मायेची ओढ नसणार्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असलेल्या बार्शी (सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. शीतल केशव पवार (वय ३४ वर्षे)
बार्शी (सोलापूर) येथील कु. शीतल केशव पवार यांची २४ मार्च २०२२ या दिवशी एका अनौपचारिक सत्संगात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करण्यात आली होती. सद्गुरु स्वाती खाडये यांनी त्यांचा सत्कार केला होता. कु. शीतल पवार यांच्या कुटुुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्री. केशव पवार (वडील, वय ६६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) आणि सौ. मंदाकिनी केशव पवार (आई, वय ५९ वर्षे,आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), बार्शी (जि.) सोलापूर
१. एका भविष्य सांगणार्या व्यक्तीने शीतल दैवी मुलगी असल्याचे सांगणे आणि त्याची प्रचीती येणे : ‘शीतल अनुमाने १ – २ वर्षांची असतांना भविष्य सांगणार्या एका व्यक्तीने सांगितले होते, ‘ही मुलगी दैवी गुणांची आहे. हिच्या पायात लक्ष्मी आहे. तिला दिल्या घरी भरभराट होईल.’ हा अनुभव आम्ही तिच्या जन्मापासून घेतला आहे. पूर्वी बार्शी शहरात आम्हाला जागा विकत घ्यायला बर्याच अडचणी येत हात्या. तिचे बाबा चाकरी करत असतांना सुटीत घरी आल्यावर बार्शीला जागा पहायला जायचे; पण त्यामध्ये अडथळे यायचे. तिचा जन्म झाला आणि आम्ही बार्शी येथे जागा विकत घेतली. तिचा जन्म झाल्यापासून आम्हाला कधीच पैशांची अडचण भासली नाही.
२. जवळीक साधणे : शीतल लहानपणापासूनच शांत स्वभावाची आहे. ती लहान असतांना जो कोणी घेईल, त्याच्याकडे ती जायची. शीतल लहान मुलांपासून ते वयस्कर साधकांपर्यंत सर्वांशी हसत बोलते. तिची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी जवळीक होते.
३. आवड-नावड नसणे : शीतलने लहानपणापासूनच तिला ‘एखादी आवडती गोष्ट पाहिजे’, असा हट्ट कधीच केला नाही. तिच्या कपड्यांची खरेदीही तिचे बाबा (श्री. केशव पवार) करतात. त्यांनी जे कपडे आणले असतील, ते ती वापरते. तिचे रहाणीमान साधे आहे.
४. मायेची ओढ नसणे : शीतलचे लग्नाचे वय झाल्यानंतर आम्ही तिच्याकडे लग्नाचा विषय काढल्यानंतर तिला राग यायचा. ती आम्हाला म्हणायची, ‘‘मला लग्न करायचे नाही. मला साधनाच करायची आहे.’’ ‘लग्न करून कुणी सुखी होत नाही, तर साधना करूनच सुखी रहाता येते’, असे तिचे विचार होते. त्यामुळे तिने पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. तिला नातेवाइकांकडे किंवा कुणाच्या लग्नसमारंभाला जायला आवडत नाही. ती सतत सेवा आणि व्यष्टी साधना यांतच मग्न असते.
५. सेवेची तळमळ
५ अ. संगणक शिकून घेणे : शीतलने सेवा करण्यासाठी संगणक शिकून घेतला. अतुल (भाऊ) आश्रमातून घरी आल्यानंतर ती त्याच्याकडून संगणकाची माहिती करून घेत असे. अतुलने तिला एकदा शिकवले की, ती ते अचूक लक्षात ठेवत असे.
५ आ. देहभान विसरून सेवा करणे : मागील ७ – ८ वर्षांपासून ती बार्शी येथील लिखाणाचे टंकलेखन करणे, गूगल शीट भरणे, अहवाल भरणे इत्यादी संगणकीय सेवा करत आहे. सेवा करतांना तिला जेवण आणि इतर गोष्टींचेही भान रहात नाही. या सेवेतून तिला आनंद मिळतो.
श्री. अतुल पवार (मोठा भाऊ), रामनाथी आश्रम, फोंडा, गोवा.
१. अपेक्षा नसणे : ‘माझी बहीण शीतल (दीदी) लहानपणापासून कुणाकडूनही कसलीही अपेक्षा करत नाही. मोठा भाऊ या नात्याने तिला माझ्याकडून कोणतीही अपेक्षा नसते.
२. प्रेमभाव
अ. दीदी कोणालाही कधीच दुखवत नाही. एखाद्याची चूक लक्षात आली, तरी ती प्रेमानेच सांगते. तिच्या बोलण्यात आपलेपणा जाणवतो.
