गोमंतकियांना जगासमोर मान खाली घालायला लावणार्या गोव्यातील हत्या, अमली पदार्थ आणि वेश्याव्यवसाय यांच्या घटना !
गोव्यातून होणार्या मानवी तस्करीचे प्रमाण देशात सर्वाधिक !
|
पणजी, ४ सप्टेंबर (वार्ता.) – गोव्यातून होणार्या मानवी तस्करीचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. गोव्यात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण १ टक्का आहे, तर हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत सर्वांत अधिक आहे. विशेष म्हणजे गोव्यात वर्ष २०२० आणि वर्ष २०२१ मध्ये मानवी तस्करीची एकूण ३२ प्रकरणे नोंद झालेली असली, तरी यामधील एकाही प्रकरणात संशयितांवर कारवाई झालेली नाही. ‘नॅशनल क्राईम रिकॉर्ड्स ब्युरो’ यांनी दिलेल्या अहवालातून ही माहिती उघड झालेली आहे.
‘नॅशनल क्राईम रिकॉर्ड्स ब्युरो’ यांनी दिलेल्या अहवालानुसार वर्ष २०२१ मध्ये गोव्यात मानवी तस्करीची १५ प्रकरणे नोंद झाली, तर यामध्ये एकूण २६ जणांना कह्यात घेण्यात आले, तर ३५ पीडितांची सुटका करण्यात आली. वर्ष २०२० मध्ये एकूण १७ प्रकरणे नोंद झाली, तर यामध्ये एकूण ३० जणांना कह्यात घेण्यात आले. वर्ष २०२० आणि वर्ष २०२१ मध्ये एकूण ५ प्रकरणांमध्ये न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आणि एकूण ५ जणांची निर्दाेष सुटका झाली. दोन्ही वर्षांत एकाही संशयिताला शिक्षा झालेली नाही. गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने विशेष करून किनारपट्टी भागात हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालतो. हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायासाठी इतर राज्यांमधून मुलींना फसवून मोठ्या प्रमाणावर आणले जाते, तर काही मुली स्वेच्छेने या व्यवसायात येतात.
या अहवालाविषयी ‘अर्ज’ (अन्याय रहित जिंदगी) या अशासकीय संस्थेचे अध्यक्ष अरुण पांडे म्हणाले, ‘‘मानवी तस्करी प्रकरणांमध्ये संशयितांना शिक्षा होण्यासाठी अन्वेषण प्रक्रियेत काही सुधारणा होणे अपेक्षित आहे. अन्वेषण अधिकारी आणि अभियोग यांच्यामध्ये नियमित बैठका झाल्या पाहिजेत आणि दोघांमध्ये समन्वय असला पाहिजे, तसेच पीडितांची वैद्यकीय तपासणी व्हायला पाहिजे. अनेकदा पीडितांचे पुनर्वसन होते आणि ९३ टक्के महिला परप्रांतीय असल्याने त्या खटल्यांच्या सुनावणीला न्यायालयात उपस्थित रहात नाहीत. याचे कारण गोव्यात आल्यावर त्यांचा निवास आणि इतर खर्च यांची व्यवस्था केली जात नाही. यामुळे संशयित निर्दाेष सुटतात. यामुळे ‘लैंगिक अत्याचार आणि मानवी तस्करी यांसाठी गोवा हे सुरक्षित ठिकाण आहे’, असा संदेश लोकापर्यंत पोचत आहे.’’ (‘अर्ज’ या संस्थेने दाखवून दिलेल्या त्रुटी दूर करून शासनाने आवश्यक त्या उपाययोजना आणि पोलिसांनी अन्वेषणात सुधारणा करणे आवश्यक आहे ! – संपादक)
संपत्ती हडप करण्यासाठी सोनाली फोगाट यांची हत्या केल्याचा संशय बळावला !
‘शुटींग’ असल्याची खोटी माहिती देऊन त्यांना गोव्यात आणल्याची माहिती
पणजी, ४ सप्टेंबर (वार्ता.) – अभिनेत्री तथा भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांची हत्या ही पूर्वनियोजित असल्याची स्वीकृती या प्रकरणातील प्रमुख संशयित तथा सोनाली फोगाट यांचा स्वीय सचिव सुधीर संगवान यांनी गोवा पोलिसांना दिल्याची माहिती मिळाली आहे. वर्ष २०१६ मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर सोनाली फोगाट यांना वारसा हक्क या नात्याने आलेल्या संपत्तीवर त्यांचा स्वीय सचिव सुधीर संगवान यांचा डोळा होता. वास्तविक सोनाली फोगाट यांचे गोव्यात कोणतेही ‘शुटींग’ (चित्रीकरण) पूर्वनियोजित नव्हते, तरीही त्यांना गोव्यात ‘शुटींग’ असल्याची खोटी माहिती देऊन २२ ऑगस्ट २०२२ या दिवशी गोव्यात आणून त्यांच्या हत्येचा पूर्वनिजोजित कट रचण्यात आला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. संशयित सुधीर संगवान सध्या पोलीस कोठडीत आहे.
