गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करा !
#Ganeshotsav #Ganeshotsav2022 #GaneshChaturthi #GaneshChaturthi2022 Ganesh Chaturthi गणेशचतुर्थी #गणेशचतुर्थी गणेश चतुर्थी #Ganapati #गणपती #गणेशमूर्ती #Ganeshmurti #Ganesh #गणेश गणेश Ganesh
गणेशभक्तांनो, गणेश चतुर्थीच्या काळात तुम्ही श्री गणेशाची भक्तीभावे अन् धर्मशास्त्रानुसार सेवा केली. आता त्याचे शास्त्रानुसार विसर्जन करण्याऐवजी, प्रसिद्धीसाठी पर्यावरण रक्षणाचा बनाव करणार्या नास्तिकांच्या हाती मूर्ती सोपवणार आहात का ? श्री गणेशमूर्ती धर्मशास्त्रानुसार शाडूच्या मातीची बनवल्यास पर्यावरणाचे रक्षणही होईल अन् धर्माचरण केल्यामुळे श्री गणेशाची कृपाही होईल.
श्री गणेश चतुर्थी चलच्चित्रपट (Shri Ganesh Chaturthi Video)
गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित का करावे ?
अध्यात्मशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या काळात केलेल्या शास्त्रोक्त पूजाविधींमुळे मूर्तीत श्री गणपतीचे चैतन्य अधिक प्रमाणात आकृष्ट होते. मूर्ती पाण्यात विसर्जित केल्याने हे चैतन्य पाण्याद्वारे सर्वदूर पसरते. पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने हे चैतन्य वातावरणाद्वारेही दूरपर्यंत पोहोचते.
दुष्काळग्रस्त भागात मूर्तीविसर्जन करण्याचे पर्याय
अनेक ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे नद्या-ओहोळ आटतात. त्यामुळे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन शास्त्रानुसार वहात्या पाण्यात करण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आपत्काळ ओढवला असतांना धार्मिक कृती अध्यात्मातील तत्त्वांनुसार केल्यास ती धर्मशास्त्राला संमतच असते. यानुसार दुष्काळी स्थितीत श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी पुढील पर्याय अवलंबा !
१. लहान मूर्ती बसवणे
अ. प्रतिवर्षी मोठी मूर्ती आणण्याचा प्रघात असला, तरी दुष्काळी परिस्थितीत विसर्जनासाठी सुसंगत होईल, अशा लहान (६-७ इंच उंच) मूर्तीची पूजा करावी.
आ. उत्तरपूजेनंतर ही मूर्ती घराबाहेर तुळशी वृंदावनाच्या जवळ किंवा अंगणात किंवा शहरात सदनिकांत वास्तव्य करणार्यांनी घरातच भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये विसर्जित करावी.
इ. मूर्ती पाण्यात पूर्ण विरघळल्यानंतर ते पाणी आणि माती पायदळी येणार नाही, अशा रीतीने आपटा, वड, पिंपळ यांसारख्या सात्त्विक वृक्षांना घालावी.
२. मोठी मूर्ती कालांतराने विसर्जित करणे
मोठी मूर्ती बसवण्याचा पर्याय स्वीकारल्यास त्या मूर्तीची उत्तरपूजा झाल्यावर ती घरातच सात्त्विक ठिकाणी (उदा. देवघराच्या शेजारी) ठेवावी. या मूर्तीची पूजा करण्याची आवश्यकता नाही. धूळ बसू नये, यासाठी ती एखाद्या खोक्यात झाकून ठेवावी. पुढे वहाते पाणी उपलब्ध झाल्यानंतर ही मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करावी. वरील प्रकारचे विसर्जन केवळ अनावृष्टीसारख्या काळासाठी आपत्धर्म म्हणून संमत आहे.
– श्री. दामोदर वझेगुरुजी, संचालक, सनातन साधक-पुरोहित पाठशाळा, गोवा.
श्री गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदात का करू नये ?
