आत्मघाती रस्ते अपघात !
रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण पहाता ते रोखण्यासाठी कठोर होण्याची आवश्यकता आहे !
‘टाटा सन्स’ या प्रसिद्ध आस्थापन समुहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे ४ सप्टेंबर या दिवशी पालघर येथे मुंबई-कर्णावती महामार्गावर अपघाती निधन झाले आणि पुन्हा एकदा रस्ते अपघाताविषयीचे सूत्र ऐरणीवर आले. देशभरात वर्ष २०२० मध्ये ४ लाख ३ सहस्र ११६ रस्ते अपघात झाले. यात १ लाख ५५ सहस्र ६२२ लोकांचा मृत्यू झाला. ही एका वर्षातील आकडेवारी आहे. यात प्रतिवर्ष वाढच होतांना दिसत आहे. वर्ष २०२० च्या तुलनेत वर्ष २०२१ मध्ये एकूण अपघाती मृत्यूंची संख्या १८.८ टक्क्यांनी, म्हणजे १ लाख ७३ सहस्र ८६० इतकी वाढली. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार रस्ते अपघातात मृत्यू होण्यामध्ये भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. जगातील अपघातात होणार्या मृत्यूंपैकी ११ टक्के मृत्यू भारतात होतात. त्यांतील ५५ टक्के अपघात हे भरधाव वेगाने वाहने चालवण्यामुळे झालेले आहेत. विशेष म्हणजे अपघातात मृत झालेल्या ७० टक्के व्यक्ती या १८ ते ४५ वर्षे वयोगटातील अर्थात् कुटुंबातील कर्त्या व्यक्ती होत्या. त्यातही ३२ टक्के अपघात हे दुचाकीस्वारांचे असल्याचे उघड झाले आहे. भारतातच नव्हे, तर जगभरात रस्ते अपघात अल्प होण्याचे प्रमाण केवळ कोरोना काळात होते; कारण त्या वेळी संपूर्ण दळणवळण बंदी होती आणि वाहतूक ठप्प करण्यात आली होती. रस्ते सुरक्षेसाठी सरकार प्रयत्न करत असते. जनजागृती ही आता सामान्य गोष्ट झालेली आहे. जलद गतीने, दारू पिऊन, भ्रमणभाषवर बोलत वाहन चालवू नये, ही प्राथमिक गोष्ट झालेली आहे. वाहन चालवतांना नियमांचे काटेकोर पालन करण्याची सक्ती केली जाते. नियम मोडणार्यांकडून दंड आकारला जातो. त्यातही मध्यंतरी मोठी वाढ करण्यात आली आहे. वाहनचालकांसह पादचार्यांनीही रस्त्याविषयी कोणती सतर्कता बाळगावी, हेही सांगितले जाते, तरीही मोठ्या संख्येने अपघात होतात आणि लोकांचा मृत्यू होतो. ही संख्या पुष्कळच मोठी आहे. याचा विचार ना वाहनचालक करतात ना जनता करते. बहुतांश रस्ते अपघात हे मानवी चुकांमुळे होतात, हे अपघातांच्या कारणांचा शोध घेतल्यावर लक्षात आलेले आहे. सायरस मिस्त्री यांच्या वाहनाचा अपघात वेगमर्यादेपेक्षा जलद गतीने वाहन चालवल्याने आणि ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न केल्याने झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. आता हे नियम पाळणे सर्वसामान्य गोष्ट आहे; मात्र सर्वसामान्य नियमांचेही पालन केले नाही, तर काय होते ? हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. सायरस मिस्त्री मागच्या सीटवर बसले असतांना त्यांनी ‘सीट बेल्ट’ (गाडीत बसल्यावर लावायचा संरक्षक पट्टा) बांधला नव्हता. जेव्हा अपघात झाला, तेव्हा त्यांचे डोके पुढच्या सीटवर जोराने आपटले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सायरस मिस्त्री यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीनेही ‘सीट बेल्ट’ न बांधण्याची चूक केली आणि त्याचा परिणाम मोठा झाला. ते प्रसिद्ध आणि महागड्या मर्सिडिज बेंझ या वाहनातून प्रवास करत होते. यातून लक्षात येते की, तुम्ही कोणत्या आणि किती महागड्या गाडीतून प्रवास करत आहात, यापेक्षा तुम्ही वाहनाच्या संदर्भातील किती नियमांचे काटेकोर पालन करत आहात, हे पहायला हवे. सध्या समाजात वाहतूक पोलीस दंड आकारतील म्हणून ‘सीट बेल्ट’ बांधण्याचा प्रयत्न केला जातो. दुचाकीवाल्यांच्या शिरस्त्राण सक्तीचीही हीच तर्हा आहे. सर्व नियम हे चालकांच्या आणि वाहनातील इतरांच्या सुरक्षिततेसाठीच असतात, हे ठाऊक असूनही लोक स्वतःचा जीव धोक्यात घालतात. आताच्या अपघातामधूनही देशभरातील वाहनचालक आणि वाहनातील लोक याला गांभीर्याने घेतील, याची शक्यता अल्पच म्हणावी लागते. रस्ते अपघातांमध्ये अनेक नामांकित लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे, हेही लक्षात घ्यायला हवे.