सोनाली फोगाट यांचे हरियाणा येथे सिरसा-राजगड रस्त्याच्या बाजूला १३ एकर भूमीत फार्महाऊस आणि रिसॉर्ट आहे. या मालमत्तेची किंमत सुमारे १०० कोटी रुपये आहे. तसेच सोनाली फोगाट यांचे संत नगर, देहली येथे ३ कोटी रुपयांचे एक घर आणि दुकान, तसेच हरियाणाच्या बाहेर २ निवासी सदनिका आहेत. सोनाली फोगाट यांनी अन्य ठिकाणीही पैसे गुंतवले होते. सध्या सोनाली फोगाट यांचे अधिकोषातील ‘लॉकर’ आणि खाते पोलिसांच्या कह्यात आहे. पोलीस उपअधीक्षक नारायण चंद यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा पोलिसांचा एक गट सध्या हरियाणा येथे फोगाट यांच्या हत्येविषयी अन्वेषण करत आहे. फोगाट यांची मालमत्ता हडप करण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली का ? या हेतूने गोवा पोलीस अन्वेषण करत आहेत.
सोनाली फोगाट हत्या प्रकरणाचा गोवा पोलीस योग्य प्रकारे छडा लावणार ! – जसपाल सिंह, पोलीस महासंचालक, गोवा
गोवा पोलिसांनी आतापर्यंत हाती घेतलेल्या हत्येसंबंधीच्या सर्व प्रकरणांचा छडा लावलेला आहे. त्यामुळे सोनाली फोगाट हत्या प्रकरणाचा गोवा पोलीस योग्य प्रकारे छडा लावणार आहेत. गोवा पोलिसांचा एक गट हरियाणा येथे गेला असून तो आवश्यक सर्व पुराव्यांची पडताळणी करत आहे. या प्रकरणी सर्व अन्वेषण पूर्ण झाल्यानंतर गोवा पोलीस यासंबंधी सर्व माहिती देणार आहे. या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी फोगाट कुटुंबीय आणि हरियाणा पोलीस यांचे अपेक्षित सहकार्य लाभत आहे.’’
वागातोर येथे ‘क्लब-९ बार मिराज’मध्ये चालू असलेली रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळली !
‘मेथाफेटामाईन’ हे अमली पदार्थ कह्यात घेतले !
या प्रकरणी ‘क्लब-९ बार मिराज’ला टाळे ठोकल्यास इतरांनाही जरब बसेल !
म्हापसा, ४ सप्टेंबर (वार्ता.) – ओझरात, वागातोर येथील ‘क्लब-९ बार मिराज’ येथे चालू असलेली रेव्ह पार्टी हणजुणे पोलिसांनी उधळून लावून एकाला कह्यात घेतले. कार्यकारी दंडाधिकारी, हणजुणे पोलीस आणि अमली पदार्थविरोधी पथक यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या ठिकाणी संशयितांकडून ‘मेथाफेटामाईन’ हे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले. पोलिसांनी हणजुणे परिसरात मागील २ दिवसांत केलेली ही दुसरी कारवाई आहे.
उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी बेंगळुरू येथील रहिवासी तथा पर्यटक मिथुन गोपाल याला अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी कह्यात घेतले आहे, तसेच पार्टीचे आयोजन करणारा ‘क्लब-९ बार मिराज’चा व्यवस्थापक वेन डेव्हिस यालाही कह्यात घेण्यात आले.
अमली पदार्थाचा पुरवठा करणार्या टांझानियाच्या २ महिला पोलिसांच्या कह्यात !
