पाकिस्तानची नागरिकता लपवून सरकारी शिक्षक म्हणून नोकरी करणार्‍या महिला आणि तिची मुलगी यांच्यावर कारवाई !

सरकारी अधिकार्‍यांवरही कारवाईची शक्यता

रामपूर (उत्तरप्रदेश) – पाकिस्तानी नागरिक असल्याचे लपवून सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवणार्‍या महिलेला नोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे, तर तिच्या मुलीला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी काही सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. मुलगी बरेली येथे, तर तिची आई रामपूर येथे नोकरी करत होती.

रामपूरच्या मोहल्ला आतिशबाजानमध्ये रहाणार्‍या फरजाना उपाख्य माहिरा अख्तर हिने जून १९७९ मध्ये पाकिस्तान निवासी सिबगत अली याच्याशी विवाह केला होता. त्यानंतर ती पाकिस्तानमध्ये गेल्यावर तिला तेथील नागरिकता मिळाली होती. २ वर्षांनंतर तिचा तलाक झाल्यावर ती पाकिस्तानी पारपत्राद्वारे व्हिजा घेऊन भारतात परत आली. त्या वेळी तिच्या समवेत तिच्या दोन मुलीही होत्या. व्हिजाचा कालावधी संपल्यानंतर ती पुन्हा पाकमध्ये गेली नाही. येथे ती नोकरी करू लागली होती. वर्ष १९८३ मध्ये तिच्यावर खटला प्रविष्ट करण्यात आल्यावर तिला केवळ न्यायालयात एक दिवस उपस्थित रहाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर तिला प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. ती पाकिस्तानी असल्याची माहिती मिळाल्यावर तिला नंतर निलंबितही करण्यात आले होते; मात्र तिला पुन्हा नोकरीत सामावून घेण्यात आले आणि प्रकरण थंड झाले. गेल्या वर्षी तिची मुलगीही सरकारी शिक्षक असल्याची माहिती मिळाल्यावर फरजानाचीही पुन्हा चौकशी चालू झाली आणि तिला बडतर्फ, तर मुलीला निलंबित करण्यात आले.

संपादकीय भूमिका 

अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच भारतियांना वाटते !