प्राध्यापक : भारतातील भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक !
५ सप्टेंबर या दिवशी (आज) शिक्षकदिन आहे. त्या निमित्ताने…
महाविद्यालयात अध्ययन आणि अध्यापन करत असतांना आलेले अनुभव !
आज शिक्षकदिन ! त्या निमित्ताने फोंडा, गोवा येथील प्रा. महावीर श्रीश्रीमाळ यांना शिक्षण क्षेत्रात कार्य करतांना आलेले अनुभव येथे देत आहोत. या लेखाचा पहिला भाग आपण ४ सप्टेंबरच्या अंकात पाहिला. यामध्ये आपण प्राध्यापकांवरील प्रभावहीन नियंत्रण, प्राध्यापक भरतीमधील अपप्रकार, तसेच वेळापत्रकातील गोंधळ आणि प्राध्यापकांची तासिका टाळण्याची मानसिकता ही सूत्रे पाहिली. आज या लेखाचा पुढील भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/609837.html
हिंदु राष्ट्रात केवळ गुरुकुल पद्धतीने शिकवणारे सात्त्विक प्राध्यापक असतील !सध्याच्या शिक्षणक्षेत्रात भ्रष्टाचार, अपलाभ आणि व्यसनी वृत्ती असलेले काही प्राध्यापक अन् शिक्षकेतर कर्मचारी आहेत. ज्यामुळे शिक्षणक्षेत्रासारखे पवित्र कार्य कलंकित होत आहे. शिक्षणक्षेत्र पुन्हा पवित्र करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’च हवे. हिंदु राष्ट्रात गुरुकुल पद्धतीने शिकवणारे आचार्य म्हणजेच केवळ सात्त्विक प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक असतील. ही शिक्षणव्यवस्था शिक्षणसम्राटांच्या पायावर नव्हे, तर समाज-राष्ट्र यांचे हित जपणार्या आदर्श गुरुकुल पद्धतीवर आधारित असेल आणि त्याद्वारे मुलांचा सर्वांगीण विकास करून घेतला जाईल ! |
४. जातीय मानसिकता आणि कथित सुधारणावादी
सुधारणावादी आणि आधुनिक शिक्षण घेत असल्याचे म्हणवणारे वरकरणी जातीचा उल्लेख टाळत असत; मात्र छोट्या मोठ्या कृतींमधून त्यांची जातीय मानसिकता अन् कथित सुधारणावादी भूमिका उघड झाली.
४ अ. विशेष विषयात जातीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी गळ घालणे : कला, विज्ञान आणि वाणिज्य या तीनही शाखांमध्ये प्रथम-द्वितीय वर्षानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी विशेष विषय (स्पेशल सब्जेक्ट) निवडायचा असतो. तो विषय कोणता घ्यावा ? यासाठी प्राध्यापकांमध्ये त्यांच्या जातीतील कुणी विद्यार्थी आहे का ? ते पाहून त्यांना गळ घातली जायची. या ठिकाणी ज्ञाती संस्थेतील विद्यार्थी ओळखणे नैसर्गिक आहे; परंतु संबंधित विद्यार्थ्याला तू (अन्य विषय न घेता) त्यांचा विषय का घ्यावा ? हे पटवून देतांना जातीय मानसिकता जोपासली जात असे. (खरेतर विद्यार्थ्याचा कल, कौशल्य, कौटुंबिक पार्श्वभूमी, क्षमता आणि कष्ट घेण्याची सिद्धता यांवरून विषय कोणता निवडावा ? हे सांगणे अपेक्षित आहे.)
४ आ. एकत्रित भोजन करतांना सहकारी प्राध्यापकांनी भाजी बनवण्याच्या पद्धतीवरून मारलेल्या टोमण्याला प्रत्युत्तर देणे : काही प्राध्यापक एकत्रितपणे घरून आणलेले डब्यातील जेवण करत असत. माझ्या डब्यातील भाजीमध्ये गुळ असण्याच्या पद्धतीवरून एका प्राध्यापकांनी २-३ वेळा टोमणे मारले. तेव्हा मी सूचकपणे बोललो, ‘माझ्या पत्नीने भाजीत गुळ वापरणे, आईने फोडणीच्या वरणात गूळ वापरणे किंवा तूप-गुळ खाणे हे आम्हा शाकाहारी लोकांमध्ये स्वाभाविक आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाविद्यालयात झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये माझे हिमोग्लोबिन कधी न्यून पडले नाही. याउलट मांसाहार करणार्या अनेक सहकार्यांचे हिमोग्लोबिन किमान पातळीवरही आढळले नाही.’ त्यानंतर डब्यातील पदार्थ किंवा खाणे-पिणे यांवर मला कुणी टोमणे मारले नाहीत.