आ. तिच्यातील प्रेमभावामुळे लहान मुले तिच्याकडे लगेच जातात आणि तिच्यासह खेळतात.
३. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : दीदी व्यष्टी साधना गांभीर्याने करते. तिला झोपायला कितीही उशीर झाला, तरी ती प्रार्थना, आध्यात्मिक उपाय आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनासाठीचे लिखाण पूर्ण करूनच झोपते. सद्गुरु सुश्री (कु.) स्वाती खाडये साधकांसाठी आठवड्यातून २ दिवस सकाळी ६ ते ७ या वेळेत ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप सत्संग घेतात. दीदी त्या सत्संगाला सवलत न घेता नियमित उपस्थित रहाते.
४. सेवा तळमळीने करणे : दीदी संगणकीय सेवा करतांना अगोदर प्रार्थना आणि आध्यात्मिक उपाय करूनच संगणक चालू करते. ती संगणकीय सेवा करतांना एकाग्रतेने आणि मनापासून करते. बार्शी येथील साधकही तिच्या सेवेचे आमच्याकडे कौतुक करतात.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा !
५ अ. प्रवासात त्रास होत असल्याने लांबचा प्रवास करण्याचे टाळणे, तरीही रामनाथी आश्रम पहाण्यासाठी लांबचा प्रवास करणे : दीदीला बस आणि रेल्वे यांनी प्रवास करतांना मळमळते. प्रवासात त्रास होत असल्यामुळे तिने साधारण १५ ते २० मिनिटांच्या पुढे लांबचा प्रवास केला नाही. एकदा आम्ही सर्व कुटुंबीय रामनाथी आश्रमात जाणार होतो. तेव्हा दीदी केवळ रामनाथी आश्रम पहाण्यासाठी बार्शी ते गोवा हा लांबचा प्रवास करून आमच्या समवेत रामनाथी येथे आली. तेव्हा तिला प्रवासाचा काहीही त्रास झाला नाही.
५ आ. आतापर्यंत घर सोडून एकटीने न राहिल्यामुळे आणि प्रवासात त्रास होत असल्यामुळे दीदीने कुठेही प्रवास न करणे : आम्ही रामनाथी आश्रमात गेल्यानंतर आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले दीदीला म्हणाले, ‘‘तू परत आश्रमात येशील ना ?’’ वास्तविक पहाता ती लहानपणापासून घर सोडून कधीच कुठेही राहिली नाही. त्यामुळे तिच्यासाठी ‘नवीन ठिकाणी रहाणे’, हे फार कठीण होते. तसेच ‘पुन्हा एवढा लांब प्रवास करून परत गोव्याला येणे’, हेही तिच्यासाठी कठीण होते, तरीही ती परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाली, ‘‘हो, येईन.’’
५ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करण्यासाठी रामनाथी आश्रमात सेवेसाठी जाणे : त्यानंतर बार्शी येथे घरी गेल्यावर दीदीने तिच्या नेहमीच्या सेवा चालू केल्या. काही दिवसानंतर तिला वाटले, ‘आपण परात्पर गुरु डॉक्टरांना ‘परत येते’, असे सांगितले होते. त्यांचे आज्ञापालन करायला हवे. परात्पर गुरु डॉक्टरच माझ्याकडून प्रवास करवून घेतील.’ श्री गुरूंवर श्रद्धा ठेवून ती परत आईच्या समवेत नोव्हेंबर २०१९ मध्ये बार्शी ते गोवा प्रवास करून रामनाथी आश्रमात सेवेसाठी आली.
६. दीदीमध्ये जाणवलेले पालट
अ. पूर्वीच्या तुलनेत ती आता अधिक आनंदी वाटते. तिच्या तोंडवळ्यावर उत्साह जाणवतो.
आ. ‘तिच्या मनातील निरर्थक विचार अल्प होऊन आता ती सतत सेवेचाच विचार करते’, असे जाणवते.
इ. पूर्वीच्या तुलनेत ती भावपूर्ण प्रार्थना करतांना दिसते.
ई. तिच्या आवाजात अधिक गोडवा जाणवतो.
‘दीदीची साधना आणि सेवा यांची तळमळ पाहून तिची साधना चांगली चालू आहे आणि तिचा आध्यात्मिक स्तर वाढत आहे’, असे मला जाणवते. परात्पर गुरु डॉ. आठवले दीदीकडून घरी राहूनही चांगली साधना करवून घेत आहेत आणि आम्हाला आनंद देत आहेत, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
सौ. वेदिका संजय जगताप (लहान बहीण), मिरज
१. स्थिर आणि आनंदी : ‘माझी बहीण शीतलताई सतत आनंदी असते. कोणताही प्रसंग घडला, तरी तिच्या मनावर त्याचा परिणाम होत नाही. ती स्थिर असते.
