भाविकांनी धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यात, तसेच नैसर्गिक स्रोतात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे !
हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे आवाहन
निपाणी (कर्नाटक) – येथील नगरपालिका प्रशासनाने गणेशभक्त आणि गणेशोत्सव मंडळे यांनी कृत्रिम तलावात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असा आदेश काढला आहे. त्या संदर्भात हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी नगराध्यक्ष श्री. जयंवत भाटले आणि नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेजी यांना भेटून निवेदन दिले. नगरपालिकेने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ यांची बळजोरी न करता ज्या भाविकांना नदी, तलाव अथवा अन्य कुठे विसर्जन करायचे आहे, त्याला आडकाठी आणू नये. गणेशभक्तांकडून प्रशासनाने अथवा अन्य अशासकीय संस्थांनी ‘मूर्तीदान’ घेऊ नये, अशा मागणी त्या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनानंतर नगराध्यक्षांनी ‘नगरपालिका मूर्तीदानाची सक्ती करणार नाही’, असे आश्वासन हिंदुत्वनिष्ठांना दिले. या प्रसंगी श्रीराम सेना हिंदुस्थानचे श्री. श्रीनिवास चव्हाण, विश्व हिंदु परिषदेचे श्री. राजू पुरंत आणि श्री. अजित पारळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेश पानारी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. रवींद्र शिंदे आणि श्री. अभिनंदन भोसले, श्रीराम सेनेचे श्री. अमोल चेंडके आणि श्री. राजू कोपर्डे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री योगेश चौगुले, जुगल वैष्णव, अनिल बुडके, निगोंडा पाटील उपस्थित होते. तरी या संदर्भात भाविकांनी धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यात, तसेच नैसर्गिक स्रोतात श्री गणेशमूतींचे विसर्जन करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी केले आहे.