श्री गणेशमूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता मूर्तीचे दान करावे ! – तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे धर्मद्रोही आवाहन
घरी मूर्तीच्या विसर्जनासाठी नगर परिषदेकडून अमोनियम बाय कार्बोनेटचे विनामूल्य वाटप
तळेगाव दाभाडे (जिल्हा पुणे) – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने शहरामध्ये गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी आणि जलप्रदूषण रोखण्याच्या अनुषंगाने नागरिकांनी श्री गणेशमूर्तीचे विसर्जन तलाव, विहीर, नदी अन् इतर नैसर्गिक जलस्रोत यांमध्ये न करता नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या केंद्रांवर मूर्तीदान करून करावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी केले आहे. त्या अनुषंगाने नगर परिषदेच्या वतीने गाव विभागामध्ये ठिकठिकाणी मूर्तीदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच ज्या नागरिकांना घरी मूर्तीचे विसर्जन करावयाचे आहे, अशा नागरिकांना नगर परिषदेच्या वतीने अमोनियम बाय कार्बोनेट पावडरचे विनामूल्य वाटप करण्यात येत आहे. (रासायनिक पदार्थ वापरून श्री गणेशमूर्तीचे विघटन करणे, हा घोर अवमान आहे. भाविकांना श्री गणेशमूर्तीचे असे विडंबन करण्यास उद्युक्त करणारी नगर परिषद धर्मद्रोहीच आहे ! – संपादक)
गणेशोत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य संकलन करण्यासाठी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिदिन ट्रॅक्टरद्वारे निर्माल्य कलश फिरवण्यात येणार आहे. तसेच मूर्तीदान केंद्राच्या ठिकाणीही निर्माल्यकलश ठेवण्यात आले आहेत. शहरातील नागरिक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यांनी निर्माल्य इतरत्र न टाकता निर्माल्य कलशात टाकावे, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
आळंदी येथील इंद्रायणी नदी घाट श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी बंद
आळंदी (जिल्हा पुणे) – आळंदी नगर परिषदेच्या वतीने इंद्रायणी नदी घाट लाकडी बांबू आणि पत्रे यांच्या साहाय्याने श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी बंद ठेवण्यात आला आहे. गणेशभक्तांनी मूर्ती खेड विभागाकडील नगर परिषद वाहनतळ, हवेली विभागाकडील इंद्रायणीनगर कमानीसमोर असलेल्या मूर्ती संकलन केंद्रात संकलित किंवा दान करून नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन आळंदी नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकादेवतांचे दान घेणे किंवा देणे हा देवतांचा अपमान आहे. प्रशासनाकडून दान घेतलेल्या मूर्ती बंद पडलेल्या खाणीमध्ये टाकल्या जातात, त्यांची अतिशय अयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. हे लक्षात घेऊन भाविकांनी शास्त्रानुसार मूर्ती विसर्जन करणे हे धर्मपालन आहे. |