कठोर कायदे हवेत !
काही वेळा नियमानुसार वाहन चालवणार्यांना नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणार्यांच्या चुकीमुळे जीव गमवावा लागत असल्याचेही दिसून येते. त्यांची कोणतीही चूक नसतांना त्यांना दुसर्यांच्या चुकांमुळे नाहक जीव गमवावा लागतो. अशांवर मग गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली जाते. कधी कधी ते स्वतःच यात ठार झालेले असतात. तरीही ज्यांच्यावर गुन्हा नोंदवला जातो, त्यातील किती जणांना पुढे शिक्षा होते, हा संशोधनाचा विषय आहे. प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याने दारू पिऊन वाहन चालवल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. हा खटला अद्यापही चालू आहे. सलमान खान याला अद्याप शिक्षा झालेली नाही आणि पुढे होईल कि नाही, याचीही निश्चिती नाही. अशा अनेक प्रकरणांत संबंधितांना शिक्षा होत नाही, असेच दिसून येते. जर अशी स्थिती असेल, तर रस्ते अपघात अल्प कसे होणार ? अमेरिका किंवा युरोप या खंडातील देशांमधील लोकांमध्ये वाहनांच्या संदर्भात जागरूकता आहे आणि ते त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करत असतात. वाहतूक विभागही याविषयी कठोर कारवाई करत असल्याने तेथे भारताच्या तुलनेत अल्प अपघात होतात. भारतीय लोक पाश्चात्त्यांचे अन्य गोष्टींत अंधानुकरण करतात; मात्र चांगल्या गोष्टींच्या संदर्भात मात्र त्यांच्याकडून शिकत नाहीत. रस्ते अपघात अल्प करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. कोरोनाच्या काळात लोकांचा मृत्यू होऊ नये, यासाठी ज्याप्रमाणे प्रयत्न करण्यात आले, तसे युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कोरोनाची साथ ओसरली असली, तरी रस्ते अपघात थांबणारे नाहीत. कोरोनामुळे प्राण गेलेल्या लोकांपेक्षा रस्ते अपघातांमुळे अधिक लोकांचा मृत्यू होत आहे, हे लक्षात घेऊन प्रयत्न करायला हवेत. यासाठी शाळेपासून मुलांना याविषयीचे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. सध्या उपग्रहांचा काळ असल्याने प्रत्येक वाहनावर उपग्रहाच्या माध्यमातून लक्ष ठेवून त्याने नियमांचे उल्लंघन केल्यावर त्याच्या चालकाला कारागृहात टाकण्याची शिक्षा झाली पाहिजे, असा कायदा केला पाहिजे. दंडाची रक्कम देऊन किंवा वाहतूक पोलिसाला लाच देऊन सुटण्याचे प्रकार जनतेसमोरच घडत असल्याने हे आवश्यक आहे. असे अनेक उपाय, नियम आणि कठोरता आणल्यास काही प्रमाणात रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवू शकतो.