अमली पदार्थविरोधी पथक आणि हणजुणे पोलीस यांनी संयुक्तपणे मुड्डीझोर, हणजुणे येथे कारवाई करत टांझानिया देशातील २ महिलांना समवेत अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी कह्यात घेतले. या दोन्ही महिला उत्तर गोव्यातील किनारी भागात ग्राहकांना विविध प्रकारच्या अमली पदार्थांचा पुरवठा करणार्या साखळीचा एक भाग होत्या. कॅथरीन हयुमा (वय २५ वर्षे) आणि बियान्का शायो (वय २५ वर्षे), अशी संशयितांची नावे आहेत. या महिलांकडे २० ग्रॅम चरस, ०.४ ग्रॅम ‘एल्.एस्.डी.’ आणि २ ग्रॅम कोकेन सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किंमत सुमारे ६० सहस्र रुपये आहे. अमली पदार्थविरोधी कायद्याचे (एन्.डी.पी.ए.) कलम २० (बी) (२) (ए) अंतर्गत दोन्ही महिलांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
गांजा बाळगल्याच्या प्रकरणी गुजरात येथील पर्यटक कह्यात !
हणजुणे पोलिसांनी सोबत गांजा बाळगल्याच्या प्रकरणी मानेजा, गुजरात येथील उदित दासवानी याला कह्यात घेतले. गांजाचे वितरण करण्याच्या सिद्धतेत असतांना पोलिसांनी संशयित दासवानी याला रंगेहात पकडले. संशयित दासवानी याच्याकडून पोलिसांनी ६ सहस्र रुपये किमतीचा गांजा कह्यात घेतला. ३ सप्टेंबरला रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
गोव्यात ‘डार्कवेब’च्या आधारे अमली पदार्थ व्यवसाय !
अमली पदार्थांच्या मोठ्या व्यावसायिकांनी गोव्यात वळवला मोर्चा
पणजी, ४ सप्टेंबर (वार्ता.) – देशभरात अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणार्यांनी अलीकडच्या काळात गोव्यात मोर्चा वळवल्याचा निष्कर्ष काही अन्वेषण यंत्रणांनी काढला आहे. पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी गोव्यात अमली पदार्थ व्यवसाय ‘ऑनलाईन’ पद्धतीने होत आहे. यासाठी ‘डार्कवेब’ या इंटरनेट ब्राउझरचे साहाय्य घेऊन व्यवसाय केला जातो. तेलंगाणाचे पोलीस आयुक्त सी.व्ही. आनंद यांनी भाग्यनगर (तेलंगाणा) येथे प्रसारमाध्यमांकडे केलेले खुलासे अत्यंत धक्कादायक आहेत.
तेलंगाणाचे पोलीस आयुक्त सी.व्ही. आनंद यांच्या मते गोव्यात अमली पदार्थांचा प्रचंड साठा वळवण्यात आला आहे. तेलंगाणा राज्याने अमली पदार्थ व्यवहाराच्या विरोधात जोरदार मोहीम आखल्याने तेथील मोठ्या अमली पदार्थ व्यावसायिकांनी गोव्यात तळ हालवला आहे. गोव्यात सहजतने उपलब्ध होणारे अमली पदार्थ आणि तरुणवर्गाचा अमली पदार्थाच्या सेवनाकडे वाढता कल, हा चिंताजनक आहे. गोवा पोलिसांनी चालू वर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत विविध ठिकाणी कारवाई करून एकूण ९८ किलो अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत आणि याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये आहे. यामध्ये एकूण १६ स्थानिक, ३८ गोव्याबाहेरील आणि १३ विदेशी नागरिक व्यक्ती मिळून एकूण ६७ जणांना कह्यात घेण्यात आले.
‘डार्कवेब’ म्हणजे काय?
‘डार्कवेब’ हा एक अनधिकृत ‘वेब ब्राउझर’ आहे. त्यावर पुष्कळ संकेतस्थळे सांकेतिक स्वरूपामध्ये बनवलेल्या असतात. ‘गूगल’, ‘याहू’ यांसारख्या ‘सर्च इंजिन’वर शोधून सापडणार नाहीत, अशी संकेतस्थळे यावर उपलब्ध आहेत. अनधिकृत व्यवसायांसाठी ‘डार्कवेब’चा वापर केला जातो. याचे अन्वेषण करणे हे पोलिसांपुढील एक आव्हान आहे.
संपादकीय भूमिकापर्यटनाच्या नावाखाली अनधिकृत गोष्टींकडे आतापर्यंतच्या शासनांचे झालेले दुर्लक्ष, पोलीस आणि प्रशासन यांमधील अधिकार्यांची लाचखोरी वृत्ती यांमुळे चालू राहिलेल्या अनैतिक गोष्टी, तसेच गोव्याविषयी राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय स्तरांवर प्रसारित होणारी विज्ञापने यांमुळे गोव्याची प्रतिमा देशभरात ‘अमली पदार्थ आणि वेश्या यांचे ठिकाण’, अशी झाली आहे. याच्याच परिणामस्वरूप येथे मानवी तस्करी होते. |