हडपसर (पुणे) क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३६ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था, तसेच १५ फिरते विसर्जन हौद !

नाईलाजाने भाविकांना मूर्ती संकलन केंद्रात देण्यास भाग पडणार !

हडपसर (जिल्हा पुणे) – यंदा कोरोनाचे निर्बंध नसतांनाही नैसर्गिक विसर्जन स्थळांवर म्हणजे हडपसरमधून वहाणारा नवीन कालवा, तसेच मांजरी बुद्रुक येथील मुळा-मुठा नदीचे पात्र येथे ‘नागरिकांनी थेट गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये’, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. कालवा परिसर आणि नदीचा काठ येथे असलेल्या विसर्जन घाटांवर बांबू, तसेच ‘बॅरिकेट्स’ बांधण्यात येणार आहेत. (श्री गणेशाचे वहात्या पाण्यात विसर्जन करणे हा श्री गणेशपूजाविधीतील शेवटचा विधी आहे. विसर्जन घाटांवर बांबू बांधून गणेशभक्तांची धार्मिक कृती करण्यापासून अडवणूक करणारी महापालिका हिंदुद्रोहीच होय ! – संपादक)

त्यामुळे नागरिकांना त्यांच्याजवळ असलेल्या महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रात नाईलाजाने गणेशमूर्ती द्यावी लागणार आहे. महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३६ ठिकाणी मूर्ती संकलनाची, तसेच १५ फिरत्या हौदांची व्यवस्था  करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात किमान ७-८ मूर्ती संकलन केंद्रे चालू केली आहेत.

संपादकीय भूमिका 

  • मूर्ती संकलन करून त्या खाणीत टाकून त्याची विटंबना केली जाते, तसेच त्यांची वाहतूक कचर्‍याच्या गाडीतून केली जाते, असा आतापर्यंतचा पुणे महापालिकेचा इतिहास आहे. त्यामुळे भक्तीभावाने पूजलेल्या मूर्ती भाविक मूर्ती संकलनवाल्यांना कशा देतील ?
  • मूर्तीविसर्जनाचे धर्मशास्त्र पाळण्यास प्रशासनाकडून होणारा प्रतिबंध, हा हिंदूंवरील अन्यायच आहे ! अन्य धर्मियांच्या बाबतीत अशी शास्त्रविरोधी भूमिका घेण्याचे धाडस प्रशासन दाखवेल का ?