुंभ, डाव्या हातात धनुष्यबाण, तर एका हातात पुष्पमाळा, निळे डोळे, हसरा तोंडवळा, तसेच विद्वान पंडिताप्रमाणे असलेली शेंडी अशा प्रकारची श्री गणेशमूर्ती तेथील काही पुस्तकांवर विराजमान झालेली आहे. विद्येचा अधिपती असलेल्या गणपतीचे असे दर्शन जपानमध्ये घडते.

जपानमधील डावीकडून सरस्वतीदेवी, उजव्या हातात कुर्‍हाड असलेला श्री गणेश आणि कुबेर यांची प्राचीन मूर्ती

३ ए. अफगाणिस्तानमध्ये श्री गणेशाची अत्यंत दुर्मिळ मूर्ती जगप्रसिद्ध असणे : अफगाणिस्तानातील गार्देझ भागात काही वर्षांपूर्वी श्री गणेशमूर्ती सापडली होती. काबूलचे रहिवासी तेथील पामीर सिनेमाजवळ दर्गापीर रतननाथ येथे गणपतीची पूजा करतांना आढळून येतात. ही मूर्ती उभी असून चौथर्‍यावर सुंदर विनायकाची प्रतिष्ठापना महाराज फिराज सिंगला यांनी वयाच्या ८० व्या वर्षी महाज्येष्ठ मासी त्रयोदशीला विशाखा सिंह लग्नाच्या शुभ मुहूर्तावर केली होती. ‘ही मूर्ती ५ व्या शतकाच्या उत्तरार्धातील किंवा ६ व्या शतकाच्या पूर्वार्धातील असावी’, असे संशोधकांचे मत आहे. अत्यंत दुर्मिळ आणि एकमेव महाविनायक म्हणून अफगाणिस्तानातील ही श्री गणेशमूर्ती जगभरात प्रसिद्ध आहे.

३ ऐ. इटलीच्या रोममध्ये श्री गणेश ‘गुरु’ म्हणून ओळखला जाणे : रोममध्ये श्री गणेश ‘गुरु’ म्हणून ओळखला जातो. वर्ष ७९१ मध्ये लॅटिन भाषेत एक पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात गणपतीचा उल्लेख ‘विद्येचा स्वामी’ असाच करण्यात आला आहे. रोममध्ये श्री गणेशमूर्तीचा तोंडवळा एकूण मूर्तीच्या आकाराच्या मानाने मोठा आहे. गणपतीच्या डाव्या कानावर शिवप्रतिमा आणि त्रिशूल असून कानही पुष्कळ मोठे वाटतात. मूर्तीची उंची, डोक्याचा प्रकार आणि भव्यता रोमन पद्धतीची जाणीव करून देतो. ही श्री गणेशमूर्ती दुर्मिळ म्हणून ओळखली जाते.

३ ओ. मेक्सिकोमध्ये श्री गणेशमूर्ती : मेक्सिकोतील कोपानच्या मंदिरामध्ये श्री गणेशमूर्ती आहे. ती द्विभुज असून तिच्या दोन्ही हातात विजेचे प्रतीक म्हणून प्रकाशनळ्या आहेत.

३ औ. तैवान आणि दक्षिण कोरिया येथे गणेशोत्सव साजरा केला जाणे : तैवान आणि दक्षिण कोरिया येथे अनेक मराठी अन् हिंदी भाषिक माणसे स्थायिक असून तेथे १५० हून अधिक जण गणेशोत्सव सोहळ्यात सहभागी होतात. सिओल राष्ट्रीय विद्यापिठाने येथील गणेशभक्ती आणि गणेश सोहळा यांना प्रोत्साहन दिले आहे. इस्कॉनकडून तेथे हिंदी बांधव गीतापठणही करतात.

३ अं. अमेरिकेत मराठी मंडळांनी १० दिवस गणेशोत्सव साजरा करणे : अमेरिकेतील मराठी माणसांनी त्यांच्या भागात मराठी मंडळांची स्थापना केली आहे. या मंडळाचे स्थानिक पदाधिकारी इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्या स्तरावर गणेशोत्सवाची माहिती प्रसारित करतात. त्यामुळे अमेरिकेतील मराठी मंडळांची महती आजतरी जगभरात दुमदुमत आहे. ही मराठी मंडळे श्री गणेशमूर्तीची स्थापना करून गणेशोत्सव १० दिवस साजरा करतात.

कॅनडा, ऑस्ट्रेलिया (छायाचित्र), इंग्लंड आणि आखाती देशांमध्येही मराठी मंडळे आहेत. तेथे गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळेच ‘जगभरात गणपति हा लोकप्रिय देव आहे’, असे मानले जाते.

