श्री गणेशाच्या विडंबनात्मक मूर्ती ट्विटरवर ठेवून ‘यामुळे भावना दुखावत नाहीत का ?’ असा अभिनेते प्रकाश राज यांचा प्रश्न

हे चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसून वाचकांना सत्य समजावे, हा उद्देश आहे.

मुंबई – रा.स्व. संघाच्या गणवेषातील झेंड्याला वंदन करणारा, नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्यासमवेत असणारा, मशीनगन घेतलेला, पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जून या प्रकारे केलेला अशा काही श्री गणेश मूर्तींची छायाचित्रे ट्वीट करून अभिनेते प्रकाश राज यांनी विचारले आहे, ‘‘आता अशा मूर्तींमुळे भावना दुखावल्या जाणार नाहीत का ?’’

यावर नेटकर्‍यांनी त्यांना चपखल शब्दांत उत्तरे दिली आहेत. एकाने म्हटले आहे, ‘‘जर तुम्ही हिंदु असाल आणि या मूर्तींमुळे तुमच्या भावना दुखावल्या जात असतील, तर तुम्ही कायदेशीर पावले उचला; पण जर तुम्ही आस्तिक नसाल तर बोलू नका.’’

तर काहींनी ‘‘हिंदूंच्या सणांना लक्ष्य करणं सोडून द्या’’, असे म्हटले आहे. काही जणांनी त्यांचे समर्थन केले आहे, तर काहींनी टीका केली आहे.

संपादकीय भूमिका

श्री गणेशमूर्ती मूर्तीशास्त्रानुसार योग्य रूपात सिद्ध केली, तर त्यातून चैतन्य प्रक्षेपित होऊन भाविकांना लाभ होतो. मूळ स्वरूपापेक्षा भिन्न स्वरूपातील मूर्ती सिद्ध करून त्याचा भाविकांना अपेक्षित लाभ होत नाही.