४ इ. कथित स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणार्या प्राध्यापकाचा अनुभव : एका प्राध्यापकांनी ‘महिलादिनी’ (८ मार्च या दिवशी) ‘स्त्रीमुक्ती’ या विषयावर महाविद्यालयात व्याख्यान दिले. त्यानंतर आम्ही त्यांच्या घरी जाऊन चहा घेतला. त्या वेळी त्यांनी त्यांच्या पत्नीला चहा देण्यासाठी आवाज देऊन मुलीकडून चहा मागवला. तेथे पोचल्यानंतर किंवा निघतांना मात्र त्यांनी पत्नीशी परिचय करून देण्याचे टाळले. एक घंट्यापूर्वी ज्या प्राध्यापकांनी ‘स्त्रीमुक्ती’ विषयावर व्याख्यान दिले, त्यांनी अशा प्रकारे वर्तन करणे मला आश्चर्यकारक वाटले. दुसर्या दिवशी ‘ते प्राध्यापक घरी असेच वागतात,’ असे मला अन्य काही जणांकडून समजले.
५. विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्याकडून परीक्षेच्या वेळी होणारे अपप्रकार
५ अ. माजी सरपंचाच्या मुलाला वरिष्ठ प्राध्यापकाने नक्कल (कॉपी) करण्यास साहाय्य करणे : एकदा परीक्षेच्या वेळी जवळच्या गावातील माजी सरपंचाचा मुलगा उत्तीर्ण व्हावा, यासाठी एका वरिष्ठ प्राध्यापकाने त्याच्या कनिष्ठ सहकार्याला पर्यवेक्षक (सुपरवायझर) म्हणून पाठवले. याखेरीज वरिष्ठ प्राध्यापकाने परीक्षा चालू असतांना २-३ वेळा वर्गामध्ये जाऊन त्या विद्यार्थ्याला नक्कल करण्यात काही अडचण नाही ना ? हे पाहिले. यात राजकीय नेत्यांची ही मुले शिक्षण घेऊन पुढे काही करिअर करत नाहीत. केवळ लग्नपत्रिकेमध्ये शिक्षण लिहिणे आणि सामाजिक प्रतिष्ठा यांसाठी पदवीधारक असणे आवश्यक आहे; म्हणून त्यांना येनकेन प्रकारेण उत्तीर्ण व्हायचे असते.
५ आ. प्राध्यापकांनी पर्यवेक्षक म्हणून काम करण्यास टाळाटाळ करणे : महाविद्यालयातील परीक्षेच्या वेळी पर्यवेक्षक म्हणून प्राध्यापकांनी काम करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी वेगळे मानधन दिले जाते; मात्र परीक्षेच्या काळामध्ये २-३ घंटे पर्यवेक्षक म्हणून काम करण्यालाही प्राध्यापक वर्ग शिक्षा समजतात. त्यामुळे वरिष्ठ प्राध्यापक अस्थायी (कंत्राटी) अथवा नवीन प्राध्यापकांना जादाचे पैसे देऊन किंवा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव आणून त्यांच्या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून काम करण्यास पाठवतात. काही प्राध्यापक परीक्षेचे कामकाज पहाणार्या लिपिकाला ‘चहापाना’साठी पैसे देऊन स्वतःकडे पर्यवेक्षकाचे काम न्यूनतम येईल, असे पहातात. काही प्राध्यापक पर्यवेक्षक म्हणून काम करत असतांना वर्गाच्या दारात भ्रमणभाषवर बोलतांनाही आढळले. शिक्षणासाठी नावाजलेल्या शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये तर प्राध्यापक वर्ग पर्यवेक्षण न करता समाजातून पदवीधारक नागरिकांना पर्यवेक्षक म्हणून काम करण्यासाठी बोलावतात.
५ इ. एका विद्यार्थ्याने मला लाच देण्याचा प्रयत्न करणे : एकदा एक विद्यार्थी परीक्षेचे काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्यासाठी माझ्याकडे आला. त्या विद्यार्थ्याला मी ‘वर्गात नियमित बसून अभ्यासाकडे लक्ष दे’, असे सुचवले. तो म्हणाला, ‘‘सर, तुमचा भ्रमणभाष जुना झाला आहे. मी तुमच्यासाठी २ भ्रमणभाष घेतो. एक तुम्हाला आणि एक मॅडमला (पत्नीला) वापरता येईल.’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘मला संभाषण आणि संदेश यांची देवाण-घेवाण करता येते. तेवढे पुरेसे आहे. भ्रमणभाष जुना झाल्याची तू काळजी करू नको. माझ्या पत्नीसाठी काय घ्यायचे ? आणि काय नाही ? हे मी पाहीन. त्यामुळे तू अशा प्रकारे लाच देऊन माझ्याकडे तडजोड करण्याचा प्रयत्न करून काही उपयोग नाही.’’ त्यानंतर तो विद्यार्थी शांतपणे निघून गेला.
५ ई. एका प्राध्यापकांनी नियमानुसार पर्यवेक्षक म्हणून काम करत असतांना परीक्षार्थ्यांना नक्कल करण्यास प्रतिबंध केला; म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांच्या दुचाकीचे चाक पंक्चर करणे, नवे कोरे सीट फाडणे अशा प्रकारे त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला.
