‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळील समुद्रात विसर्जनाला ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ची अनुमती !
मुंबई – गेट वे ऑफ इंडियाजवळील समुद्रात श्री गणेशमूर्ती विसर्जनाला ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ने अनुमती दिली आहे. ही अनुमती देतांना मुंबई पोर्ट ट्रस्टने महापालिकेला अनेक अटी घातल्या आहेत. जिथे विसर्जन केले जाईल तिथे परिसर आणि समुद्र यांची प्रतिदिन स्वच्छता करावी, प्रवासी बोटींना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, पर्यावरणपूरक मूर्तींचे विसर्जन करावे आणि त्याकरता पालिकेने नियमावली सिद्ध करावी, अशा त्या अटी आहेत.
मुंबईतील समुद्रकिनारे आणि तलाव यांच्या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या वतीने विसर्जनाची सिद्धता करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम, जुहू समुद्रकिनार्यांसह आरे कॉलनी आणि इतर ठिकाणच्या तलावांवर विसर्जनाची सिद्धता केली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच जीवरक्षक ही तैनात करण्यात आले आहेत.