२. प्रेमळ स्वभावामुळे सर्वांची लाडकी असणे : ताई प्रेमळ असल्यामुळे आणि तिच्यातील दैवी गुणांमुळे ती सर्वांची लाडकी आहे. साधक आणि नातेवाईक तिच्यावर फार प्रेम करतात. माझा मुलगा कु. अवधुत संजय जगताप (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ९ वर्षे) याला ताईविषयी फार ओढ आहे. तो मला म्हणतो, ‘‘आई, मला दीदीमावशी समवेत रहायचे आहे. मला तिच्या सहवासात रहायला फार आवडते.’’ मिरजेला घरी असतांना अवधुत सारखी तिची आठवण काढतो. ‘दोघांमध्ये काहीतरी आध्यात्मिक ऋणानुबंध आहेत’, असे मला जाणवते.
३. सेवेची चिकाटी आणि तळमळ : ताईला ऐनवेळी कोणतीही सेवा सांगितली, तरी ती स्वीकारते. त्या वेळी तिच्या मनात प्रतिक्रिया येत नाहीत. ती चिकाटीने आणि मनापासून सेवा पूर्ण करते. त्यासाठी कितीही उशीर झाला, तरी ती जागून ती सेवा पूर्ण करते. तिला सेवेचा ध्यास आहे.
४. अंतर्मुखता वाढणे : ताईच्या तोंडवळ्यावर पूर्वीच्या तुलनेत अधिक चैतन्य जाणवते. तिच्या मनात केवळ सेवेचेच विचार असतात. तिच्या मनातील निरर्थक विचारांचे प्रमाण अल्प होऊन ती अंतर्मुख झाल्याचे जाणवते.’
नम्र, निर्मळ आणि साधनेची ओढ असलेल्या कु. शीतल केशव पवार (वय ३४ वर्षे) !
१. नम्रता : ‘शीतल या माझ्या मोठ्या नणंद (यजमानांची बहीण) आहेत. त्यांना आम्ही ‘दीदी’ म्हणतो. माझ्या विवाहापासून आतापर्यंत त्या कधीच माझ्याशी मोठी नणंद या भूमिकेतून वागल्या नाहीत. त्यांच्या वागण्या-बोलण्यात नेहमी साधकत्व असते. दीदी कधी मोठ्या आवाजात बोलत नाहीत किंवा कुणाशी रागाने बोलत नाहीत. दीदींच्या बोलण्यात नम्रता असते.
२. निर्मळ : दीदींचे मन बालकाप्रमाणे निर्मळ आहे. त्यांच्या मनात कुणाविषयीही नकारात्मकता किंवा कटुता नाही. त्यांच्या बोलण्यात किंवा वागण्यात कधीच प्रतिक्रिया नसते.
३. काटकसरी : दीदींच्या आवश्यकता अत्यंत अल्प आहेत. त्या स्वतःसाठी आवश्यक तेवढेच कपडे घेतात. ‘महाग वस्तू घेण्यापेक्षा अल्प दरातील वस्तू कशी घेऊ शकते ?’, असा त्यांचा विचार असतो.
४. इतरांना साहाय्य करणे : मी बार्शीला गेल्यावर स्वयंपाकघरातील कामे करण्यासाठी दीदी मला साहाय्य करतात. मला कोणत्याही वैयक्तिक गोष्टीत त्यांचे साहाय्य हवे असेल, तर त्या मला तत्परतेने साहाय्य करतात. त्या दुसर्यांचा विचार करून त्यांना प्राधान्य देतात.
५. तत्त्वनिष्ठता : दीदी नेहमी खरे बोलतात. जे काही आहे, ते त्या स्पष्टपणे आणि तत्त्वनिष्ठतेने मांडतात.
७. अहं अल्प असणे : दीदींमध्ये अहं अल्प आहे. मला त्यांच्या सहवासात ताण, जडपणा किंवा दडपण येत नाही. त्या सहजतेने वागत असल्यामुळे त्यांच्या सहवासात मला हलकेपणा जाणवतो.
८. वेळेचे गांभीर्य असणे : दीदी कधीही वेळ वाया घालवत नाहीत. त्या त्यांची सेवा, व्यष्टी साधना, आध्यात्मिक उपाय आणि घरातील कामे करण्यात दिवसभर व्यस्त असतात.
९. साधनेची ओढ : ‘फिरायला जाणे आणि हौस-मौज करणे’ यात त्यांना रस नाही. त्यांना केवळ साधना आणि सेवा करण्यातच आनंद मिळतो.’
– पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार (वहिनी), सनातन आश्रम, देवद, पनवेल.