प्रदूषणमुक्त गणेशमूर्ती विसर्जनाच्या नावाखाली काही महापालिकांकडून ठिकठिकाणी पाण्याचे हौद बांधले जातात. अशा हौदांत गणेशमूर्तीचे विसर्जन करणे अयोग्य आहे; कारण –
१. ‘प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करावे असे शास्त्र आहे. वहात्या पाण्यात मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे पूजेमुळे मूर्तीत आलेले चैतन्य पाण्यातून सर्वदूर पोहोचते. हौदातील पाणी वहाते नसल्यामुळे या आध्यात्मिक लाभापासून भाविक वंचित होतात.
२. हौदात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतर पालिकेचे कर्मचारी गणेशमूर्ती पाण्यात विरघळण्यापूर्वीच ती हौदातून काढून बाहेर ठेवतात. असे करणे शास्त्राच्या विरोधात आहे.
३. हौदात विसर्जित केलेल्या मूर्ती पालिकेच्या कचर्याच्या गाडीतून नेल्या जातात. तसेच पालिकेचे कर्मचारी मूर्ती कचर्याप्रमाणे फेकतात. बर्याच वेळा या मूर्ती खाणीतील घाण पाण्यात फेकतात.
४. गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर पालिका हौद बुजवण्यापूर्वी त्यातील गणेशतत्त्वाने भारित झालेले पाणी गटारात सोडून देते. हीसुद्धा श्री गणेशाची विटंबनाच आहे.
प्रदूषित नदीत मूर्तीविसर्जन करणे योग्य आहे का ?
‘गणेशमूर्तींचे नदीमध्ये वहात्या पाण्यात किंवा विहिरी, तलाव आदी नैसर्गिक जलाशयात विसर्जन करावे’, असे शास्त्र सांगते. नदीच्या वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याने मूर्तीतील गणेशतत्त्व पाण्यासह सर्वदूर पसरून त्याचा चराचर सृष्टीला लाभ होतो. आता प्रश्न असा आहे की, नदी प्रदूषित असेल, तर काय करावे ? या प्रश्नाच्या उत्तराला २-३ पैलू आहेत. खरे तर नदीचे प्रदूषण रोखण्याचे मुख्य दायित्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे आहे. नदीचे मुख्य प्रदूषण प्राधान्याने त्यामध्ये मिसळले जाणारे दूषित रासायनिक पाणी, तसेच विनाप्रक्रिया सोडले जाणारे मैलापाणी यांमुळे होते. नदीचे प्रदूषण करणार्या घटकांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली, तर नदीची निर्मळता अबाधित राहू शकते; पण साधारण अनुभव असा आहे की, स्थानिक स्वराज्य संस्था त्यामध्ये कुचकामी ठरल्या आहेत. त्यामुळे धार्मिक विधी पार पाडण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनीच नदी प्रदूषणरहित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक ती पावले उचलावीत, विसर्जनाच्या दिवशी नदीला अधिक पाणी सोडावे, यासाठी शासनदरबारी पाठपुरावा घ्यावा.
आता भाविकांच्या दृष्टीने विचार केला, तर आपल्या क्षेत्रात नदी अधिक प्रदूषित असेल, तर ज्या ठिकाणी नदीचे पाणी चांगले आहे, त्या ठिकाणी जाऊन गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. शास्त्रानुसार आचरण करण्यास प्राधान्य द्यावे.
‘इको फ्रेंडली’ गणेशमूर्तींच्या भूलथापांपासून सावधान !
सध्या ‘इको फ्रेंडली’ म्हणून कागदाच्या लगद्यापासून श्री गणेशमूर्ती बनवतात. हा प्रकार अशास्त्रीय आहेच, तसेच पर्यावरणालाही हानीकारक आहे; कारण कागदाचा लगदा पाण्यातील प्राणवायू शोषून घेतो अणि त्यातून जीवसृष्टीला हानीकारक अशा ‘मिथेन’ वायूची निर्मिती होते. धर्मशास्त्रानुसार मातीची मूर्ती बनवणे, हेच खरे पर्यावरणप्रेम आहे.