ऑस्ट्रेलियातील ‘स्टेनवेल पार्क बीच’ येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी हिंदूंनी काढलेली मिरवणूक

४. विविध देशांमध्ये गणपतीच्या विविध मंदिरांची स्थापना केलेली असणे

अमेरिकेतील अलास्का, न्यूयॉर्क, ॲरिझोना, उताह आणि वॉशिंग्टन येथे गणेशोत्सव अतिशय भव्य स्वरूपात पार पडतो. लंडन येथील इफ्रा रोडवर गणपतीचे छान मंदिर आहे. दक्षिण आफ्रिकेत डर्बन, लेडीस्मिथ आणि माऊंट एचकॉम्ब येथे गणपतीची अनुक्रमे ३ मंदिरे आहेत. नेदरलँड्समध्ये लेडेन म्युझियम ऑफ एन्थॉलॉजीमध्ये गणपतीची सुरेख मूर्ती आहे. जर्मनीतील हॅम, स्टुटगार्ट आणि हेलिब्रॉन भागात श्री सिद्धिविनायकाची ३ मंदिरे आहेत. हॉस्टिगन येथे वराहसिद्धिविनायकाचे मंदिर आहे.

कॅनडामधील ओंटारियो येथे ४ विनायक मंदिरे आहेत. एडमन्टन येथे तर महागणपतीची मंदिरे आहेत. ऑस्ट्रेलियातील अनेक भागात स्वयंभू गणपतीची पाळेमुळे सापडतात. मेलबर्न, क्वीन्सलँड, मॅगील ऑकलंड पार्क आणि दक्षिण ऑस्ट्रेलियात गणपतीची मंदिरे आहेत. मेक्सिकोत अनेक ठिकाणी झालेल्या उत्खननामध्ये श्री गणेशमूर्ती सापडल्याची उदाहरणे आहेत.

५. जगाच्या कानाकोपर्‍यांमध्ये सर्वत्र गणपतीची मंदिरे आढळणे आणि सर्वत्र गणेशभक्त आढळणे

बँकॉक ही थायलंडची राजधानी असून तेथील महापालिकेचे बोधचिन्ह गणपतीचे आहे. तेथील जागतिक व्यापार केंद्रामध्ये अनेक श्री गणेशमूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. सिंगापूर येथे विनायकाचे मंदिर आहे. मलेशियात श्री गणेश गुफा आहेत. कुआलालंपूर, रुदाकन आणि कलंग भागात सिद्धिविनायकाची मंदिरे आहेत. मंगोलियात तिबेटी लोकांनी भारतीय गणपति नेला. ब्रुनोई येथील गणपति ‘महाबिनी’ या नावाने ओळखला जातो. व्हिएतनामच्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी गणपति दिसतात. तेथील सयामी पुस्तकांमध्ये गणपतीची छायाचित्रे आढळतात. तेथील गणपति कासवावर बसलेला आढळून येतो. इंडोनेशियात २० सहस्रच्या नोटेवर ९ व्या शतकात गणपतीचे छायाचित्र आढळून आले असून ते येथील संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.

जावा येथे गणपति ‘कलांतक’ या नावाने ओळखला जातो. वर्ष १२३९ पासून तेथे श्री गणेश मंदिरे बांधली जात आहेत. कंबोडियात वर्ष ८९९ ते ९०० च्या काळात श्री गणेशमूर्ती सापडल्या. सुमात्रा येथे ७ व्या ते १३ व्या शतकापासून श्री गणेशमूर्ती आढळून आल्या आहेत.

जगाच्या कानाकोपर्‍यांमध्ये सर्वत्र गणपतीची मंदिरे आढळतात. तेथे सर्वत्र गणपतीचे दर्शन घेणारी माणसे गणेशभक्ती करतात. अनेक देशांमध्ये सूर्योदयापूर्वी दीड ते दोन घंटे आधी उठून स्नानादी कृत्ये आटोपल्यावर गणेशदर्शन घेऊन गणेशस्तोत्रे म्हणण्याची प्रथा आहे. विदेशात गेलेल्या आणि तेथे स्थायिक झालेल्या हिंदुस्थानी माणसांनी जीवनात यश लाभण्यासाठी त्यांची गणेशभक्ती वाढवली. श्री गणेशाने त्यांना जीवनात ज्या गोष्टींची आवश्यकता भासली, त्या सर्व गोष्टी दिल्यानेच विदेशात गणेशभक्तीचे माहात्म्य वाढले.’

– श्री. सुनील वागळे (साभार : दैनिक ‘नवशक्ति’चा ‘श्री गणेश विशेषांक’, ३.९.२००८)