एकदा प्रथम वर्षाच्या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी मी पर्यवेक्षक म्हणून काम करण्यासाठी वर्गावर गेलो होतो. तेव्हा एक विद्यार्थी ‘ब्लू टूथ’ (एक इलेक्ट्रॉनिक उपकरण) घालून नक्कल करत असल्याने मी त्याला हटकले. तेव्हा ‘यापूर्वी ५ दिवस ५ विषयांच्या परीक्षेला (तुमच्याहून) वरिष्ठ प्राध्यापक आले होते; पण त्यांनी आडकाठी केली नाही. तुम्ही आक्षेप का घेता ? तुम्हाला इतरांपेक्षा अधिक वेतन मिळते का ?’, असे बोलून त्याने नक्कल करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी वर्गात एक युवती आणि ३२ युवक असे मिळून ३३ परीक्षार्थी होते. नक्कल करू पहाणारे ५ विद्यार्थी धनदांडगे परिवारातून आले होते, तसेच ते माझ्याहून प्रकृतीने सुदृढ होते. गुरुकृपेने मी प्रार्थना करून स्थिर राहून त्यांना शेवटपर्यंत नक्कल करू दिली नाही. ‘ब्लू टूथ कह्यात घेऊन प्राचार्यांकडे पाठवला. त्याचा राग येऊन ५ जणांपैकी एका परीक्षार्थ्याने प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका खिडकीतून खाली फेकत गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. एखाद्या वर्गातून उत्तरपत्रिका गहाळ झाल्यास संबंधित पर्यवेक्षकावर कारवाई होऊ शकते. त्या वेळी मी प्राचार्यांना दूरभाष केला आणि ‘हे माझ्या कार्यकक्षेबाहेर आहे; तुम्ही लक्ष घातले, तर बरे होईल,’ असे कळवले. त्या विद्यार्थ्याने वर्गाबाहेर जातांना ‘तुमच्या अंगावर डंपर घालतो’, अशी धमकी दिली. या सर्व प्रसंगाने त्या दिवशी महाविद्यालयातील वातावरण तणावपूर्ण झाले. अनेकांनी मला काळजी घेण्यास सुचवले; मात्र कुणीही परीक्षार्थ्यांमध्ये ही प्रवृत्ती बळावल्याविषयी वाच्यता करणे टाळले. दुसर्या दिवशी महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये या प्रसंगाची चर्चा होत होती. काही विद्यार्थी ‘तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत’, असे म्हणाले. मी त्यांचे आभार व्यक्त करत होतो. वर्गात नियमित तासिका घेत होतो, हे विद्यार्थ्यांना वेगळे वाटत होते. तेव्हा मी त्यांना म्हणालो की, ‘मी घरी पत्नीला माझ्या स्वाक्षरीचे पत्र दिले आहे. महाविद्यालयात येता-जाता किंवा अन्य कुठेही माझा संशयास्पद घातपात झाल्यास दु:ख न करता पोलीस अधिकार्यांना हे पत्र दे.’
५ ऊ. विद्यार्थ्यांच्या अरेरावीला पाठीशी घालणारे माजी सरपंच ! : एका परीक्षेच्या वेळी प्राध्यापक आणि सेवक यांच्यावर काही युवकांनी अरेरावी केली. हे युवक माजी सरपंचांच्या संपर्कात असल्याने विद्यार्थ्यांच्या वागणुकीचे गार्हाणे सांगण्यासाठी प्राचार्यांनी त्यांना महाविद्यालयात भेटीकरता बोलावले. प्राचार्यांना भेटण्यापूर्वी त्यांच्या दालनाबाहेर ‘मुलांनी अरेरावी आणि शिवीगाळ केली आहे, कुणाला मारले नाही ना,’ असे माजी सरपंच मोठ्याने बोलले. महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी संबंधित विद्यार्थी तेथे उपस्थित होते. महाविद्यालयातील असे विद्यार्थी हे पुढे जाऊन राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नेते आणि पुढारी झाल्याचे सर्रास आढळते.
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/610391.html
– प्रा. महावीर श्रीश्रीमाळ, फोंडा, गोवा. (३०.८.२०२२)
साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना आवाहनशिक्षणक्षेत्रातील चांगले आणि कटू अनुभव आले असल्यास ते आम्हाला अवश्य पाठवा ! या लेखानुसार शिक्षणक्षेत्रासंदर्भात चांगले अथवा कटू अनुभव आले असल्यास आम्हाला अवश्य कळवा. हे अनुभव प्रसिद्ध करतांना तुमचे नाव पाहिजे असल्यास गोपनीय ठेवू. सुराज्य अभियान टपालाचा पत्ता – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, ‘मधुस्मृती’ घर क्र. ४५७, पहिला मजला, बैठक सभागृह, सत्यनारायण मंदिराजवळ, ढवळी, फोंडा, गोवा – ४०३४०१ संपर्क : ९५९५९८४८४४ संगणकीय पत्ता – socialchange.n@gmail.com |
विद्यार्थ्यांना दिशा देणारे प्राध्यापकच जर अनीतीने वागणारे असतील, तर देश उज्ज्वल भविष्याकडे कधीतरी मार्गस्थ होईल का ? |