श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया
मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करा; कारण
♦ मूर्ती दान करायला ती खेळणे किंवा शोभिवंत वस्तू नाही. ♦ दान घेतलेल्या मूर्तींची विटंबना केली जाते. ♦ विसर्जनाने मूर्तीतील चैतन्य पाण्याद्वारे आसमंतात पसरते. |
श्री गणेशचतुर्थीच्या काळात पुजावयाची मूर्ती
धर्मशास्त्रानुसार बनवून घेण्यासंदर्भातील काही अडचणी आणि त्यांची उत्तरे
१. धर्मशास्त्रानुसार आणावी लागणारी शाडूमातीची मूर्ती महाग असणे
प्रत्येक कुटुंबात गणेशोत्सवावर होणार्या एकंदर व्ययापैकी (उदा. आधुनिक सजावट, कुटुंबियांसाठी कपड्यांची खरेदी) मूर्तीखरेदीसाठी होणारा व्यय अत्यल्प असतो. श्री गणेशाची पूजा करण्याचा उद्देश कुटुंबियांना मूर्तीकडून गणेशतत्त्व मिळणे, हा आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीतून तो लाभ मिळणे शक्य नाही. गणेशभक्तांनो, मूर्तीच्या मूल्याचा प्रश्न असेल, तर लहान मूर्ती घ्या; पण तुलनेेने स्वस्त आहे, म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती घेण्याचे धर्मशास्त्रविरोधी वर्तन करू नका.
२. काही घरी मुलांच्या हौसेकरता प्रतिवर्षी वेगवेगळ्या अशास्त्रीय रूपातील मूर्ती बसवली जाते. मुलांची हौस न करणे योग्य आहे का, असा प्रश्न पालकांना पडतो !
मूर्ती म्हणजे एखादे खेळणे नव्हे की, तिच्यात प्रत्येक वर्षी विविधता हवी. भक्तीभाव वाढवणे, ईश्वरी चैतन्य ग्रहण करणे आदींसाठी श्री गणेशाची मूर्ती घरी आणून पुजायची असते. धर्मशास्त्राशी कधीही तडजोड करू नये. उलट या निमित्ताने मुलांचे प्रबोधन करावे आणि त्यांना धर्मशिक्षण द्यावे.
गणेशभक्तांनो, नातेवाईक, गणेशोत्सव मंडळे आदींचे शास्त्रानुसार गणेशमूर्ती बसवण्याविषयी प्रबोधन करा ! असे केल्याने श्री गणेशाची तुमच्यावर कृपाच होईल !
वहात्या पाण्यात निर्माल्य-विसर्जन शक्य नसल्यास काय करावे ?
‘वहात्या पाण्यात निर्माल्य विसर्जित केल्याने त्यात असलेली दैवी पवित्रके पाण्यासह आसमंतात पसरतात. काही ठिकाणी जलप्रदूषण होऊ नये, यासाठी नगरपालिका, महापालिका आदी नदीमध्ये (वहात्या पाण्यामध्ये) निर्माल्य विसर्जन करण्यास प्रतिबंध करतात. ‘अशा परिस्थितीत आपद्धर्म म्हणून त्या निर्माल्याचे खत बनवायचे का’, असे काही जण विचारतात. या संदर्भात पंचतंत्रात सांगितले आहे,
सर्व-नाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डितः ।
अर्धेन कुरुते कार्यं सर्व-नाशो हि दुस्तरः ॥ पञ्चतंत्र, ४.२८॥
अर्थ : जेव्हा सर्वनाश जवळ आला असतो, तेव्हा बुद्धीमान मनुष्य स्वतःजवळ जे काही आहे, त्यातील अर्धे गमावण्याची सिद्धता ठेवतो. अर्ध्यातूनही (जीवन) कार्य चालू शकते; मात्र सर्वकाही गमावणे अत्यंत दुःखदायक असते.
अशा वेळी आपद्धर्म म्हणून त्या निर्माल्याचे खत बनवणे अयोग्य ठरत नाही; कारण खतामुळे दैवी पवित्रके काही प्रमाणात भूमीमध्ये जातात, त्यावर उभ्या रहाणार्या वृक्षाला आणि त्या वृक्षाची फळे, फुले, सावली आदींचा लाभ घेणार्या मनुष्याला त्याचा लाभ होतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात